Monday, January 4, 2021

पक्षीनिरीक्षण - बाळगावा असा छंद

लहानपणापासून माहितीपटांत पाहिल्याप्रमाणे जसा डेव्हिड अ‍टेनबरो कोणत्यातरी जंगलात किंवा अभयारण्यात एखाद्या प्राण्याच्या शोधात जातो, तसे आपणही अद्भुत आणि विविध प्राणी-पक्षी पहावयास जावे असे मला नेहमीच वाटत आले आहे. अनेक प्राणी-पक्षी नामशेष व्हायच्या आत पहायला जायचे बेत मी शक्य होईल तसे आखतो आहे. बोर्नीयोच्या जंगलात जाऊन नामशेष होण्याच्या काठावर असलेल्या ओरांगउटान आणि र्‍हायनॉसोरस हॉर्नबील (Rhinoceros Hornbill) पाहण्याची संधीही नुकतीच मिळाली. मानवाने जवळजवळ संपुष्टात आणलेल्या फिलीपीन्सच्या पर्जन्यवनात (rain-forest) अगदी तुरळक संख्येने उरलेल्या फिलीपिनी गरुडांचा (Philippine Eagle) अयशस्वी शोधही घेतला. या वर्षी, म्हणजे २०२० साली ब्राझिलच्या जंगलात जाण्याचे बेत मी आखत होतो, मात्र करोना विषाणूने सगळेच बेत रद्द केले.

Rhinoceros Hornbill, Borneo, Malaysia.
 

पण करोनामुळे एकदम थंडावलेल्या मानवी जगात वन्यजीवनाचे अस्तित्व जवळपासही आहे हे जाणवायला लागले. या विषयीच्या बातम्या तुम्ही सर्वांनी वाचल्या असतीलच. विशेषत: पक्षीनिरीक्षणांत यावेळी खास वाढ दिसून आली. घरात अडकून बसलेल्या अनेकांना अंगणातील-खिडकीतील पक्ष्यांच्या वास्तव्याने दिलासा मिळाला. जवळपासच्या ओस पडलेल्या बागांमध्ये अचानक नवीन आणि दुर्मीळ पक्षी दिसू लागले. ह्या नवीनच सापडलेल्या छंदामुळे फार दूर न जाताही पक्षीनिरीक्षणाचा आनंद माझ्याप्रमाणे कोणालाही लुटता येईल.

उन्हाळ्यात कॅनडातील जंगलात प्रजननासाठी येणारा आणि एरवी दक्षिण अमेरिकेत असणारा 'कॅनडा वॉर्बलर' सहसा आमच्या राज्यात दिसून येत नाही. यंदा मात्र तो माझ्या घरापासून पासून पाच मैलांवर एका बागेत सापडला.

कॅनडा वॉर्बलर.

बदामीला लेणी बघत असताना जवळच्याच डबक्यात नेम धरून बसलेला हा बगळा (Pond Heron) यशस्वी शिकार करताना सहजच पहायला मिळाला.

बगळा (Indian Pond Heron).

पक्षीनिरीक्षणाची परंपरा अमेरिकेत साधारण दोनशे वर्षांपासून आहे. जॉन जेम्स ऑडोबॉन या मूळच्या फ्रेंच निसर्गसंशोधकाने एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील पक्ष्यांचे शास्त्रीय निरीक्षण केले आणि त्याआधारे 'Birds of America' हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या काळी हे पुस्तक युरोपमध्ये फार लोकप्रिय झाले. खुद्द चार्ल्स डार्विनने त्याच्या 'On the Origin of Species' या सुप्रसिद्ध पुस्तकात ऑडोबॉनच्या निरीक्षणांचा वापर/उल्लेख केलेला आहे. पक्षीनिरीक्षणाची लोकप्रियता जसजशी वाढली, तसतसे पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना दाणापाणी देणेही हळूहळू युरोप-अमेरिकेत वाढू लागले. विशेषत: उत्तर खंडातील कडक थंडीत पक्ष्यांचे किडामुंगीसारखे एरवीचे खाद्य नाहीसे होते. अशा वेळी पक्ष्यांना मदत म्हणून लोक थंडीत पक्ष्यांसाठी दाणे, धान्य वगैरे ठेवू लागले.

अमेरिका खंडात दरवर्षी कोट्यवधी पक्षी वसंत ऋतूत उत्तरेकडे प्रवास करतात. तिथे महिन्या-दोन महिन्यांत पिलांना जन्म देऊन पुन्हा परततात. जगभरात अनेक पक्षी अशा प्रकारे स्थलांतर करत असतात. हजारो वर्षे हे पक्षी त्यांच्या पूर्वजांनी चालवलेला क्रम पुढे चालवत आहेत. काही पक्षी दरवर्षी अगदी आधीच्याच वास्तव्य असलेल्या झाडावरल्या ढोलीत परततानाही आढळलेले आहेत. नुकतीच जन्मलेली पिले काही आठवड्यांच्या वयातच हजारो मैलांचा प्रवास करून परत जातात अन् पुढच्या वर्षी पुन्हा हजारो मैलांचा प्रवास करून जन्मस्थानी परततात! काही निवडक पक्ष्यांवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा (GPS) वापर करून अनेक वैज्ञानिक संस्था त्यांच्या या नियमित स्थलांतरावर संशोधन करत आहेत. खाली GPS चा वापर करून निर्माण केलेले एका अ‍ॅनिमेशन पहा. अ‍ॅनिमेशन अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बनवले आहे. (अधिक माहिती इथे पहा.)


अ‍ॅनिमेशन साभार: All About Birds
 

अशा स्थलांतरांत काही पक्ष्यांचे वजन ४०%नी कमी होते. स्थलांतरादरम्यान पक्षी वाटेत काही ठिकाणी विश्रांती घेत उरलेल्या स्थलांतरासाठी आवश्यक ती ऊर्जा राखण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांची ही टप्प्यांची ठिकाणेही पिढ्यानपिढ्या ठरलेली आहेत. दुर्दैवाने गेल्या शतकभरात मनुष्याने अशा अनेक जागांवर आक्रमण केले आहे आणि त्यामुळे अनेक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. स्थलांतर करताना वाटेत थांबलेल्या पक्ष्यांना पाहण्याची संधी अल्पकाळच असते. मनुष्यवस्तीपासून लांब राहणार्‍या अनेक पक्ष्यांना अभ्यासण्यास ही स्थलांतराच्या मार्गावरील ठिकाणे फार महत्त्वाची आहेत.

'टर्न' पक्षी आपल्या लांबच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. तीन महिन्यांच्या एका 'आर्क्टिक टर्न'ने २२,००० किमीचा प्रवास केल्याची नोंद आढळते.

Common Tern.

सहसा एकट्या-दुकट्याने राहणारे आणि आपला टापू राखणारे ससाणे परतीच्या मार्गावर लागले, की हळूहळू मोठ्या थव्याने जमू लागतात - ज्यांना 'केटल' (kettle) असेही म्हणतात. आपल्या हजारो मैलांच्या परतीच्या प्रवासाला निघालेले हे थवे पहायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच असते.

Swainson's Hawk.

Swainson's Hawk kettle.

पक्षीनिरीक्षण म्हणजे नक्की काय? याची स्पष्ट अशी व्याख्या नाही. अनेक शतके मनुष्य पशुपक्ष्यांचे निरीक्षण करत आला आहे. अमेरिकेतील काही मूलनिवासी लोकांनी, काही पक्षी थंडीत अचानक गायब होतात अन पुढील वर्षी पुन्हा दिसू लागतात हे जाणले होते. 'पर्पल मार्टिन' (Purple Martin) हा पक्षी गिधाडांना दूर ठेवण्यास मदत करतो म्हणून हे मूलनिवासी भोपळ्याची ढोली करून 'पर्पल मार्टिन'ला आपल्या जवळ घरटं करण्यास उद्युक्त करतात, हे जॉन जेम्स ऑडोबॉनने १८२१ साली नोंदविलेले आहे.

 

Audubon ने केलेले रेखाटन. (साभार)

सध्या जगभरात लोक अनेक प्रकारे पक्षीनिरीक्षण करत आहेत. अनेक जण आपल्या अंगणात, कॉलनीत/सोसायटीत दिसणार्‍या पक्ष्यांची नियमाने नोंद करत आहेत. काही लोक जवळपासच्या बागेत, जंगलात, डोंगरांवर, नदी-समुद्रकिनारी जाऊन पक्ष्यांची नोंदणी करत आहेत. तर अनेक लोक पक्ष्यांसाठी असलेल्या प्रसिद्ध ठिकाणी जाऊन एरवी सहज न दिसणारे पक्षी आपल्या खाती नोंदवत आहेत. पक्षीनिरीक्षणाची ही लोकप्रियता लक्षात घेऊन याचा वापर विज्ञानासाठीही केला जातो आहे.

परतीच्या प्रवासात माझ्या बाल्कनीत काही दिवस थांबलेला- Black-Chinned Hummingbird.

कॉर्नेल विद्यापीठातील पक्षीविज्ञान शाखा (Cornell Lab of Ornithology) आणि ऑडोबॉन सोसायटी यांनी प्रथम शास्त्रीय अभ्यासाकरता लोकांच्या अंगणातील पक्ष्यांची मोजदाद लोकांच्याच मदतीने सुरू केली. या प्रकारच्या प्रयोगाला ‘सिटीझन सायन्स’ असे म्हटले जाते. सिटीझन सायन्स ही संज्ञा जरी नवीन असली तर या प्रकारचा उपयोग पक्षीविज्ञानात एकोणिसाव्या शतकापासून होत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, लोकांकडले स्मार्टफोन आणि संगणक यांमुळे ही पक्ष्यांची मोजदाद आणि नोंदणी फारच सुकर झाली. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तयार होणार्‍या माहितीच्या साठ्यातून पक्ष्यांच्या संख्येवर, आरोग्यावर परिणाम करणार्‍या विविध घटकांचा अभ्यास करणे शक्य झाले.

डीडीटी आणि इतर काही जंतुनाशकांमुळे अमेरिकेतील अनेक पक्ष्यांवर फार विपरीत परिणाम झाला. पक्ष्यांच्या अंड्यांची कवचं यामुळे अत्यंत नाजूक बनली व अंडी फुटून पक्ष्यांची पिले मरू लागली. या जंतुनाशकांवर बंदी आणल्यानंतर, ज्या पक्ष्यांवर परिणाम झाला होता, त्या पक्ष्यांच्या संवर्धनार्थ सरकारने काही उपक्रम राबवले. त्यांपैकी 'बाल्ड इगल', 'ऑस्प्रे' इ. पक्ष्यांसाठी हजारो घरटी बांधण्यात आली. या घरट्यांवरल्या देखरेखीसाठी लोकांच्या सिटीझन सायन्सचा वापर केला गेला आणि त्यावरून घरट्यांचा वापर कोठे होतो आहे, कोणत्या भागात पक्षी किती अंडी देत आहेत आणि किती पिलांना यशस्वीरित्या मोठं करत आहेत यांचे दस्तावेज बनवले गेले. या प्रयत्नांमुळे या पक्ष्यांच्या संवर्धनात मदत झालीच, पण त्याच बरोबर त्या त्या भागातील परिसंस्था कशा प्रकारची आहे या बाबींच्या संशोधनासही मदत झाली. काही ठिकाणी पक्ष्यांच्या संख्येवरून इतर काही विषारी पदार्थांमुळे नद्या, तलाव प्रदूषित झाले आहेत का, या बाबतची सूचना कमी अवधीत मिळण्यातही मदत झाली आहे.

या अनुभवांवरून आता जगभरात अनेक पक्ष्यांच्या घरट्यांवर देखरेख केली जाते. NestWatch या वेबसाईटच्या आधारे जगभरातील लोक अनेक पक्ष्यांच्या घरट्यांची माहिती गोळा करत आहेत. त्याशिवाय तुम्हांला तुमच्या आसपास कोणत्या पक्ष्यांची संख्या घटत आहे किंवा वाढत आहे हे पाहता येते. तुम्हांला ज्या पक्ष्यात रस आहे, त्या पक्ष्याची घरटी कशा प्रकारची असतात, कोणत्या आकाराची असतात वगैरे माहितीही मिळवता येते. काही पक्ष्यांकरता लाकडापासून कृत्रिम घर (Nest box) बनवण्याचे आराखडेही या वेबसाईटवर मिळतात. असे नेस्ट बॉक्स तुम्ही तुमच्या परिसरात उभारून पक्ष्यांना मदत करू शकता. वेबकॅम आणि इंटरनेटमुळे अशा घरट्यांवर देखरेख करणे आता अजूनच सोपे झाले आहे. जगातील वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अशा होणार्‍या चित्रणांचे थेट प्रक्षेपण तुम्ही घरबसल्याही बघू शकता.

ऑस्प्रे (Osprey).

सिटीझन सायन्सचा उपयोग जसा विज्ञानाकरता होतो आहे, तसाच तो छंद जोपासणार्‍यांनाही होतो आहे. कोणत्या ठिकाणी कोणते पक्षी दिसण्याची शक्यता आहे, ही माहिती या सिटीझन सायन्स डेटामुळे कोणालाही उपलब्ध असल्याने लोक निव्वळ पक्षीनिरीक्षणासाठीही प्रवास करू लागले आहेत. eBird ह्या कॉर्नेल विद्यापीठाने चालविलेल्या वेबसाइटवर जगभरातील लोकांनी नोंदवलेल्या पक्ष्यांची इत्थंभूत माहिती तत्काळ मिळते. चालू २०२० सालापर्यंत सहा लाखांपेक्षाही जास्त लोकांनी जवळजवळ दहा हजार पक्ष्यांच्या प्रजातींची नोंदणी केलेली आहे. आजपर्यंत जगात एकूण १०,५१२ प्रजातींची नोंद झालेली आहे.

विज्ञानासाठी सिटीझन सायन्सद्वारे मिळवलेल्या माहितीचा उपयोग व्हायचा असेल, तर मुळात पुरेशा, योग्य नमुन्याबद्दलची शास्त्रीय माहिती हवी. पुरेशी माहिती मिळवण्याकरता eBird आणि इतर संस्था वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवतात. यांची काही उदाहरणे म्हणजे 'ग्लोबल बॅकयार्ड बर्ड काऊंट' - वर्षातील काही ठरावीक दिवसांत आपापल्या अंगणातील पक्षी नोंदवणे; 'हॉकवॉच' - ससाणे, गरूड, घारी इ. शिकारी पक्ष्यांची त्यांच्या स्थलांतरादरम्यान मोजदाद करणे. ही मोजदाद सहसा स्थलांतराच्या मार्गावरील डोंगरांवर, समुद्रकिनार्‍यांवर जाऊन केली जाते; 'ग्लोबल बिग डे' - जगभरातून चोवीस तासांत जास्तीत जास्त पक्ष्यांची मोजदाद करणे.

या वर्षीचा 'ग्लोबल बिग डे' १७ ऑक्टोबरला होता. चोवीस तासांत जगभरातून ३२,०००पेक्षा जास्त लोकांनी सात ७,०००हून अधिक पक्ष्यांच्या जातींची नोंदणी केली. त्यात जगभरातील सुमारे ७०% पक्ष्यांच्या जाती एका दिवसात नोंदवल्या गेल्या! या नोंदणीस उत्तेजन म्हणून सर्वांत जास्त जाती नोंदवणारे; सर्वांत जास्त जाती नोंदवली गेलेली गावे, राज्ये, देश अशा प्रकारच्या याद्याही जाहीर केल्या जातात. सहभागी झालेल्यांना लॉटरीपद्धतीने आयोजकांकडून बक्षीसही दिले जाते.

या वर्षीच्या 'ग्लोबल बिग डे'मध्ये मीही भाग घेतला होता. आमच्या संपूर्ण राज्यात एकूण २९२ पक्ष्यांच्या जाती नोंदवण्यात आल्या. पहाटे साडेपाचपासून ते सूर्यास्तापर्यंत मी त्यांपैकी ११० पक्ष्यांच्या जाती नोंदवू शकलो. एकूण पक्ष्यांच्या जाती नोंदवण्यात मी आमच्या राज्यात तिसर्‍या क्रमांकावर होतो.


 

शास्त्रीय अभ्यासासाठी जर उपयोग करायचा असेल, तर माहितीही शास्त्रीय असायला हवी. नोंद करणार्‍यांनी चुकीच्या पक्ष्यांची नोंद केली, तर त्याचा फारसा उपयोग नाही. अमेरिकेत १,००० पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्याशिवाय अनेक पक्ष्यांच्या उपजातीही आढळतात. जंगलात, झुडपांत, पानाफुलांच्या सावलीत नेमकी पक्ष्याची जात ओळखणे वाटते तितके सोपे नाही. मोठे पक्षी एका ठिकाणी स्थिर बसतात, मात्र अनेक लहान पक्षी सतत हालचाल करत असल्याने त्यांचे नीट निरीक्षण करणे हीसुद्धा एक कलाच आहे. त्याशिवाय पक्ष्यांचे रंगरूप वर्षभरात बदलत असते. काही नर पक्षी प्रजननाच्या काळात अगदी आकर्षक रंगांनी सजलेले असतात, त्यामुळे ओळखणे सोपे जाते. एरवी मात्र त्यांचे रंग आणि माद्यांचे रंग अनेकदा सारखे दिसतात. शिवाय एकाच कुळातील पक्ष्यांमध्ये असलेल्या साम्यामुळे दोन जातीतील पक्ष्यांत फरक करणे फार अवघड जाते. अनेक पक्ष्यांचे रंग वयाच्या पहिल्या वर्षी वेगळे असतात. काही पक्ष्यांमध्ये रंगरूप पहिल्या तीन-चार वर्षांत बदलत जाते.

ब्लू ग्रोसबीक (Blue Grosbeak)- प्रजननातील रंगरूप (breeding plumage)
 

पक्षी बरोबर ओळखण्यासाठी त्याचे रंगरूप, चोचीचा आकार, पंखांची-पायांची लांबी, शेपटीचा आकार, शेपटी हलवण्याची एखादी लकब, पक्ष्याचे वागणे - जमिनीवरील दाणे वेचतो आहे की फांदीवर लटकून दाणे खातो आहे, झाडांवर खाणे शोधतोय की गवतात, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे, पक्षी उडताना कोणते आवाज काढतो आहे अशा अनेक गोष्टींचा उपयोग होतो. स्थलांतराच्या वेळी काही पक्षी त्यांचा नेहमीच्या सवयींनुसारच वागतील याचाही नेम नसतो. एरवी उंच डोंगरांवर सापडणारे डोंगरपायथ्याशीही सापडतात.

'eBird'सारख्या प्रणालीसेवांचा वापर केल्यास पक्ष्यांच्या जाती ओळखणे सोपे जाते. पक्ष्याचा साधारण आकार, रंग, त्याचे वागणे वगैरेंचा वापर करून तुम्ही पहात असलेला पक्षी कोणता असू शकेल, हे अशा अ‍ॅपवर तपासता येते. पक्ष्यांच्या फोटोंबरोबर पक्ष्यांचे आवाज आणि इतर उपयुक्त माहितीही अ‍ॅपवर मिळते. त्याशिवाय, तुमच्या फोनवरील जीपीएसच्या साहाय्याने तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी कोणते पक्षी दिसण्याची शक्यता आहे, हेही सहज पाहता येते. तुमच्या आसपासचे पक्षी ओळखण्यासाठी अनेक पुस्तकेही बाजारात उपलब्ध असतात, यांना सहसा 'फील्ड गाइड्स' असे म्हणतात. मात्र आता या पुस्तकांची जागा हळूहळू डिजिटल पुस्तके घेत आहेत.

या माहितीच्या आधारे तुम्ही पाहिलेल्या पक्ष्याची नोंद eBird मध्ये यादीत करू शकतात. यादीत करताना जीपीएसने तुमचे स्थान आपोआप घेतलेले असते अथवा तुम्हांलाही ते निवडता येते. जर तुम्ही पाहिलेला पक्षी विरळा असेल, तर नोंद घेतानाच हा पक्षी इथे सहसा सापडत नाही अशी सूचना तुम्हांला अ‍ॅपमध्ये मिळते. या याद्या, विशेषत: दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी त्या त्या भागातले परीक्षक सतत तपासत असतात. दुर्मीळ पक्ष्याच्या सविस्तर वर्णनाची नोंद केल्यास तुम्ही पक्षी बरोबर ओळखला आहे की नाही हे परीक्षकांना ठरवता येते. त्याशिवाय तुम्हांला पक्ष्यांची छायाचित्रे आणि आवाजाचे मुद्रणही पुरावा म्हणून जोडता येते. खात्रीलायक पुरावा नसल्यास परीक्षक अधिक माहिती मिळेस्तोवर ती नोंद ग्राह्य धरत नाहीत. बहुसंख्य परीक्षक सहसा पक्षीवैज्ञानिक, जीवशास्त्रज्ञ वगैरे असतात. पक्षीनिरीक्षणाचा दांडगा अनुभव असलेलेही काही लोक परीक्षक म्हणून नेमले जातात.

अमेरिकेतील या छंदाची लोकप्रियता पाहता सोशल मीडियावर हजारो लोकांचे ग्रुप्स आहेत हे ऐकल्यावर नवल वाटायला नको. अशा ग्रुप्सचा मुख्यत: उपयोग हा दुर्मीळ पक्षी कोठे सापडत आहेत याची बित्तंबातमी मिळवण्यासाठी होतो. काही गटांतील पक्ष्यांच्या जाती हुबेहूब एकसारख्या असतात. अशा पक्ष्यांची जात ओळखणे हे बर्‍यापैकी किचकट काम असते. ते सोपे करण्यासाठीही सोशल मीडियावरील ग्रुप्स उपयोगी पडतात. अनेक चिमण्यांच्या थव्यातून एखाद्या दुर्मीळ चिमणीची जात अचूक शोधणारे, किंवा हजारो बदकं आणि बगळ्यांच्या घोळक्यात एखादाच चुकून युरोप वा आशियातून आलेला पक्षी हुडकणारे आपोआप अशा ग्रुप्सवर सेलिब्रिटी बनतात.

अमेरिकेत तीस-पस्तीस जातींच्या चिमण्या आहेत; तितक्यांच जातींची बदकं आहेत. पन्नासपेक्षा जास्त प्रकारचे 'फ्लायकॅचर्स' (हवेत झेप घेऊन कीटक पकडणार्‍या पक्ष्यांचा एक गट) आणि सात-आठ प्रकारचे 'फिन्च' आहेत. यांतल्या अनेक जाती-उपजाती ओळखणे सोपे नाही. ('गलापागोस' बेटांवरील वेगवेगळ्या फिन्च पक्ष्यांमधील फरकाचा अभ्यास डार्विनला उत्क्रांतिवादाच्या शोधासाठी उपयोगी पडला, हे इथे सांगायला हरकत नाही). म्हणूनच अशा गोंधळात टाकणार्‍या एखाद्या पक्ष्याची जात बरोब्बर ओळखण्याची मजा काही औरच. आणि त्यात जर तो पक्षी क्वचितच आढळणारा असेल, तर क्या केहने! या छंदात रमलेले अनेक लोक क्वचित सापडणारे पक्षी शोधत गावांच्या, राज्यांच्या आणि अगदी देश-परदेशांतल्या कानाकोपर्‍यांत भटकत असतात.

अर्थात छंद म्हटला, की त्यात दोन्ही टोकांची उदाहरणं आलीच. फावल्या वेळात छंद जोपासणारे आणि या छंदाला वाहून घेतलेले अशा दोन्ही प्रकारचे लोक पक्षीनिरीक्षण करताना भेटतात. विशेषत: अमेरिकेत या छंदी लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ, 'बिग इयर'. थोडक्यात, वर्षभरात उत्तर अमेरिकेच्या हद्दीत जास्तीत जास्त पक्ष्यांच्या जातींची नोंदणी आपल्या खाती करायची स्पर्धा. हजारो मैल प्रवास करून उत्तर अमेरिकेच्या कानाकोपर्‍यांत जाऊन पक्ष्यांची नोंदणी करणं पन्नासच्या दशकापासून चालू आहे. (यावर 'द बिग इयर' नावाचा, सत्यघटनेवर आधारित विनोदी चित्रपटही येऊन गेला आहे.)

अमेरिकेत अभावानेच आढळणारा 'ईअर्ड केट्झल' पक्षी माझ्या राज्यात नुकताच, जवळजवळ वीस वर्षांनंतर, नोंदला गेला. याची नोंदणी होताच देशभरातील लोकांपर्यंत ती बातमी पोहोचली. हा पक्षी पाहण्याची दुर्मीळ संधी साधावी म्हणून देशभरातून हजारो मैलांचा प्रवास करून आलेले लोक मला भेटले!

ईअर्ड केट्झल (Eared Quetzal)

या छंदामुळे संवर्धनासही मोठी मदत होते आहे असे संशोधनाअंती दिसून आलेले आहे. अमेरिकेतील 'US Fish & Wildlife Service' खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४ कोटी ५० लाख लोक पक्षीनिरीक्षण करतात आणि त्यांच्यामुळे ८० अब्ज डॉलरची मदत अमेरिकी अर्थव्यवस्थेला होते. त्याशिवाय लाखो लोकांचा रोजगार पक्षीनिरीक्षणासंबंधीच्या प्रवासव्यवसायावर अवलंबून आहे. पक्षीनिरीक्षणात रस असलेले लोक संवर्धनासाठी देणग्या वगैरेही देण्यात अग्रेसर आहेत. पक्ष्यांना आपल्या अंगणात येण्यास प्रवृत्त करण्यासाठी बरेच लोक स्थानिक फुलझाडे, झुडपे वाढवतात आणि वृक्षारोपण करतात. शोभेच्या झाडांनी आणि कातरलेल्या गवताने सजलेल्या अंगणांपेक्षा अशा विविध झाडाझुडपांमुळे अनेक स्थानिक प्राणिमात्रांच्या संवर्धनास मदत होते.

कीटक हे अनेक पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. 'स्वालो' (swallows), 'मार्टिन' हे पक्षी मुख्यत: माशा, डास असे उडणारे कीटक खातात. जर पक्ष्यांची संख्या संतुलित असेल, तर वेगवेगळ्या कीटक-जंतूंनाही आपोआप अटकाव केला जातो.

मनुष्याने निसर्गाची पुष्कळ हानी केली आहे हे खरे आहे पण मनुष्याच्या काही प्रयत्नांनी निसर्गाला हातभारही लावलेला आहे. पक्ष्यांना दाणापाणी दिल्या जाणार्‍या ठिकाणी त्यांची संख्या आणि एकूण पिलांच्या जगण्याची शक्यता इतर ठिकाणांपेक्षा बरीच जास्त असल्याचे संशोधनांतून दिसून आलेले आहे. वर म्हणल्याप्रमाणे 'बाल्ड इगल', 'ऑस्प्रे' इत्यादी पक्ष्यांना नामशेष होण्याचा मार्गावरून परत आणले गेले आहे. 'हमिंगबर्ड' हे सहसा दक्षिण अमेरिकेतील पर्जन्यवनात राहतात. वर्षातील काही महिने अमेरिकेत येणार्‍या या पक्ष्यांना अनेक जण साखरेच्या पाण्याचे (नेक्टर) आमिष दाखवून आपल्या अंगणात आणतात. अमेरिकेत इतक्या लोकांनी अशी 'हमिंगबर्ड-फीडर्स' बसवलेली आहेत, की काही पक्ष्यांनी त्यांचे कायमचे वास्तव्य आता अमेरिकेतच पक्के केले आहे.

जागतिक महामारीच्या या दिवसांत घरात अडकून पडलेलो असताना एखाद्या जंगलात वा अभयारण्यात जाण्याची ओढ सतावत होती. पण निसर्ग आपल्या आजूबाजूलाच आहे आणि पक्षी तर सगळीकडेच आहेत. हा छंद सुरू केल्यापासून माझी निरीक्षणशक्तीही आपोआप तीक्ष्ण झाली आहे. घराच्या आजूबाजूला सतत येणारा सुतारपक्ष्याचा आवाज मी या आधी कसा ऐकला नव्हता!? ज्या डोंगरावर मी कायम जात होतो तिथे देशभरातून लोक 'एलिगंट ट्रोगन' पहायला येतात, तो मला पूर्वी कसा दिसला नव्हता या गोष्टींचे आता नवल वाटते.

Elegant Trogon.

वाघ, सिंह प्राण्यांप्रमाणेच दुर्मीळ पक्षी बघण्यातील आनंदही सहज मिळवता येण्यासारखा आहे. विशेषत: माझ्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर, ताशी चारशे किलोमीटर वेगाने झेप घेणारा जगातील सर्वात वेगवान असा बहिरी ससाणा शिकार करताना बघायला मिळत असेल तर! जिथे मी अनेक वर्षं राहतो आहे, त्या भागातील अनेक निसर्गरम्य ठिकाणी मी नवनवीन पक्ष्यांच्या शोधार्थ प्रथमच गेलो.

बहिरी ससाणा (Peregrine Falcon)

शहरी रहाटगाडग्यात मनुष्याने निसर्गाला हळूहळू दूर लोटले असले, तरी संधी दिल्यास तोच निसर्ग सहज तुमच्या अंगणात परत येईल, हे टाळेबंदीतल्या सक्तीच्या घरी राहण्याने दाखवून दिले आहे. माझ्या बाल्कनीत चिमण्या आणि फिन्च आता रोज दाणे खायला येत आहेत. संत्र्याची फोड खायला स्थानिक सुतारपक्षी सकाळी येऊन जातो. बाल्कनीत टांगलेल्या साखरेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी इनमीनतीन-सव्वातीन इंचांच्या दहा-बारा हमिंगबर्ड्सची एकमेकांवरची दादागिरी तर आता रोजचीच झाली आहे. समोरच्या झाडावरील रिकाम्या घरट्यात काही महिन्यांत घुबडांची पिलं असतील. समोरच्या खोलीत काम करत असताना माझ्या बाल्कनीचा दरवाजा आता सतत उघडाच असतो आणि लॅपटॉपच्या शेजारी आता कायम दुर्बीण असते. कोणतातरी दुर्मीळ पक्षी माझ्या बाल्कनीत कधीतरी येईल याची मी वाट पाहतो आहे!

 

प्रथम प्रकाशित: ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०२०


Monday, December 21, 2020

गुरू-शुक्र यांची पिधान युती - ग्रेट कन्जंक्शन

 ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात ज्यांना पिधान युती असे म्हटले जाते. गुरू आणि शनि या आपल्या सौरमालेतील दोन सर्वात मोठ्या ग्रहांची पिधान युती 21 डिसेंबरला जगभरातून दिसली. दोन मोठ्या ग्रहांची पिधान युती असल्यामुळे याला ग्रेट कन्जंक्शन असे म्हटले गेले. सुर्यास्तानंतर गुरू आणि शनी एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक दशांश कोन इतके जवळ आले.

फोटोत गुरूचे तीन चंद्र,  शनी ग्रह, शनीभोवती असणारी कडा आणि शनीचा चंद्र टायटन दिसत आहेत. 

 
 
गुरु आणि शनी एकमेकांपासून दूर जाऊ लागतील. येत्या दोन तीन दिवसात ही युती पहायची चांगली संधी आहे.
 
 

Sunday, November 1, 2020

डळमळलेल्या जगातून - अमेरिकेचे भवितव्य टांगणीवर

अमेरिकेसह जगभरात या निकालाबद्दल आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे. ट्रम्प यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
जवळजवळ चार वर्षांपुर्वी, ट्रंप यांच्या निवडणूकीनंतर, लिहलेल्या एका छोट्याश्या लेखाचा शेवट वरील दोन ओळींनी मी केला होता. येत्या मंगळवारी येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर चार वर्षांत ट्रंप यांनी जागतिकस्तरावर काय काय गोंधळ घालून ठेवला आहे याचा थोड्क्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न. सविस्तर आढावा घेण्यास अनेक पुस्तके पुरणार नाहीत अशी भिती वाटते.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक घडामोडींत आंतरराष्ट्रीय संघटनांचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या देशांनी मिळून यातील काही संघटनांची प्रथम निर्मिती केली. दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी तत्कालिन अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन रूझवेल्ट यांनी इंग्लडचे पंतप्रधान चर्चिल यांना विश्वासात घेऊन युनायटेड नेशन्स (UN) ची संकल्पना प्रथम कागदावर उतरवली. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनंच्या कार्याने आजच्या ग्लोबल ऑर्डरची वीण शिवलेली आहे.

नोबेल पुरस्काराने गौरवलेल्या युएनच्या (UN) 'पीसकिपींग फोर्सने' जगातील अनेक तंटे सोडवण्यात महत्त्वाचे कार्य केले आहे. यामध्ये आफ्रिकेतील अनेक यादवी युद्धं, दक्षिण अमेरिकेतील युद्धं आणि बंड, युरोपमधील युगोस्लाव्ह युद्ध आणि बोस्नियन युद्ध, मध्य पुर्वेतील तंटे, आशिया खंडातील भारत-पाकिस्तान, इंडोनेशिया-तिमोर, रशिया-अफगाणिस्तान या आणि अशा अनेक ठिकाणी या फोर्सने शांतता राखण्यास मदत केलेली आहे. पिसकीपींग फोर्सच्या वार्षिक खर्चातील सुमारे 28% योगदान अमेरिका करते (2019 साल).अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही युएनचीच एक संस्था आहे. जागतिक आरोग्य उत्तम राखण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या या संस्थेच्या यशाच्या निवडक नोंदी म्हणून देवीचे (smallpox) निर्मुलन, पोलियेचे जवळजवळ उच्चाटन, मलेरीया, टीबी, इबोला आणि एड्स यांसारख्या रोगांवर अटकाव यांसारखी उदाहरणं देता येतील. WHO च्या वार्षिक खर्चातील सुमारे 16% योगदान अमेरिकेने 2018 साली केले. बील गेट्स यांनी त्याशिवाय 10% योगदान दिले. अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

ग्लोबलायझेशनमुळे आंतराष्ट्रीय व्यापाराचे नवल आता उरलेले नाही. जागतिक व्यापाराच्या नियमनावर देखरेख करणारी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाईझेशन (WTO) ही सुद्धा युएनचीच एक संस्था आहे. देशांमधील परस्पर व्यापार सुकर करण्यास आणि व्यापारातील तंटे सोडवण्यात ही संस्था मदत करते. WTO च्या वार्षिक खर्चातील सुमारे 12% योगदान अमेरिका करते. अमेरिका हा सर्वाधिक योगदान करणारा देश आहे.

यांचबरोबर NATO, IMF, World Bank, UNESCO यांसारख्या संघटनांच्या कार्यात अमेरिकेचा वाटा मोठा राहीलेला आहे. आणि म्हणूनच, आजच्या 'वर्ल्ड ऑर्डरमधील' अमेरिकेचे स्थान वादातीत आहे.

ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच या वर्ल्ड ऑर्डरला सुरूंग लावण्यास सुरवात केली आहे. ट्रंप यांनी युएनच्या बजेटमध्ये मोठ्याप्रमाणावर कपात केली आहे. या कपातीचा मोठी झळ युएनच्या 'पीसकिपींग फोर्स'ला लागणार आहे. ट्रंप यांनी जागतिक साथीच्या (pandemic) काळात WHO तून अमेरिकेची माघार घोषीत केली आहे. शिवाय, ट्रंप यांनी WTO बद्दल केलेल्या विधानांकडे पाहता अमेरिका WTO मधूनही माघार घेण्याची शक्यता आहे.

Trans Pacific Partnership (TPP)

राष्ट्राध्यक्षपद स्विकारताच ट्रंप यांनी प्रशांत महासागरातील 12 देशांनी एकत्र येऊन केलेल्या TPP मधून माघार घेतली. उरलेल्या 11 देशांनी अमेरिकाला वगळून नविन स्वतंत्र करार केला. आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनविरुद्ध एक मोठी आघाडी उघडण्याची संधी ट्रंप यांनी घालवली. यांच्या बेभरवशी अमेरिकेच्या कारभाराची ही सुरवात होती. चीन बरोबर दोन वर्ष करयुद्ध खेळल्यानंतर अमेरिकेला TPP मध्ये आता सामिल होण्याची इच्छा आहे असेही ट्रंप यांनी बोलून दाखवले.

पॅरीस क्लायमेट अग्रीमेंट   

ग्लोबल वॉर्मिंगविरोधात लढा देण्यासाठी जगातील 196 देशांनी केलेल्या पॅरिस क्लायमेट अग्रीमेंट मधून 2017 साली ट्रंप यांनी माघार घेतली. या निर्णयामुळे ट्रंप यांनी अमेरिकेला इराण, येमेन, टर्की यांसारख्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले. ट्रंप यांच्या या निर्णयाचा विरोध जगभर झालाच पण अमेरिकेतील अनेक राज्यांनी या करारानुसार प्रदुषणात अटकाव आणण्याचे धोरण आम्ही कायम ठेऊ असे जाहीर केले.    

ईराण अणुशस्त्र करार (Iran Nuclear Deal) 

2015 साली  अमेरिका, रशिया, चीन, इंग्लड फ्रान्स, जर्मनी आणि युरोपीयन युनियनने इराणबरोबर अणुशस्त्र निर्मिवर निर्बंध लावण्यास केलेल्या करारातून ट्रंप यांनी 2018 साली माघार घेतली. अमेरिकेशिवाय करार चालू राहील अशी घोषणा इतर देशांनी केली. अमेरिकेच्या या आक्रस्ताळेपणामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेस इजा झाली आहे असे वक्तव्य युरोपीयन युनियन कमिशनचे अध्यक्ष यांनी केले. जागतिक महासत्ता म्हणून अमेरीकेची जागा आता युरोपने घेण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले.

 रशिया अणुशस्त्रनिर्बंध करार 

रशियाबरोबरच्या शीतयुद्धात झालेल्या शस्त्रनिर्मिती युद्धास (arms race) अटकाव घालण्यात अनेक आंतरराष्टीय करारांची मदत झाली. Open Skies Treaty, ज्यात करार केलेल्या देशांना विमानातून सर्वेक्षण करण्याची परवानगी होती, त्यातून ट्रंप यांनी माघार घेतली. शीतयुद्धानंतरच्या शांततेत महत्वपुर्ण ठरलेल्या शस्त्र-करारांपैकी फक्त एकच करार अमेरिका आणि रशिया यांमध्ये उरला आहे ज्याची मुदत येत्या फेब्रुवरीत संपते आहे. ट्रंप जर पुन्हा निवडून आले तर ह्या कराराची मुदत वाढण्याची शक्यता नाही. यामुळे शीतयुद्धानंतरच्या शांततेस तडा बसतो की काय अशी काळजी जगातील नेत्यांना लागली आहे.

North Atlantic Treaty Organization (NATO) 

दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण केलेल्या या संघटनेत आता उत्तर अमेरिका आणि युरोपमधील 30 देश समाविष्ट आहेत. या संघटनेतील करारानुसार या मधील कोणत्या एका देशावर हमला झाला तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी इतर संघटनेवरील देशांवर आहे. NATO मधील अनेक देशांत अमेरिकेचे सैन्य आहे. ट्रंप यांनी वेळोवेळी NATO वर टिकेची झोड उडवलेली आहे. NATO आता काल बाह्य झालेली आहे असे विधान (विशेषत: रशियाच्या पुर्व युरोपमधील ढवळाढवळीच्या पार्श्वभुमीवर) करून ट्रंप यांनी NATO देशांच्या नेत्यांमध्ये ट्रंप यांचा उद्देशाविषयी चिंता निर्माण केली आहे. ट्रंप NATO मधून माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रंप यांनी या कराराशी आपण एकनिष्ठ आहोत असे जाहीर करावे या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा निवडून आल्यास ट्रंप NATO मधून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जागतिकीकरणात आंतरराष्ट्रीय सहकार्यात आघाडीवर असणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रंप यांनी युनायटेड नेशन्सच्या अधिवेशनतात भविष्य जागतिक सहकार्याचे नाही असे बोलून दाखवले. (हे भाषण प्रॉम्प्टवरून वाचून दाखवताना ट्रंप याच्या चेहर्‍यावरील माशीही हलणार नाही असे ढिम्म भाव होते!)

याच बरोबर ट्रंप यानी अनेक देशांबरोबर व्यापारी युद्ध सुरू केले आहे. युरोपिय युनियनवर उगारलेल्या व्यापारी युद्धाच्या पार्श्वभुमीवर युरोपियन युनियन कॉंन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी "असले मित्र असताना शत्रूंची काय गरज" असे बोलून दाखवले.

पारंपरिक मित्र देशांची निंदा-नालस्ती करताना ट्रंप यांनी हुकमशहांचे मात्र कौतुक चालू ठेवले आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो, नॉर्थ कोरीयाचे किम, फिलीपीन्सचे ड्युटर्टे, रशियाचे पुतीन यांची सतत स्तुती करतानाच त्यांनी केलेल्या दडपशाहीबद्दलही ट्रंप यांनी वेळोवेळी समर्थन दर्शविलेले आहे.

एकंदरीतच जगात हुकुमशहांचे प्रस्थ वाढत आहे. लोकशाहीच्या या घसरणीत अमेरिका नेहमीप्रमाणे अटकाव घालण्याचे प्रत्यत्न तर करत नाहीच आहे, उलट खुद्द अमेरिकेत ट्रंप यांनी लोकशाहीचे पाय भुसभुशीत करून ठेवले आहेत. अमेरिकेच्या मित्र देशांचा अमेरिकेवर भरवसा राहिलेला नाही. जागतिक संघटना कमकुवत झालेल्या आहेत. ज्या ओव्हल ऑफिसमधून एकेकाळी जागतिक राजकारणाची सुत्रे हलविली जात होती, ते आता बेभरवशाचे झालेले आहे. आपल्या लोकशाही, स्वातंत्र्य इत्यांदी तत्वांची फुशारकी मारणार्‍या अमेरिकेतच ही तत्वं धोक्यात आलेली आहेत. अमेरिकेच्या माघारीमुळे रशिया आणि चीन यांचे प्रस्थ झपाट्याने वाढत आहे.  पुतीन यांनी तर 'उदारमतवाद कालबाह्य झाला आहे' असा दावाही केला आहे.

ट्रंप जर पुन्हा निवडून आले तर ही अमेरिकेची आणि पर्यायाने पाश्चिमात्य जगाने निर्माण केलेल्या ग्लोबल ऑर्डरची घसरण झपाट्याने होईल यात शंका नाही. पहिल्या चार वर्षांत ट्रंप यांची निर्बंध वागणूक पाहता पुढील चार वर्षांत ते काय करू शकतात याची कल्पना करणेही अवघड आहे. ट्रंप जरी हरले तरी अमेरिकेच्या ढासळलेल्या प्रतिमेची पुर्नबांधणी करण्यास किती वेळ लागेल हे सांगणे अवघड आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांना आता अमेरिकेच्या भरवशावर राहता येणार नाही. पुन्हा दुसरा ट्रंप भविष्यात अमेरिका निवडून आणणारच नाही याची शाश्वती देता येणार नाही. संपुर्ण जगाच्या पुढील वाटचालीवर परिणाम करण्याची शक्यता असलेल्या या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीवर जगाचे लक्ष लागून राहिले आहे यात शंका नाही.

Saturday, September 5, 2020

Eared Quetzal

 Eared Quetzal is a rare and elusive bird native to Mexico. Very few birds are seen and extremely rarely they visit the mountains of southern Arizona. When it was seen in June this year (2020), the American Birding Association(ABA) called it "arguably the best bird of the year"!

I wasn't aware of it nor was I birding then. But, recently two birds were seen, perhaps a couple and this time I decided to go see them. 

This bird is so rare and sough after that I met people who had come from all over to get a glimpse. Some from California, some from Texas and even some from as far East as New York!!

The Rucker Canyon in Cochise county Arizona is located in the Chiricahua Mountains. The canyon is fairly remote and doesn't seem to get many visitors unlike other popular places in Arizona. The trail where the birds are seen is also not maintained- a lot of fallen trees and fire damaged trees (from 2011) can be clearly seen. That adds to the charm to this place, in my opinion. Perhaps that is exactly why these rare elusive birds decided to call it a home? Who knows!

Here are some pictures of the birds that I took on 4th of September 2020. Tuesday, September 1, 2020

Neotropic Cormorant at Reid Park (Tucson)- 4K (+)

 

Neotropic Cormorant (Hi-Resolution Image)

Tuesday, August 18, 2020

A Warbler and the Hawks

 Louisiana Waterthrush is another rare bird to visit Tucson this August (2020). This bird breeds in the eastern United States and by fall returns to central America. Very rarely some stragglers are spotted in the southwestern United States, this is one of them. It was spotted fairly close to me and I decided to go have a look.

I arrived at the reported location by a small pond where it was supposed to be and I noticed quite a few Cooper's hawks exactly where the bird was supposed to be. That, to me, was a bad sign. With so many predators, there is no way the bird is going to come out. Worse, the hawks might have had the rare meat!

I decided to go closer to the hawks and see if I can spot the waterthrush. As I got close a few of the hawks flew away. To my surprise, the waterthrush flew in after a few mins and started foraging right under the nose of the hawks!

Louisiana Waterthrush
 
 
Surprisingly, the bird did not seem to scared of the hawks. It was also joined by some other warblers, including yellow warbler, while it was foraging alongside the water. Every now and then one of the juvenile hawks will fly towards these birds. Other warblers would fly away. The waterthrush would fly just out of the reach but will still not be too far. It will make some agitated calls to show displeasure at the hawk and will return to foraging fairly quickly. This happened a few times while I was there.
 

In the video below, you can see how close the bird was to the hawks while foraging. It also gives you an idea how close I was.  The hawk is sitting where the waterthush was moments ago.
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 

Saturday, August 8, 2020

Sunday, August 2, 2020

Black-headed GrosbeakBlack-headed Grosbeak

Monday, July 13, 2020

धुमकेतू Neowise कुठे पहावा?

सध्या आकाशात साध्या डोळ्यांनी दिसणारा एक धुमकेतू आलेला आहे. या धुमकेतूचा शोध नुकताच काही महिन्यांपुर्वी लागला. जेव्हा शोध लागला तेव्हा हा धुमकेतू सुर्याकडे झेपावत होता. धुमकेतू आपल्या सुर्यमालेतील ग्रहांप्रमाणेच सुर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.

काही धुमकेतूंची प्रदक्षिणा सुर्य ते गुरूग्रहाच्या आसपास असते. याप्रकारचे धुमकेतू सुर्याभोवती प्रदक्षिणा काही दशकांत पुर्ण करतात. प्रसिद्ध हॅलेचा धुमकेतू साधारण 76 वर्षांनी दिसतो.

Neowise (C/2020 F3) हा धुमकेतू मात्र काही हजार वर्षांत एक प्रदक्षिणा पुर्ण करेल. धुमकेतू नविनच असल्याने प्रदक्षिणेचा काल अजून पुर्णपणे निश्चित झालेला नसला तरी साधारण सात हजार वर्षांचा परिवनलकाल असावा असा सध्याचा अंदाज आहे.

आपल्या सुर्यमालेत अनेक धुमकेतू आहेत, पण डोळ्यांनी दिसतील असे फार थोडे धुमकेतू बघावयास मिळतात. म्हणूनच सध्या चर्चेत असलेला निओवाईज धुमकेतू पाहण्याची पर्वणी सोडू नये.

अनेकांनी हा धुमकेतू कसा पहावा असे मला विचारल्यामुळे मी ही एक छोटीशी पोस्ट लिहीण्याचे ठरविले. जेणेकरून मला प्रत्येकाला स्वतंत्र उत्तर द्यावे लागणार नाही.

पुढील दोन तीन दिवसांत, बहुतेक ठिकाणांहून (उत्तर गोलार्धात) धुमकेतू सुर्यास्तानंतर दिसू लागेल. निओवाईज आता सुर्यापासून लांब निघाल्याने हळूहळू फिका होत जाईल आणि डोळ्यांना दिसणे अवघड होत जाईल. पण तरी अजून दोन-तीन आठवडे तरी तो डोळ्यांनी दिसला नाही तरी दुर्बिणीतून दिसू शकेल आणि क्यामेर्‍यातही टिपता येईल असे वाटते.

खालील चित्रात (चित्र क्र.1) मी धुमकेतूचा मार्ग 14 जुलै 2020 ते 25 जुलै पर्यंतचा पिवळ्या रेघेने दाखवला आहे. चित्र साधारण सुर्यास्ताच्यानंतर 30 मिनीटांचा काळ दर्शवते. चित्रातील धुमकेतूची जागा हे अमेरिकेतील अरिझोना राज्य आहे. आकाशातील नक्षत्रांची जागा तुम्ही कुठून बघत आहात आणि कोणत्या वेळी बघत आहात यानुसार अर्थातच थोडीफार वेगळी असेल. मात्र जर नक्षत्रांच्या तुलनेत धुमकेतूची जागा कुठूनही बघितलीत तरी तीच असेल. सोपे पडावे म्हणून मी माझ्या जागेवरील चित्र काढले आहे. (चित्रावर क्लिक केल्यास मोठे चित्र दिसेल.)


खालील चित्रा सप्तर्षी (Ursa Major) नक्षत्र दिसत आहे. सप्तर्षी नक्षत्रातील बरेचसे तारे अनेक शहरांतील प्रकाशप्रदुषित (light pollution) आकाशातही दिसतात. धुमकेतू त्या नक्षत्रात असल्याने सप्तर्षीतील तार्‍यांचा वापर करून तो शोधता येईल.चित्र क्र. 1- धुमकेतूचा मार्ग

सर्वप्रथम सप्तर्षी नक्षत्र शोधा. खालील दोन चित्रात (चित्र क्र. 2) सप्तर्षी नक्षत्र कसे शोधायचे ते दाखवले आहे. ध्रुवतारा जर दिसत असेल तर सप्तर्षी शोधणे सोपे जाते. पण ध्रुवतारा फिका असल्याने मोठा शहरांतून दिसेलच असे नाही.

सप्तर्षीच्या चोकोनाकृती तार्‍यातील दोन तार्‍यांकडून एक रेघ काढली तर ती ध्रुवतार्‍याच्या दिशेने जाते.  या तार्‍यांचे नाव क्रतु (Dubhe) आणि पुलह (Merak). सप्तर्षी नक्षत्रातील Mizar म्हणजे वसिष्ठ अनेकांच्या ओळखीचा असतो.


चित्र क्र. 2- सप्तर्षी आणि ध्रुवतारा


एकदा सप्तर्षी नक्षत्र सापडले की साधारण अंतराचा अंदाज घेऊन धुमकेतू सहज शोधता येईल. चित्र क्रं 1 मधील तारखांवरून धुमकेतूचे सप्तर्षीतील तार्‍यांपासूनच्या अंतराजा अंदाज लावा आणि त्याजवळपास धुमकेतू दिसतो का पहा.

खालील चित्रात (चित्र क्रं 3) 18 जुलै च्या सुर्यास्तांतर धुमकेतू कुठे दिसेल हे (कॅलिफोर्निया प्रमाण वेळ) उदाहरण दाखवले आहे.

वसिष्ठ पासून पुलह (Meerak) वर रेघ काढून जर ती पुढे वाढवत न्हेली तर पुलह पासून धुमकेतू साधारण 20 अंश अंतरावर असेल.

सप्तर्षीतील इतर तारे दिसत असतील चित्र क्रं 1 चा वापर करून धुमकेतू शोधणे अगदीच सहज व्हावे.

चित्र क्र. 3- सप्तर्षी आणि ध्रुवतारा


अवकाशातील गोष्टींतील अंतर हाताने कसे मोजायचे ते खालील चित्रात दाखवले आहे.(चित्रे येथून साभार.)
उदा. हात लांब करून करंगळी समोर धरल्यास करंगळीची रुंदी साधारणपणे 1 अंश (डिग्री) इतके अवकाशातील अंतर दर्शवते.

 


इंटरनेटरवर धुमकेतू शोधण्यास अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी Stellarium आण  Heavens-above यांचा वापर तुम्ही करू शकता. Stellarium कंप्युटवर आणि फोन दोन्हीवर इन्स्टॉल करता येते.