Showing posts with label iceland. Show all posts
Showing posts with label iceland. Show all posts

Sunday, April 18, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास-३


तंबोराह-द ईयर विदाउट समर-१८१५
१२ चौ. कीमी क्षेत्रफळाचा कॅल्डेरा बनवणारा हा उद्रेक 'रेकॉर्डेड' इतिहासातील सर्वात मोठा. मागच्या भागात पाहिलेल्या क्राकातुआपेक्षा सुमारे पाच पट विध्वंसक. तंबोराह हा सुद्धा इंडोनेशीआतील एक पर्वतावर असलेला ज्वालामुखी. सुमारे १२५ क्युबीक किलोमीटर राख या उद्रेकातुन बाहेर पडली. ही राख सुमारे १५०० कीमी पर्यंत पसरली. ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम ४४ कीमी उंच होता. ह्या उद्रेकाच्या आधी सुमारे सहा वर्षे तंबोराह सक्रीय होता.

उद्रेकामुळे झालेल्या पर्वताच्या उंचीतील फरक पाहिल्यास या उद्रेकाची तीव्रता कीती असेल याची कल्पना येइल. उद्रेकामुळे पर्वताची उंची सुमारे ५००० फुटांनी कमी झाली. या घटनेत जवळजवळ १लाख लोक मृत्युमुखी पडले. यातील  १० हजार लोक विस्फोट, पायरोक्लास्टीक फ्लो इ. मुळे मेले, इतरांचा शेवट रोगराई आणि उपासमारीमुळे झाला.

या वर्षात जगभरात थंडीची लाट आली होती,म्हणुनच या वर्षाला 'द ईयर विदाउट समर' असे म्हणले जाते. यु. एस. जीऑलॉजीकल सर्वेनुसार जगभरातील तापमान ३ अंश सेल्सीअस पर्यंत खाली गेले. वाढलेल्या थंडीमुळे पीकांचे प्रचंड नुकसान होउन जीवीतहानी अधिकच वाढली.

कमी झालेल्या तापमानाचे मुख्य कारण उद्रेकातुन बाहेर पडलेला २० कोटी टन सल्फर डायॉक्साईड वायु. पण त्याशिवाय कमी झालेल्या सौरउर्जेच्या उत्सर्जनामुळे या तापमान बदलास हातभार लागल्याची शक्यता वर्तवली जाते. या काळात कमी झालेल्या उत्सर्जनाला डाल्टन मिनीमम म्हणले जाते.



पीनाटुबो-१९९१
१५ जुन १९९१ साली फीलीपाईन्स मधील याच नावाच्या पर्वतावर झालेला हा शक्तीशाली विस्फोट.  भुगर्भ हालचालीचे निरीक्षण सर्वप्रथम सर्वात यशस्वीरीत्या या वेळी केले गेले. अगदीच कमी झालेली मनुष्यहानी प्रगत तंत्रज्ञानाचे यशच आहे असे म्हणावे लागेल. ५० हजारांपेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर यशस्वीरीत्या केले गेले.यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक रोगराइचे बळी ठरले. दुर्देवाने याच वेळी आलेल्या वादळाने परिस्थीती आणखीन बिघडली.

ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम सुमारे ७ कीमी उंच होता. या उद्रेकाआधी आणि नंतर भुकंपाचे अनेक हादरे नोंदवले गेले आहेत. उद्रेकाने पर्वाताच्या शिखरावर २ कीमी व्यासाचा कॅल्डेरा तयार झाला. ह्या उद्रेकाने जगभरातील तापमान सुमारे अर्धा अंश खाली गेल्याचे मानले जाते.

यांशिवाय काही महत्त्वाचे उद्रेक म्हणजे, वायोमींग राज्यातील यलो स्टोन येथे ठरावीक कालांतराने झालेले प्रचंड उद्रेक. (पहिला २१ लाख वर्षांपुर्वी, दुसरा त्यानंतर ७ लाख वर्षांनी, आणि तिसरा १४ लाख वर्षांनी, ह्या नियमाने या पुढचा उद्रेक आता होण्याची शक्यता आहे, कदाचित २०१२ ला व्हावा. ;) ) हे तीनही उद्रेक तंबोराहच्या उद्रेकाइतकेच शक्तीशाली होते.

३५०० वर्षांपुर्वीचा सँतोरीनी उद्रेक. 'लॉस्ट सीटी ओफ अ‍ॅटलांटीस', 'बायबल मधील दहा प्लेग' अश्या काही दंतकथांचा संबंध या उद्रेकाशी जोडला जातो.

आईसलँडचा उद्रेक कीती विनाशक?
हे पाहण्याकरीता आपण ह्या सगळ्या उद्रेकांची ढोबळमानाने तुलना करुयात.

शास्त्रज्ञ उद्रेकाची तीव्रता Volcanic Explosivity Index(VEI) ने मोजतात. ह्याची कल्पना येण्याकरता खालील चित्र पहा.

उद्रेक ---            VEI
टोबा   ---            ८
तंबोराह ---           ७
क्राकातुआ---         ६
पिनाटुबो ---          ६


राखेच्या उत्सर्जनानुसार तुलना

Thorvaldur Thordarson या शास्त्रज्ञाच्या मते आईसलँडच्या ह्या उद्रेकाचा VEI २ ते ३ असावा. आईसलँड्वर होणारी ही हालचाल प्रथमच होत नाहीए. मागील दहा वर्षांची हालचाल पाहता हालचाल आजुन वाढण्याची शक्यता थोर्वाल्दुर व्यक्त करतो.  शास्त्रज्ञांना काळजी आहे ती या पेक्षा मोठ्या अश्या 'काटला' ज्वालामुखी जागृत होण्याची. गेल्या हजार वर्षात आजपर्यंत तीन वेळा Eyjafjallajokull जागा झाला आहे आणि त्यानंतर काटला ही.

थोडक्यात्, हवाईकंपन्यांना होत असलेल्या प्रचंड नुकसानाशिवाय आज तरी फार मोठे नुकसान अपे़क्षित नाही.

समाप्त.

संदर्भ साभार,
१. HOW VOLCANOES WORK सॅन डीएगो स्टेट युनिव्हर्सिटी.

Saturday, April 17, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.

सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.

सर्वात नुकताच झालेला सुपर व्होल्कॅनो म्हणजे टोबाचा वोल्कॅनो जवळ जवळ ७४,००० वर्षांपुर्वीचा , याचा आपल्या इतिहासाशी असलेला संबंध थोडासा रंजक आणि मतभेद असलेला आहे.

पर्मिअन एक्स्टींशन
सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रेट्स (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रेट मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.

ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.


द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे सापडल्याने ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो.

संदर्भ