Monday, November 28, 2016

जग सगळे डळमळले ग!

पत्रपंडित आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकरांचा ‘…नवल वर्तले गे’ हा ११ नोव्हेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेला लेख वाचून डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अगदी स्वाभाविक आणि सुस्पष्ट होता आणि वर्तमानपत्रं इत्यादी हे उघड सत्य पाहू शकले नाहीत, असा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. तळवलकरांनी लेखात अनेक मतं कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा दाखल्याशिवाय मांडलेली आहेत, वैयक्तिक निरीक्षणांवरून निष्कर्ष काढलेले आहेत आणि काही आरोपही निष्काळजीपणे केलेले आहेत.
तळवलकर म्हणतात ट्रम्प यांना निवडणुकीत घसघशीत यश मिळालं. वास्तविक ही निवडणूक अटीतटीची झाली. हिलरी क्लिंटन जिंकणार असे अंदाज जवळजवळ सगळ्यांनीच मांडले होते. त्यात व्हिस्कॉन्सिन, मिशीगन, पेन्सिल्व्हेनिया आणि न्यू हॅम्पशायर, ही राज्यं त्यांच्याकरता निर्णायक आहेत असं सांगितलं जात होतं. ढासळत्या औद्योगिक अर्थव्यवस्थेमुळे या राज्यांना ‘रस्ट बेल्ट’ असं म्हणतात. यातील केवळ न्यू हॅम्पशायरमध्ये क्लिंटन यांना आघाडी मिळाली. व्हिस्कॉन्सिनमध्ये सुमारे २७ हजार मतांनी क्लिंटन यांचा पराभव झाला (एकूण मतं सुमारे २८ लाख). पेन्सिल्व्हेनियामध्ये त्या सुमारे ६८ हजार मतांनी हरल्या (एकूण मतं सुमारे ५८ लाख. ओबामा २०१२ ला इथं सुमारे ३ लाख मतांनी जिंकले होते) आणि मिशिगनमध्ये त्या सुमारे ११ हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या (एकूण मतं सुमारे ४६ लाख).  त्याशिवाय, फ्लोरिडा राज्यातील अटीतटीच्या निवडणुकीत क्लिंटन यांचा सुमारे १.२ लाख मतांनी पराभव झाला (एकूण मतं सुमारे ९१ लाख). या आकड्यांकडे पाहिल्यावर निवडणूक एकतर्फी झाली नाही हे सहजपणे दिसून येतं.

अमेरिकेतील निवडणुकीबाबत अनेकांना ही माहिती नसावी. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत दर आठवड्याला हजारो लोकांना फोन करून, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांचा कल घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशा जनमत चाचण्या अनेक संस्था घेतात आणि खुद्द निवडणुकीत असणारे स्वतःही अशा जनमत चाचण्या घेतात. त्यावरून आपला प्रचार कोणत्या राज्यात, कोणत्या मुद्द्यांवर करायचा हे ठरवलं जातं. हे इतकं काटेकोरपणे केलं जातं की, अनेकदा एखादा शब्द, एखादं वाक्य जप केल्याप्रमाणे प्रचारात बोललं जातं. ट्रम्प यांच्या बाजूनं घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्येसुद्धा अशा निकालाची पूर्वसूचना त्यांना मिळालेली नव्हती. थोडक्यात, जनमत चाचण्या घेणारे पक्षपाती होते, असं जे चित्र तळवलकरांनी रंगवलेलं आहे, त्यात फारसं तथ्य नाही.

तळवलकरांनी आपल्या लेखात ट्रम्प यांच्या कॅरॅक्टरवर विशेष प्रकाश न टाकता क्लिंटन यांच्याबद्दल बरंचसं लिहिलं आहे. ट्रम्प यांनी गेल्या १७-१८ महिन्यांत वाट्टेल तशी विधानं केली. व्हिएतनाम युद्धात कैदेत सापडलेल्या जॉन मकेन यांना ‘पकडले गेले म्हणून नामर्द’ असं संबोधलं. प्रतिस्पर्ध्यांशी शाळकरी मुलांना लाजवेल अशी भाषा ट्रम्पनी वापरली. एका प्रतिस्पर्धी महिलेविषयी ‘अशा दिसणाऱ्या स्त्रीला कोण निवडून देणार’ असे अनुदगार तिच्या दिसण्याबद्दल काढले. ट्रम्प यांचा आक्रस्ताळेपणा इतका वाढला की, त्यांच्याच पक्षाने त्यांच्याशी संबंध तोडले. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी ट्रम्प यांची निंदा केली. त्यांचा प्रचार इतका लाजिरवाणा होता की, ते जिंकण्याची शक्यता कोणालाच वाटली नाही, यात फार आश्चर्य का नाही हे तो प्रचार सातत्यानं पाहिलेल्याला सहज समजण्यासारखं आहे.

ट्रम्प यांची स्वतःची अशी कोणतीही ठाम राजकीय मतं नाहीत. गेल्या दीड वर्षांत त्यांनी जवळजवळ सर्वच बाबतीत कोलांट्याउड्या मारलेल्या आहेत. परराष्ट्र धोरण, संरक्षण खातं वगैरे तज्ज्ञांना खुशाल मूर्ख म्हणून आपल्यालाच सगळं कळतं असा घोष ट्रम्प यांनी सतत लावलेला होता. “मी जरी भर रस्त्यात कोणाला बंदुकीची गोळी मारली तरी माझे मतदार मलाच मत देतील” अशी आपल्या मतदारांची तारीफ त्यांनी स्वतःच केलेली आहे. हे सगळं होत असताना ट्रम्प यांच्या गोटातील लोकांची मात्र फार पंचाईत होत होती. त्यांचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार माईक पेन्स यांच्यावर कित्येकदा ट्रम्प यांनी जे म्हटलं आहे, ते त्यांनी कसं म्हटलंच नाही असं स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, ट्रम्प यांच्या सल्लागारांनी त्यांचा फोन काढून घेतला, कारण ते मध्यरात्री वाटेल तशा 'ट्वीट्स' करून रोज नवा गोंधळ निर्माण करत होते. या सगळ्याचा परिणाम होऊन ट्रम्प यांची वागणूक राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पात्रतेची नाही, असं अनेकांचं मत झालं आणि ते आजही तसंच आहे.

अमेरिकेत या वर्षी २३ कोटी १० लाख मतदारांपैकी सुमारे ५७ टक्के लोकांनी मतदान केलं. (२०१२ साली ५८.६ टक्के तर २००८ साली ६१ टक्के लोकांनी मतदान केलं होतं.) क्लिंटन यांनी देशभरातील जवळजवळ सर्वच मोठ्या शहरांमध्ये मताधिक्य मिळवलं आहे. तळवलकरांनी आफ्रिकन-अमेरिकेन लोकांची मतं ट्रम्पला गेल्याचं वरवर म्हटलेलं आहे. सुमारे ८८ टक्के आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या लोकांनी क्लिंटन यांना मत दिलं आहे असं दिसतं. ट्रंप यांनी, विशेषतः वर उल्लेखलेल्या तीन महत्त्वाच्या राज्यांत, खेडोपाडी विजय मिळवला. तेथील बहुसंख्य गोऱ्या वंशाच्या, अशिक्षित आणि तुलनेनं कमी शिक्षित मतदारांनी ट्रम्प यांना क्लिंटन यांच्यापेक्षा जास्त मतं दिली.

अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या ठराविक 'वोट बॅंक्स' आहेत. ५० राज्यांपैकी १२-१५ राज्यं सोडली तर इतर राज्यं कोणाला निवडून देणार, हे निवडक अपवाद सोडल्यास साधारणपणे ठरलेलं असतं. वांशिक, भाषिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी विविधतेनं नटलेल्या बहुसंख्य जागी डेमोक्रॅटिक पक्ष निवडून येतो, तर गोरे, इव्हँजेलिकल ख्रिस्ती लोक सहसा रिपब्लिकन पक्षाला मतं देतात. वर उल्लेखलेल्या रस्टबेल्टमध्ये अशा गोऱ्या, इव्हँजेलिकल ख्रिस्ती लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, बंद पडलेल्या कोळसा, खनिजं इत्यादींच्या खाणी, जागतिकीकरणाच्या प्रवाहात परदेशी गेलेल्या चारचाकी आणि इतर उत्पादन कंपन्यांच्या नोकऱ्या, यामुळे या वर्गाची हेळसांड झालेली आहे. (यातील बऱ्याच नोकऱ्या भारत आणि चीन या देशांमध्ये गेल्या आहेत.) त्याच वेळेला शैक्षणिक पातळीमुळे 'हायटेक' अर्थव्यवस्थेत जम बसवणं या वर्गास खडतर आहे. या वर्गाला ट्रम्प यांनी या नोकऱ्या परत आणण्याचं आश्वासन देऊन भूल पाडली.

ट्रम्प यांचा शिवराळपणा, आक्रस्ताळेपणा, इतरांविषयी काढलेले अनुदगार यांमुळे त्यांच्या समर्थकांनी जनमत चाचण्या घेणाऱ्यांना आपण ट्रम्प यांना मत देऊ असं सांगितलं नसण्याची शक्यता आहे. वरील तिन्ही राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये गतवेळेपेक्षा वाढ झाली आहे. त्याच वेळेला क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या बालेकिल्ल्यांत मिळालेली मतं साधारण गतवेळेप्रमाणेच आहेत. ट्रम्प यांना या राज्यांत मिळालेले गतवेळेपेक्षा अधिकची मतं ही खेड्याराड्यातील आहेत. मतांचं हे गणित अर्थातच यापेक्षा बरंच गुंतागुंतीचं आहे आणि ते सोडवण्याचं काम दोन्ही पक्षांना करावं लागणार आहे.
अमेरिकेसह जगभरात या निकालाबद्दल आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे. ट्रम्प यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तळवलकरांचा मूळ लेख पुढील दुव्यावर वाचता येईल –
https://goo.gl/KrnWJs

सदर लेख प्रथम अक्षरनामावर प्रकाशित झाला. तो या दुव्यावर पाहता येईल.http://www.aksharnama.com/client/article_detail/192

Tuesday, June 7, 2016

स्ट्रिप-क्लबात निळोबा

शार्लटला राहायला येऊन आठवडा-दोन आठवडेच झाले असतील. इथल्या लोकांच्या ओळखीपाळखीही अजून नीट झाल्या नव्हत्या. आठवड्यातले सहा दिवस रोज बारा-तेरा तास काम करून वैताग आला होता. अशात आलेली सोशलायझिंगची पहिली संधी मी तत्काळ स्वीकारली. नवीन मित्रमंडळींपैकी एकाचं लग्न ठरलं होतं, त्यानिमित्त पार्टी. ब्याचलर पार्टी.
अमेरिकेत येणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारचे लोक हाटेलात वगैरे गेल्यावर दमडी-दमडी वाचवण्याकरता न चुकता 'वॉटर विथ नो आईस' मागवणारे, आणि दुसरे म्हणजे अमेरिकेत आल्यावर महिन्याभराच्या आत स्ट्रिप-क्लबाला भेट देणारे. आम्ही अर्थातच पहिल्या प्रकारचे. म्हणूनच ब्याचलर पार्टीचं आमंत्रण स्वीकारलं, तेव्हा आमची ट्यूब पेटली नाही यात आश्चर्य ते काय! (याअगोदरची अामची ब्याचलर पार्टीची पराकाष्ठा म्हणजे आम्ही नवरदेवाला घेऊन बोलिंगला गेलो होतो!) ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पार्टीकरता सजूनधजून आलेली मंडळी पाहताच मात्र माझी ट्यूब लख्ख पेटली. कोणाच्याही दीड फूटापेक्षा जवळ जाण्याची शक्यता नसल्याने मी त्यानुसार हवी तेवढीच स्वच्छता बाळगून आलेलो होतो. तुम्ही एखाद्याच्या किती जवळ जाणार आहात त्यानुसार किमान हायजीन तुम्ही पाळलाच पाहिजे, अशा मताचा मी आहे. अमेरिकेत आल्यापासून तर सगळी इंद्रियं ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये गेलेली असल्याने ही मर्यादा सततच जाणवत असते. (एके काळी माझ्या बसक्या नाकाच्या फुगलेल्या नाकपुड्या अजिबातच न झाकता मी उघड्या गटारांच्या बाजूने चालू शकत होतो, यावर आता माझाच विश्वास बसत नाही.) कोलगेटच्या जाहिरातीत दाखवतात, तसं मी तोंडाचा वास वगैरे येतोय का हे तपासलं. (मला अाजवर एकदाही वास अालेला नाही.) जेवायलाच जायचं आहे असं वाटल्याने मी च्युइंगमही चघळत नव्हतो. (च्युइंगम चघळायची सवय वाईट अाहे असं म्हणणार्‍या लोकांची नाकं फिनाईलनी स्वच्छ करून त्यांना इतरांच्या तोंडाचा वास घ्यायला लावलं पाहिजे.). त्यातल्या मेंथॉलने जिभेची पार चवच जाते. ही समस्या कशी सोडवावी याचा विचार मी करत होतो, तेवढ्यात कोणीतरी कॅशचा विषय काढला. स्ट्रिप-क्लबात जायचं म्हणजे कॅश लागणार! माझ्या पाकिटात मोजून सव्वातीन डॉलर्स होते! (उगाच कोणीतरी रस्त्यात लुटलं, तर बांबू बसायला नको!) इतर लोकांकडेही पुरेसे पैसे नसावेत म्हणून एटीएमला जायचं बहुमतानं ठरलं. आता स्ट्रिप-क्लबात जायला पुरेसे पैसे म्हणजे किती? (एरवी कुठेही जायचं म्हणजे माझा रिसर्च झालेला असतो. कुठे कशाला किती पैसे द्यायचे ह्याचा अंदाज असलेला बरा! त्या बाबतीत मी अगदी 'व्हैव्हारी' मनुष्य आहे.) आजूबाजूचे लोक किती काढताहेत याचा अंदाज घेऊन, दोनशे डॉलर्स पुरावेत असा विचार मी केला. (पहिल्याच वेळी हात जरा आखडता ठेवलेलाच बरा!) पण खरं सांगायचं तर पुढे काय मांडलेलं आहे त्यासाठी मी अजिबातच तयार नव्हतो! पण आल्या परिस्थितीला जमेल तसं तोंड द्यायचं हा आपला बाणाच आहे. शेवटी तुकारामाने म्हटलेलंच आहे, आलिया भोगासी असावे सादर!
कोणीतरी कोणालातरी सुचवलेल्या एका स्ट्रिप-क्लबापाशी आम्ही पोहोचलो. बाहेर क्लबाच्या नावाची एकच पाटी. सोनेरी अक्षरांना लाल-निळ्या ट्यूबलाईट्सची पातळ बॉर्डर. त्याशिवाय आजूबाजूला फक्त अंधार. अमेरिकेतल्या पोलीस मालिकांमध्ये ड्रग्ज वगैरे गुन्हे करणार्‍या लोकांचा अड्डा असतो तशी ही जागा बाहेरून वाटत होती. आत जाताना विमानतळावर होते त्यापेक्षा कडक तपासणी झाली. क्लबमध्ये कोणतंतरी कर्णकर्कश संगीत चालू होतं. उजवीकडे एक मोठं रिकामं स्टेज होतं. त्याच्या मधोमध एक चकचकीत खांब होता. स्टेजच्या आजूबाजूला खुर्च्या-सोफे वगैरे ठेवलेले होते. खोलीच्या एका बाजूला बार होता. दोन कोपर्‍यांत दोन छोटी स्टेजं होती. त्यावर प्रत्येकी एक खांब होता. मुख्य स्टेज सोडलं, तर इतर ठिकाणी प्रकाश तसा अंधुकच होता. उरलेल्या जागेत जमेल तशी, जमेल तिथे सोफे, टेबलं ठेवण्यात आलेली होती. संपूर्ण खोलीत दोन-चार लोकं सोडली, तर एकंदरीत सामसूमच होती. बारवर चौकशी केल्यावर कळलं, की आम्ही जरा लवकरच आलो होतो. माणसानं नेहमी वेळेआधी पोहचावं याला हाच एकमेव अपवाद असावा.
ड्रिंक्स घेऊन वेळ काढण्याकरता आम्ही बारपाशी स्थिरावलो. काही वेळातच एकेक करून स्ट्रिपर्स त्यांच्या सुटकेसेससह क्लबमध्ये येऊ लागल्या. (एवढ्या मोठ्या सुटकेसेसमध्ये काय आणत असतील ब्वॉ, असा एक वायफळ विचार माझ्या मनात येऊन गेला!) हळूहळू स्ट्रिपर्स तयार होऊन बाहेर येऊ लागल्या. थोड्या वेळातच मला जाणवलं, सगळ्याच स्ट्रिपर्स माझ्यापेक्षा काही शेड्स जास्त गडद होत्या. नवीन ठिकाणी आपल्या आजूबाजूचे चार लोक जसं वागतात, तसं वागावं हे मला चांगलं माहीत होतं. पण इथे आजूबाजूचे चार लोक काय करताहेत हे पाहायचं म्हणजे जरा प्रॉब्लेमच होता. हळूहळू स्ट्रिपर्स बाहेर येऊन वॉर्मअप करू लागल्या. एकीने खांब पकडून सराव सुरू केला. एक स्टेजवर जिम्नॅस्टिक्स का काहीतरी करायला लागली. बाकीच्या अंधारात गिर्‍हाइकांचा माग घेऊ लागल्या. आख्ख्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये फक्त दोन गोरे लोक होते. एका गोर्‍या आजोबांना पहिलंच ड्रिंक चढलं असावं, स्ट्रिपर पाहताच त्यांनी भलतेच किळसवाणे प्रकार करायला सुरुवात केलेली होती. तीन लॅपडान्सेस झाल्यानंतर कोपर्‍यात बसलेल्या गोर्‍या काकांचं चौथ्यासाठी अतिशय ओंगळवाण्या चेहर्‍यानं शोधकार्य सुरू होतं. (त्या क्षणाला माझ्या कातडीचा रंग गोरा नाही, म्हणून मला फार्फार बरं वाटलं.) स्ट्रिपर्सना मात्र या प्रकाराची सवय असावी असं त्यांच्या रिअ‍ॅक्शनवरून वाटत होतं. कितीही क्रीपी अंकल असला, तरी त्या त्याच्याशी हसून बोलत होत्या. पोटेन्शिअल गिर्‍हाइकाशी फ्लर्टिंग करत होत्या, गप्पागोष्टी करत होत्या. हा जॉब जणू काही त्यांची 'फेव्हरिट हॉबी'च आहे असं त्यांचं वर्तन होतं!
जे अगदीच निर्लज्ज नव्हते, ते आवडेल त्या स्ट्रिपरकडे पाहून स्मितहास्य वगैरे करत होते. मग ती जवळ येऊन लाडेलाडे बोलत होती, लगट करत होती आणि मग तिथून पुढे 'व्यैव्हार', एवढं निरीक्षण मी एव्हाना केलं होतं. (शेरलॉक होम्सची पारायणं केल्याचा इतका तरी फायदा झालाय असं म्हणायला हरकत नाही.) पण अजूनतरी कोणाकडेही पाहून चिंगाट बुंगाट झिंगाट वगैरे काहीही मला वाटत नव्हतं. माझी नजर सतत फिरवत ठेवून चुकूनही चुकीचा सिग्नल चुकीच्या व्यक्तीला जाणार नाही याची काळजी मी घेत घेतो. पण मुळात स्ट्रिपर्स जास्त अन्‌ गिर्‍हाइकं कमी असल्याने सुटका नाही हे स्पष्टच होतं. 'हाईली सीक्ड' या गटात आमची गणना होण्याचा हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग! कोणीतरी जवळ येऊन लगट करायला लागल्यावर मात्र भलतंच अवघडायला होत होतं. (लहानपणी आजीने 'मेल्या, नाही म्हणायला शीक आयुष्यात!'चा भडीमार का केला ते आता कळलं!) 'नाही' म्हणलो नाही, तरी नको तिथे 'हो' म्हणायचं नाही; हे मनातल्या मनात घोकलं. पण मी एकटाच नव्हतो, माझ्या बरोबरच्या इतरांनाही माहौल झिंगाट वगैरे वाटत नव्हता. 'दुसर्‍या क्लबात जाऊ या'ची टूम निघाली अन्‌ आम्ही तिथून बाहेर पडलो.
योग्य स्ट्रिप-क्लब शोधण्याचं काम काही उत्साही (की उतावीळ?) लोकांनी आपल्या हातात घेतलं. स्ट्रिप-क्लबांनाही 'येल्प'वरती रेटिंग्ज अन्‌ रिव्ह्यूज् वगैरे आहेत हे नवीन ज्ञान मला झालं. (अन्‌ ते देणार्‍या लोकांविषयी मनातल्या मनात अतीव आदर दाटून आला!) ३.५/५‍पेक्षा जास्ट रेटिंग एकाही क्लबला नव्हतं. (अपेक्षाभंगच लोकांना रेटिंग देण्यास उद्युक्त करत असणार!) चार-पाच लोकांनी (एकाच फोनवर) रिव्ह्यूज् वाचून जवळचाच एक क्लब ठरवला. बाहेर क्लबच्या नावाची फक्त पाटी होती, दिव्यांच्या झगमगाट वगैरे काहीही नव्हतं. त्याकडे पाहून हा स्ट्रिप-क्लब आहे अशी कोणाला शंका सुद्धा आली नसती. क्लबाची एंट्री मागच्या बाजूने होती. क्लबात जायला वय सोडल्यास कुठलीही तपासणी झाली नाही. एंट्री फी मात्र २५ डॉलर्स! (मी मनातल्या मनात उरलेल्या पैशांचा हिशेब केला. सवय.) दारात दोन-तीन ललना मिंट वगैरे तबकात घेऊन उभ्या होत्या. (याला म्हणतात कस्टमर बेस नॉलेज!) हा क्लब मात्र इतका गच्च भरलेला होता, की आम्हां सगळ्यांना बसायला एकत्र जागा मिळेल याबाबत शंकाच वाटत होती. (टेबल रिकामं व्हायला किती वेळ लागेल असं आमच्यातल्या एकाने निरागसपणे विचारून होस्टेसला बुचकळ्यात टाकलं.) थोड्या वेळातच इकडून तिकडून खुर्च्या आणून आम्हांला जागा करून देण्यात आली. आम्हांला इतक्या दाटीवाटीने बसावं लागलं; की एखाद्याला वाटावं, आम्हीच एकमेकांना लॅपडान्स देतोय की काय!
हॉलच्या मधोमध एक स्टेज होतं. त्याला छानसा पडदा वगैरे होता. दोन बाजूला दोन रोमन की कोरिंथियन प्रकारचे खांब बसवलेले होते. स्टेजभोवती हॅलोजनचे भरपूर दिवे लावलेले होते. त्यावरचा एक खांब सोडला, तर पुण्यात एकांकिका बसवणार्‍या थेट्राचं स्टेज म्हणून अगदी सहज खपून गेलं असतं ते स्टेज! उजवीकडे आणि डावीकडे कोर्टातल्या साक्षीदाराच्या पिंजर्‍यासारखे पिंजरे होते. दोन्ही पिंजर्‍यात प्रत्येकी एक स्ट्रिपर परफॉर्म करत होती. हॉलच्या मधोमध वरच्या मजल्यावर जाणारा जिना होता. वरचा रेट स्पेशल. वरती एक छोटसं स्टेजही होतं. त्याच्या बाजूला खालच्या मुख्य स्टेजकडे पाहणार्‍या तीन गॅलर्‍या. प्रत्येक गॅलरीत एक स्ट्रिपर परफॉर्म करत होती. पाहावं तिथं स्ट्रिपर! त्याशिवाय जागोजागी मोठाले टीव्ही लावलेले होते, त्यावर एनबीए वगैरे सामने चालू होते. (हे बहुतेक फक्त स्ट्रिपर लोकांकरता असावेत. त्यांच्याशिवाय इथे येऊन टीव्ही कोण बघणार!) दर पंधरा-वीस मिनिटांनतर लाऊडस्पीकरवरून एका स्ट्रिपरच नाव घेतलं जात होतं. मग ती पडदा उघडून मुख्य स्टेजवर येऊन परफॉर्म वगैरे करत होती. दुसर्‍या स्ट्रिपरचं नाव अनाउन्स झालं, की पहिली स्टेजवरून उतरून बाजूच्या एका पिंजर्‍यात जात होती. पिंजर्‍यातली जिन्यावरून वर. कंटिन्यूअस रोटेशन चालू होतं. आख्ख्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये एखाद-दुसरी एशियन सोडली, तर बाकी सगळ्या स्ट्रिपर्स गोर्‍या होत्या. मुख्य स्टेजवरच्या स्ट्रिपरच्या चेहर्‍यावरचा उत्साह, ती पिंजर्‍यात आली, की निम्मा होत होता. अन्‌ पिंजर्‍यातून उतरून जाताना तर चेहर्‍यावरचे सगळे भावच नाहीसे होत होते. इथे स्ट्रिपर्स फ्लर्टिंग करत नव्हत्या, की कोणाशी लगट करत नव्हत्या. लोक थेट जिच्याकडून लॅप डान्स हवा, तिला चाळीस डॉलर्स देत होते अन्‌ लॅपडान्स विकत घेत होते. जस्ट प्युअर बिझनेस. या स्ट्रिपर्सना जर कोणी जॉब सॅटिस्फॅक्शनबद्दल विचारलं, तर 'इट्स ऑलराईट. पेज् माय बिल्स, यु नो...' असं उत्तर येईल.
लाऊडस्पीकरवरून मेलनी का काहीतरी नाव अनाउन्स झालं. साधारण २२-२३ वर्षांची एक सुंदर स्ट्रिपर पडदा उघडून बाहेर आली. तिच्याकडे पाहून मला स्मिस्थोनियनमधल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या अ‍ॅफ्रोडायटीच्या पुतळ्याची आठवण झाली. तिची ती शुभ्र संगमरवरी नितळ त्वचा, रेखीव स्तनांची खेळकर जोडी, त्यावरची नाजूक गुलाबी स्तनाग्रं! मी तिला आपादमस्तक न्याहाळण्यात मग्न होतो अन्‌ तेवढ्यात माझ्या पाठीवर थाप पडली. माझा शेजारी बसलेला मित्र समोर उभ्या असलेल्या स्ट्रिपरकडे बोट दाखवून म्हणाला, "गो, पॉप युअर चेरी"! स्ट्रिप-क्लबमध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे, हे एव्हाना बोलता बोलता मी त्याला सांगून टाकलं होतं. माझी पहिलीच वेळ म्हणून या सदात्म्याने मला लॅपडान्स भेट म्हणून दिला होता अन्‌ ती भेट 'चला लवकर, मीटर सुरूए'च्या आविर्भावात माझ्याकडे पाहत होती. एरवी मी इतरांनी सुचवलेलं सँडविचसुद्धा खात नाही. पण हे आता याला कोण समजावणार? नया है वह. इथली रिटर्न पॉलिसीही या क्षणाला विचारण्यात तर काहीच शहाणपण नव्हतं! आता काय, पदरी पडलं अन्‌ पवित्र झालं!
मला काही कळायच्या आतच त्या स्ट्रिपरने माझ्या हाताला धरून पुढे चालायला सुरवात केली. हॉलच्या एका बाजूला रंगीबेरंगी अंधारात काही ऐसपैस सोफे ठेवलेले होते. एक सोडून सगळ्या जागा भरलेल्या होत्या. त्या रिकाम्या जागेवर मला बसवून ती समोरच्या खुर्चीवर बसली. मी हळूच आजूबाजूला काय चाललंय हे पाहून घेतलं. (द हीरो ऑलवेज पिक्स.) "वुई वील स्टार्ट अ‍ॅट द नेक्स्ट साँग." (स्ट्रिप-क्लबांमध्ये गाणं हे लॅपडान्सची लांबी मोजण्याचं एकक आहे. भारतातल्या एखाद्या स्ट्रिप-क्लबामध्ये बडजात्याच्या गाण्यांचं एकक असेल की काय हा विचार मनाला चाटून गेला.) मी मानेनंच ओके केलं. करणार काय, आलिया भोगासी...
"सो, व्हॉट डू यू डू?"
मी जमेल तितका स्वतुच्छतादर्शक भाव आवाजात आणून म्हणालो, "आय एम जस्ट अन्‌ इंजिनिअर." आणि सवयीने तोंडात आलेला 'हाऊ अबाउट यू?' हा प्रश्न बाहेर यायच्या आत हातातल्या व्हिस्कीसोबत गिळला.
"दॅट्स सो कूल! हाव डू यू लाईक युअर जॉब?"
"इट्स ऑलराईट, यु नो... पेज माय बिल्स!" च्यायला, स्मॉल टॉक विथ स्ट्रिपर्स इज नो जोक!
नशिबानं ते गाणं अन्‌ स्मॉल टॉक दोन्ही संपलं. ती एकदम उभं राहून म्हणाली, "ओके. नो टचिंग"! त्या संक्षिप्त नियमाने माझ्या मनात हजार प्रश्न उपस्थित झाले. नो टचिंग म्हणजे फक्त मी टच नाही करायचं का कोणीच नाही करायचं? आणि टचिंग म्हणजे हाताचंच टचिंग का कोणतंही टचिंग? यांना नियम स्पष्ट सांगायला काय होतं ब्वॉ! (मी एखादा बाउन्सर जवळपास दिसतोय का ते पाहायचा प्रयत्न केला. चुकून भंग झालाच, तर प्लान बी असलेला बरा!) इतक्यात ती जवळ येऊन माझ्या दोन पायांच्या मध्ये पाठमोरी उभी राहिली. अचानक आलेल्या परफ्यूमच्या भपक्याने माझा श्वासच गुदमरला! शुद्ध हरपून काही टचिंग-बिचिंग होऊ नये म्हणून डाव्या हाताने सोफ्याचा कठडा घट्ट आवळून धरला आणि उजव्या हातातल्या व्हिस्कीच्या ग्लासाभोवतीची पकड अजून घट्ट केली. एव्हाना तिने काहीतरी अंगविक्षेप करणं सुरू केलं होतं. नाचातलं मला काहीच कळत नसल्याने, हाच तो लॅपडान्स असावा असं मला वाटलं. तिचे हेलकावणारे नितंब दोन हेलकाव्यांच्यामध्ये माझ्या मांड्यांना हलकेच स्पर्श करून जाऊ लागले. जसा जसा गाण्याचा टेम्पो वाढत होता, तशी तशी ती वर-वर सरकत होती. नाहीश्या होणार्‍या गॅपची लांबी पाहत असतानाच माझं लक्ष पँटच्या खिशातल्या किल्ल्यांच्या जुडग्याकडे गेलं. मी चित्त्याच्या चपळाईने तो जुडगा खिशातल्या खिशातच बाजूला सारला. उगाच टोचलं-बिचलं तर काय घ्या! (त्या बाबतीतले नियमही स्पष्ट नव्हते!) गॅप जवळजवळ संपलीच होती. आता झिंगाट होणार…!
पण इतक्यात ती उलटी फिरली. डावा गुडघा सोफ्याला टेकवलेला, उजवा पाय सोफ्यावर, डावा हात माझ्या खांद्यावर अन्‌ उजवा हात वर हवेत अशी कुठलीशी मादक पोझ घेण्याचा तिनं प्रयत्न केला. मला तर ती पोझ पाहून महिषासुरमर्दिनीचाच फोटो आठवला! आपल्या पौराणिक कथांमध्ये होतं, तसं मी केलेल्या कोणत्यातरी पापाची शिक्षा म्हणून ही आता अचानक रूप बदलून माझा नि:पात वगैरे करते की काय, अशीही एक भीतिदायक शंका मनाला चाटून गेली! पण समोरच्या दृश्यापुढे माझी भीती एकदमच फिकी पडली असणार. समोर मंद हेलकावे खाणारे तिचे वक्ष होते. तिच्या नाचातून ती त्या हेलकाव्यांना एक संथ लय देण्याचा प्रयत्न करत होती. एका अत्यंत नाजूक आणि तोकड्या वस्त्रात बांधलेले ते वक्ष जणू काही बाहेर पडायला उतावीळच झालेले आहेत असं त्या लयीमुळे वाटत होतं. त्या संथ लयीत नाचतानाच तिची छाती हळूहळू माझ्या जवळ येत होती. माझ्या उच्छ्वासातील उष्णता तिच्या वक्षांना जाणवेल, इतकी ती जवळ आली. माझ्या कोरड्या पडलेल्या घशातला आवंढा गिळायला मी गेलो आणि एकदम विचित्र आवाज झाला! इतका वेळ टचिंग वगैरेच्या चिंतेत असल्याने आवळून धरलेल्या पोटाने काढलेला तो निषेधाचा सूर होता. 
"स्टमक!" मी तिला आवाज पोटातूनच आलेला आहे याची एकच शब्द वापरून खात्री करून दिली. 
नाच न थांबवताच तिने लवचीकपणे दोन्ही हात पाठीमागे नेले. पुढे काय होणार आहे याचा मला अंदाज आला. (टचिंगचे नियम स्पष्ट नसल्याची बोच पुन्हा एकदा टोचून गेली!) तिच्या हातांच्या हालचालीवरून माझ्या शंकेचं खात्रीत रूपांतर झालं . (तीच हालचाल त्याच अँगलमधून मी अनेकदा अयशस्वीपणे केलेली असल्याने ती माझ्या चांगलीच ओळखीची होती.) तिने अलगद हात बाजूला काढले. तिच्या दोन हातात त्या अत्यंत नाजूक, तोकड्या कपड्याची दोन टोकं होती. टोकं तशीच धरून तिने वक्ष माझ्या ओठांच्या अजून जवळ आणले. इंचापेक्षाही कमी अंतर उरलं होतं. नियमातली संदिग्धता संपली होती. तिनं खट्याळपणे ती टोकं अजूनही धरून ठेवली होती. टोक धरलेल्या तिच्या डाव्या चिमटीकडे मी चातकासारखा पाहत होतो. 
हा विलंब अनावर होऊन मी तिच्याकडे व्याकूळ नजरेनं पाहिलं आणि एकदम अनिष्ट शांतता पसरली.
गाणं संपलं होतं.
***
तळटिपा:
 अ‍मेरिकेत कोणत्याही हाटेलात गेलं, की सगळ्यात आधी 'ड्रिंक काय घेणार?' असं विचारलं जातं आणि बहुतेक अमेरिकन (अन्‌ अमेरिकन होण्यास उतावीळ असलेले भारतीयही) 'पाणी' असं उत्तर कधीच देत नाहीत. अमेरिकेत पाणी दारूपेक्षाही महाग आहे असा जो गैरसमज पसरलेला (किंवा अमेरिकेतल्या भारतीय लोकांच्या आईबापांनी पसरवलेला) आहे, त्याचं मूळ इथेच असावं.
 त्या हीरोकडून साभार.

Tuesday, July 28, 2015

मध्यमवर्गीयाचा मृत्यु


आताशा मला नेहमीच्या डेटिंग रुटीनचा कंटाळा यायला लागला होता. एकटेपणाचा कंटाळा - पोरगी शोधा - डेट बीट मजा - कमिटमेंटचा वैताग - पुन्हा एकटं! काहीतरी नविन उपाय करायला हवा असं वाटू लागलं होतं. पण कसा? नेहमीच्या डेटिंग साईटवर मी एका पाठोपाठ एक प्रोफाईल चाळत होतो. नविन चेहरे असलेली ही जुनीच प्रोफाईल्स आहेत असं वाटत होतं. प्रोफाईल्स निवडायची माझी पद्धत एव्हाना सेट झालेली होती. एखादं प्रोफाईल बरं वाटलं की आधी 'रिलीजन'मध्ये काय लिहलंय हे पहायचं. 'क्रिश्चियानीटी अ‍ॅन्ड सिरीअस अबाऊट इट' असेल तर पुढे. 'ज्युडेइजम' असेल तर थोडावेळ न्याहाळून पुढे. ही द्राक्षं आंबट. 'योगा' करायला आवडत असेल, दहा पंधरा लोकांसोबत एकमेकांच्या पोटावर हात ठेवून उताणं पडून 'स्पिरीच्युअल हीलिंगची' आवड असेल तरच 'बुद्धीजम' वाल्यांच्या नादी लागावं. 'हिंदू-इजम' असेल तर मात्र जपून! आमच्या एका मैत्रिणीने भलत्यावेळी "आय फील लाईक आय एम लव्हिंग लॉर्ड शिवा" असे म्हणून बिकट वेळ आणली होती. माझ्या नावाचा अर्थ कृष्ण होतो, शंकर नाही हे मी तिला पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न केला, पण ती शंकरातच गुंतली होती! तेव्हापासून मी या गोर्‍या हिंदूंपासून दूरच राहतो! भारतीय हिंदू असेल तर अजिबातच वेळ फूकट घालवायला नको!
जुळेलसं एक प्रोफाईल दिसलं. मी जरा काळजीपूर्वक अभ्यास केला. वाचतावाचता डोक्यात काहीतरी कल्पक मेसेज केला पाहिजे अशी चक्रं सुरू झालेली होती. अपेक्षापेक्षा जरा लवकरच मेसेज सुचला. एम आय गेटींग प्रो अ‍ॅट इट ऑर व्हॉट! मी 'मेसेज' बटणावर क्लिक केलं. अरे! मी तर हिला सहा महिन्यांअगोदरच मेसेज केलाय. अजून उत्तर नाही! युजरनेमही बदललेलं दिसतंय! (काय या लोकांना युजरनेम बदलायची सवय असते कळत नाही. युजरनेम बदलल्याने काय भविष्य थोडीचं बदलतं!) साला आपण एवढा विचार करून मेसेज करायचा अन यांचं साधी पोच सुद्धा नाही! दिवसेंदिवस सोशल नेटवर्किंग एटीकेट्स खालावत चाललेले आहेत! पुढचं प्रोफाईल. आधी मेसेज केलेला नाही याची खात्री केली. बापरे, केव्हढा मोठा "यु शूड नॉट मेसेज मी इफ" सेक्शन! स्वतः दोन ओळींचा मेसेज केल्यास उत्तर मिळणार नाही असं लिहतात अन आम्ही विचारपूर्वक केलेल्या मेसेजला फक्त एका स्माईलीचं उत्तर पाठवतात! धीस इज नॉट वर्किंग! वैतागुन मी ब्राउझरच बंद केला.
तेव्हढ्यात फोनवर एक नोटीफिकेशन आलं. Congratulations! You have a new match! या टिंडरनं तर भलतीच निराशा केली होती. फक्त फोटो आणि किरकोळ माहीती, स्वाईप राईट ऑर लेफ्ट, 'मॅच' झाल्याशिवाय मेसेज करायची गरज नाही, अभ्यास करकरून मोठमोठाले मेसेजेस करून उत्तराची वाट बघत बसावी लागणार नाही वगैरे फायद्यांमुळे टिंडरकडून भरपूर आशा होती. पहिल्या आठवड्यातच दिवशी शे-दिडशे प्रमाणे प्रोफाईल्स काळजीपूर्वक स्वाईप केली. पण ही तपश्चर्याही फूकटच जाते का काय अशी शंका मला येऊ लागली होती. हजार स्वाईपमागे एखादं मॅच. त्यातही मॅच झाल्यावर मेसेज करावा तर उत्तर नाही. शेवटी मी वैतागून सगळ्यांनाच राईट स्वाईप करू लागलो. मॅच झाल्यावर बघू, साला फक्त आपणचं एटिकेट्स का पाळा!
थोड्याश्या निरुत्साहानेच मी टिंडर उघडलं. फोटो तरी स्वतःचेच दिसताहेत. (डेटिंग साईटवर स्वत:ऐवजी स्वतःच्या मुलांचे फोटो का टाकतात लोक हे मला अजूनही न सुटलेलं कोडं आहे. या लोकांना आणि कुगरलाईफ.कॉम वर जाऊन 'लूकिंग फॉर सोलमेट' वगैरे लिहणार्‍यांना सबंध इंटरनेटावरूनच ब्यान केलं पाहिजे असं माझं ठाम मत झालेलं आहे.) फोटोंखाली दोनच ओळी लिहलेल्या होत्या. "Bi into poly and tattoed dominatrix here for fwb. Please be hwp republicans swipe left". आपल्याला काय हवं याबद्दल स्पष्ट असणार्‍या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. मी अर्बन डिक्शनरीवर जाऊन नक्की काय काय आहे याची खात्री करून घेतली. तेव्हढ्यात तिकडून 'हाय' आला. "चॅटवर फार वेळ घालवण्याची इच्छा नाही. शुक्रवारी 'शॉट इन द डार्क' मध्ये भेटूया". संध्याकाळी सहा वाजता भेटायचं ठरलं.
शॉट इन द डार्क मध्ये मी पूर्वी कधी गेलो नव्हतो. डाऊनटाऊनमध्ये जायचं म्हणजे कटकटच असते. त्यात शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे पार्किंग मिळणं अशक्य. या सगळ्याचा विचार करून मी जरा लवकरच निघालो. पार्किंग वगैरे मिळून कॅफेत पोहोतले तेव्हा सहाला दहा-बारा मिनीट शिल्लक होते. कॅफेत गेल्या गेल्या जाणवलं की आपण ओव्हरड्रेस्ड आहोत. तसं मी काही कोट वगैरे घालून गेलेलो नव्हतो. साधेच अन धुतलेले कपडे घातल्यामुळे मी इथे उगाचच उठून दिसत होतो. (एरवी मला नेहमी बरोब्बर उलटा अनुभव येतो. अगदी भारतात असल्यापासून ते अमेरिकेत आल्यानंतरही कोणत्याही दुकानात वगैरे लोक मला येऊन गोष्टींच्या किमती विचारतात. आता वॉलमार्ट वगैरे ठिकाणी युनिफॉर्म-बिल्ले वगैरे लावलेले कर्मचारी असतानाही लोक मला येऊन गोष्टींच्या किमती का विचारतात काही कळत नाही. बहुतेक माझ्या कपाळावरच "आस्क फॉर हेल्प" वगैरे गोंदवलेलं असावं.) डावीकडच्या कोपर्‍यात एक पंधरा सोळावर्षांचं युगुल कसलातरी धूर काढत बसलं होतं. दोघेही उपोषणनाने ग्रस्त वाटत होते. तरूणाने जागोजागी फाटलेली जीन्स आणि सैलसर 'सॅन्डो' बनियन घातला होता. त्याचा धातीवर डोकं ठेवून तरूणी धताकडे शून्य नजरेनं बघत होती. अनेक दिवसांत तिने केसही धुतलेले नसावेत. मेकअपही अजिबात केलेला नव्हता मात्र प्रियकराकरता थोडंस आकर्षक दिसण्याचा तिने प्रयत्न केल्याचं जाणवत होतं. दोघंही अजिबात बोलत नव्हते, फक्त धुर काढण्यार्‍या गुंडाळीला आळीपाळीने एकमेकांना देत होते. स्वतःला 'आर्टिस्ट' म्हणवणारे हिप्पी लोक असावेत असा अंदाज बांधून मी पूढे निघालो. डावीकडे कॅफेला जोडून एक खोली होती. काचेच्या बंद दरवाजापलिकडे टेबलाभोवती आठ-दहाजण पत्ते का काहीतरी खेळत होते. खोलीला खिडक्या वगैरे नसाव्यात. सर्वांच्या सहभागाने निर्माण झालेला धूम्रराक्षस खोलीच्या वरच्या भागात अलगद तरंगत होता. कॅफेतली बहुतेकशी टेबलं रिकामी होती. मी दरवाजाकडे लक्ष ठेवता येईल अशा एका टेबलापाशी जाऊन बसलो. काऊंटरपलीकडे असलेल्याने माझ्याकडे टाकलेल्या प्रश्नार्थ नजरेमुळे इथे सेल्फ सर्विस आहे हे माझ्या लक्षात आलं. मानेनेच मी 'परका असलो तरी तुमचे इथले नियम मला मान्य आहेत' हे भाव नम्रपणे व्यक्त केले. काऊंटरपाशी जाऊन वरती रंगीत खडूने लिहलेला मेन्यूबोर्ड वाचू लागलो. खाद्यपदार्थांची नावं वाचून वाचणार्‍याची भूक मरावी असा उद्देश असावा. मी जरा जास्तच वेळ घेऊन कॉफी दे म्हणालो, मिडीयम रोस्ट. कुठूनकुठून येतात हे बुर्झ्वा लोक अशा नजरेनं माझ्याकडे पाहून तो म्हणाला "वुई हॅव ओन्ली डार्क". मी पुन्हा मानेनेच होकार दिला. मी त्याला स्टीम्ड मिल्कही मागणार होतो, इथे कोणी दूध फारसं वापरत असावं असं मला वाटलं नाही. त्यामुळे बाजूला ठेवलेल्या दुधाच्या थर्मासमधील दूध केव्हाचं असेल कोणास ठावूक. पण त्याने माझ्याकडे पुन्हा त्या नजरेनं पाहिलं असतं तर मलाही इथेच रोज यावं लागेल की काय अशी भिती मला वाटली. कॉफी अत्यंत बंडल होती. दूधही गारेगार असल्याने आधीच कोमट असलेली कॉफी अजून गार झाली. छोटे छोटे घोट घेत मी सहाची वाट पाहू लागलो.
सहा वाजून पाच-सात मिनीटं झाली होती. शेवटच्या चॅटनंतर परत आमचं बोलणं झालेलं नव्हतं. विसरली तर नसेल? मी फोन नंबरही मागून घेतल नव्हता. टिंडरवर जाऊन "आय एम हीअर" म्हणून मेसेज पाठवला. अजून दहा मिनीटं उलटली तरी काही पत्ता नाही. काऊंटरमागचा माझ्याकडे कॉफीच्या पैशात अजून किती वेळ बसशील अशा नजरेनं पाहतोय की काय असं मला वाटत होतं. शेवटी साडेसहाला तिचा मेसेज आला. "गॉट स्टक इन ऑफिस. कॅन यु मीट मी अ‍ॅट कॅफे देस्ता इन ३०? गोईंग होम टू चेंज." इथिओपीन कॅफे देस्ता मला माहित होतं. मी ओके म्हणून उत्तर पाठवलं. पाचच मिनीटांत मी देस्ताला पोहोचलो. गाडी पार्क करून बाहेरच वाट पाहत उभा राहिलो. कुठली गाडी चालवत असेल, कशी चालवत असेल, कुठल्या बाजूने येईल वगैरे गोष्टींत मला उगाचच रस आहे. यावेळी मात्र वेळेआधीच मॅडम आल्या. चालण्याच्या दिशेवरून तर इथेच येत आहे, म्हणजे तीच असावी. चालत आलीए, म्हणजे जवळच कुठेतरी राहत असणार. हिल्स! वॉज नॉट एक्स्पेक्टींग दॅट. "हाय!" "हाय! लिंडा?" मी शेकहँड करता हात पुढे केला. (मी सगळ्यांशीच शेकहँड करतो. एकवेळ मॅनरलेस ठरलो तर चालेल, पण सेक्सीट ठरण्यापेक्षा बरं!) माझ्यापेक्षा दोनेक इंच उंचच असावी.
फारशी भूक नाही असं म्हणून तिनं फक्त सूप मागवलं. मीही तेच मागवलं. मेक्सिकन इंमिग्रंट लोकांना मदत करणार्‍या लॉ सेंटरमध्ये ती काम करते. लॉ सेंटरच्या कामाशिवाय निदर्शनं, लोकांना कागपत्रांची पूर्तता करण्यास मदत वगैरे गोष्टीही करते. मी इंजिनीअर आहे हे सांगताना मला खरंतर थोडंसं अपराध्यासारखंच वाटत होतं. तिनं मात्र 'वॉव' केलं. (खरंतर इंजिनीअर म्हणजे आजकालचे ग्लोरीफाईड कारकून असं दिवसेंदिवस माझं मत होत चाललेलं आहे, पण ते काही मी तिला सांगायला गेलो नाही.) छंद बिंद वगैरे चौकशांवर गाडी घसरली. मी माझी एव्हाना पाठ झालेली यादी घडाघडा वाचून दाखवली. हाईकिंग, कँपिंग, रॉक क्लाईंबिंग, बायकिंग, टेनिस, सॉकर वगैरे सगळं मैदानी! (इव्होल्यूशनमुळे मैदानी खेळणारे बुद्धीबळ वगैरेंपेक्षा स्त्रीयांना जास्त आकर्षक वाटतात असं मी कुठेतरी वाचलं होतं. शिवाय यातलं सगळं मी एकदा का होईना केलेलं होतंच!) "ओह! आय लव्ह बाईकिंग! डू यू नो बायकस?" बायकस म्हणून आमच्या गावात एक सायकल कम्युनिटी आहे. तिथे स्वस्तात त्यांची अवजारं वगैरे वापरून स्वतःच सायकल दुरूस्त करता येते. शिवाय फुकटात सायकलचे वापरलेले पार्ट वगैरे मिळतात म्हणून कालेजात असताना तिथे जायचो. या तिथेही व्हॉलेंटीअर होत्या! "यु नो व्हॉट, वी आर प्रोटेस्टिंग इन फ्रंट ऑफ टीपीडी टूमारो. यु शूड जॉईन अस!" पोलिस हेड्क्वार्टर्स! बोंबला! झाली का फजिती! (साधारण वर्षभरापूर्वी याच पोलिस डिपार्टमेंटची मी 'टूर' घेऊन आलो होतो. त्यांनी अगदी प्रेमाने आम्हाला वेगवेगळ्या ड्रग्जची सॅम्पल्स वगैरे दाखवली होती.) मी आपलं न जमण्याचं काहीतरी कारण सापडेल म्हणून प्रोटेस्ट काय आहे वगैरे चौकशी करू लागलो. पोलिस डिपार्टेमेंटावर सायकल मोर्चा घेऊन जायचा बेत होता. ऑर्गनाईझर कोणतीतरी एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली एनजीओ होती, त्यांचा गाड्या आणि पोलिस दोघांवर राग असणार. तिलाही माझा बेत कळला असावा, मी काही म्हणायच्या आतच ती म्हणाली "आय वील मेक अप फॉर ईट टूमारो नाईट!" (असले संवाद काही मला नविन नाहीत असा भाव माझ्या चेहर्‍यावर आणण्याचा प्रयत्न करून मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावर मात्र अजिबात मिश्किली नव्हती.) मी थोड्याश्या सुपाबरोबर एक मोठा आवंढा गिळला. "शुअर, व्हाय नॉट!"
बिल देऊन आम्ही बाहेर आलो. "वूड यु लाईक टू वॉक?" मी हो म्हणालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुनाट घरं होती. इतले सगळे लोक गाव सोडून गेल्याप्रमाणे शांतता होती. रस्त्यावर फारसे दिवेही नव्हते. आमच्या चालण्याने काही घरांसमोरचे मोशन सेंसरचे दिवे चालू होत होते. "सो, यु रेड व्हॉट आय एम लूकिंग फॉर?" मी मानेनेच होकार दिला. "आय वील बी फ्रँक, माय डेज आर वेरी स्ट्रेसफूल अँड आय हॅव नो टाईम फॉर कमिटमेंट प्रॉब्लेम्स!" "आय अंडरस्टॅंड! आय एम इन द सेम बोट." मी पण कसा बिझी आहे, जुने अनुभव वगैरे तिला सांगितलं. त्यानं तिचं समाधान झालं असावं. "सो येस, आय एम आल्सो लूकिंग फॉर समथिंग कॅज्युअल!" मी. "दॅट्स गूड! आय थिंग आय लाईक यू! बिसाईड्स, आय हॅव नेव्हर हॅड अ‍ॅन इंडियन बिफोर!" असं म्हणून ती जराशी चावट हसली. मी एखादा लुसलुशीत मांसाचा तुकडा असण्याचा भास मला झाला! एव्हाना आम्ही एका घरासमोर येऊन थांबलो होतो. इथे राहते बहुतेक. तिनं मला निरोपाचं अलगद अलिंगन दिलं. घराची नोंद मनात करून मी परत फिरलो.
गेल्या दोन तीन वर्षांत सायकलला हात लावलेला नव्हता. घरी जाता जाता वॉलमार्टातून दोन टायर्स, दोन ट्युबा, पंक्चर कीट अन एक ऑईलची बुदली घेतली. टायरट्यूब्स बदलून ऑईलिंग वगैरे केलं. झोपेपर्यंत हवा राहते का नाही लक्ष द्यायला पाहिजे. गुगल मॅप्सवर जाऊन अंतर पाहिलं. भेटण्याची जागा दहा मैलांवर! तिथून पुढे मैलभर पोलिस स्टेशन.
सकाळी उठून अंग मोकळं करण्याकरता जरासा व्यायाम केला. सायकल चालवताना काही लचकलं बिचकलं तर सगळी तपश्चर्या फूकट जायची. तास-दोन तास आधी निघून आरामात जावूया! पाणी, डीओडरंट, इनर्जी बार वगैरे गोष्टी ब्यागेत घातल्या. पुर्वी घेतलेले सायकलिंगचे कपडे घातले पण ते ठिकठिकाणी पाण्याने भरलेल्या फुग्यासारखे भरले! या कपड्यांत थोडीच निदर्शन करणार असं म्हणून जीन्स अन टीशर्ट घातला. दरवाजाला कुलूप लावून सायकल जीन्यावर घेऊन खाली उतरलो. जीन्समुळे सायकलवर टांगच टाकता येईना! पुन्हा सायकल घेऊन वर! शॉर्टच बरी. शेवटी एकदाची सायकल हलली. पण पुढे आलेल्या पोटामुळे अन गुबगुबीतपणाची सवय झालेल्या कण्याने पहिल्या मिनीटातच असहकार पुकारला! भारतात ज्याला बीएसए म्हणत तसली 'रेसिंग' सायकल. पुढे आलेल्या पोटामुळे वाकून हँडल धरताना त्रास अन ताठ बसून चालवावी म्हणलं तर पाठीला रग लागत होती! शेवटी एकावेळी एका हातानेच हँडल धरून अर्ध्या शरीराला विश्रांती द्यायची अन मिंटामिंटाला हात बदलायचा असा प्रकार सुरू झाला. मजल दरमजल करत भेटायच्या जागी पोहोचलो. हळूहळू लोक जमा झाले. मला पहिल्यावर तिने पुन्हा एकदा अलिंगन दिलं. (हे कालच्या इतकं अलगद नव्हतं!) दोन-तीन लोकांशी ओळख करून देऊन ती पुन्हा कार्यकर्त्यांच्या घोळक्यात घुसली. काहीतरी झालं असणार, कार्यकर्त्यांच्या घोळक्यात एकदम गडबड झाली. तेव्हढ्यात एका जणाने बाहेर येऊन काय प्रकार आहे ते सांगितलं. जवळच एका कॉलनीत पोलिस इल्लिगल इमिग्रंट लोकांना अटक करायला आले होते. तिथून त्यांना डिपोर्टेशन सेंटरला नेणार. मुळचा प्लॅन बदलून तिथंच निदर्शनला जायचं ठरलं.
आम्ही पोहचेपर्यंत तिथं बरीच गर्दी झाली होती. पोलिसांच्याही बर्‍याच गाड्या येऊन थांबलेल्या होत्या. निदर्शन करणारे लोक घोषणा देत होते, काही पोलिसांची हुज्जत घालत होते. पोलिस बहुतेक घरात जाऊन कागदपत्र मागत असावेत, गर्दीमुळे नक्की काय चालू आहे दिसत नव्हतं. आमच्या ग्रुपमधली कार्यकर्ते मंडळी घोळक्यात पुढे शिरली. मी लांबूनच एका घराच्या पायर्‍यांवर चढून काही दिसतंय का पाहत होतो. पोलिस घोळक्याला घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक पोलिसांना रेटत होते. पोलिसांशी तावातावाने हुज्जत घालताना ती मला क्षणभरच दिसली अन पुन्हा कोणीतरी मध्ये आल्याने दिसेनाशी झाली. अजून काही पोलिस आले. एक मोटरसायकलवाला पोलिस माझ्या शेजारीच येऊन थांबला. मी आपला उगाचच त्या पोलिसाकडे पाहून हसलो. "नाईस बाईक! इज दॅट १०००?" त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. जवळपास तासाभरानंतर पोलिसांच्या गाड्या एकेक करून गेल्या. बहुतेक त्यांना कोणी सापडलं नसावं, कार्यकर्त्यांचा मूड बरा वाटत होता. काहीतरी एकमेकांत बोलून कार्यकर्ते पांगले. मला लॉ सेंटरला जावं लागणार आहे असं म्हणून तीही घाईघाईने निघून गेली. मी सायकल घेऊन बस स्टॉपवर आलो. बसच्या कॅरीअरला सायकल अडकवली अन बसमध्ये शिरलो. हे मला आधी का नाही सुचलं? बसमध्ये बसल्यावर कोणत्याही अवयवाने तक्रार केली नाही. अजूनही दहा मैल सायकलिंग करता येतंय तर! बहुतेक माझा डोळा लागला असणार, नोटीफिकेशनच्या आवाजाने जाग आली. "पिक मी अप अ‍ॅट सेव्हन!"
बरोबर सातला मी तिच्या घरी पोहोचलो. दरवाजा ठोठावू का नको! बाहेरून आल्याचा मेसेज केला. तीने आत बोलावलं. गाडी नो पार्किंगमध्ये नाही ना याची पुन्हा एकदा खात्री केली. मी दरवाजावर टकटक करून आत गेलो. मॅडम अजून तयारच होत होत्या. "फिफ्टीन मिनीट्स!" तिने तिच्या रूममेटला हाक मारली. तिला माझी ओळख स्पॅनिशमधे करून दिली आणि मला इंग्रजीत. मेक्सिकोहून नोकरी शोधायला ती इथे आली होती. रूममेटला तिने काहीतरी सांगितलं. रूममेट आतमध्ये जाऊन एक स्पाईरल बाइंडर घेऊन आली. हीचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून जरा सजेशन्स वगैरे दे जॉब अ‍ॅप्लिकेशनला फायदा होईल असं मला सांगून मॅडम आत तयार व्हायला गेल्या! मी तो स्पॅनिशमध्ये लिहलेला रिपोर्ट चाळू लागलो. तिचं स्पॅनिश, माझं महान इंग्रजी आणि भरपूर हातवारे यांच्या मदतीने मी प्रोजेक्टबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दोघांनाही एकमेकांचं नक्की किती कळलं कुणास ठावूक! पण मी सांगितलेलं तिला जे काही कळलं ते तिला आवडलं असावं. मॅडम तयार होऊन बाहेर आल्या. निघताना तिनं रुममेटला काहीतरी स्पॅनिशमधे सांगितलं आणि मला म्हणाली. "इफ यु मर्डर मी टूनाईट, शी वील बी द विटनेस!" मी तिच्या गळ्यात हात टाकून रूममेटला म्हणालो, "देन यु शूड टेक अवर पिक्चर!" ती आमच्याकडे बघून फक्त भरपूर हसली, पण तिला कळलं की नाही कुणास ठावूक!
आम्ही थेट माझ्या घरी आलो. जेवणाचा बेत परस्परसंमतीने रद्द केला होता. (पोटातल्या गोळ्यामुळे तसंही धड जेवता येत नाही अन जेवल्यानंतर उगाचच पोट बिघडण्याची भिती लागून राहते!) दोन ग्लासांत जरा जास्तच वाईन ओतली. मी कारपेट व्हॅक्युम केलं होतं, बेडशिट्स, ब्लँकेट्स वगैरे सगळं धुवून घेतलंल होतं. घरात रूमफ्रेशनर मारलेला होता. माझ्याकडून सगळी तयारी होती. पण विषयाला हात घालायचा कसा? "लेट्स वॉच सम मूव्ही!" मूव्ही! विसरली का काय! वायदा तिनं केलाय पुढाकार पण तिनेच घ्यायला पाहिजे! (माझ्या डोक्यात कैकैयीचं 'मोडू नका वचनास' किंचाळू लागलं!) "हॅव यू सीन फोर रूम्स?" नेटफ्लिक्सावर मिळाला. टॅरंटिनोचा सिनेमा आणि मी अजून पाहिलेला नाही!
३१ डिसेंबरची रात्र. टेड या हॉटेल अटेंडन्टचा नोकरीचा पहिलाच दिवस. एकेक करून पाच सहा गमतीदार बायका हॉटेलातील 'हनिमून स्वीट' मध्ये रहायला येतात. टेडला कळतं की या चेटकिणी आहेत. आणि त्यांच्या चेटकिणराणीला शापातून मुक्त करण्याकरता आज इथे जमलेल्या आहेत. प्रत्येक चेटकिणीनं राणीला अर्पण करायला एकेक गोष्ट आणलेली आहे. मात्र एक चेटकिण पुरषाचं वीर्य आणू शकलेली नाही. टेडचं वीर्य मिळवण्याकरता ती त्यांच्यावर जादू करते...
"आर वुई डुईंग समथिंग टुनाईट ऑर नॉट?" च्यायला! मी सिनेमात भलताच गुंग झालो होतो. मी वाईनचा ग्लास शेजारच्या टेबलावर ठेवला आणि जवळ सरकलो.
"डू यु हॅव अ काँडम?"
"येस!" पुन्हा तीच चूक मी कशी करेन!
"ब्रिंग इट." इथं सोफ्यावर!! मी, मनातल्या मनात! बेडरूममध्ये जाऊन घेऊन आलो आणि तिला ते रॅपर दाखवलं. (मुर्खच आहे मी! त्यात दाखवायचं काय!)
"प्लीज टर्न द लाईट्स ऑफ." मी दिवा बंद केला.
"ऑल द लाईट्स!" किचनमधला दिवा बंद करून बेडरूममध्ये जाऊन तोही बंद करून आलो.
अंधारात मला अंधुकसं दिसत होतं. मी चाचपडत सोफ्यापाशी गेलो. तिचं गोरं अंग मला दिसलं. इज शी नेकेड!! तितक्यात तिने मला सोफ्यावर ओढलं.
...
गडद अंधारात मला काही दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त तिचा तो तावातावाने हुज्जत घालणारा चेहरा तरळत होता.
...
सकाळी जाग आली तेव्हा मी कारपेटवर पसरलेलो होतो. मी उठायचा प्रयत्न केला आणि दहा बारा कळा वेगवेगळ्या ठिकाणाहून माझ्या मेंदूत गेल्या. उजवीकडे माझा वाईनचा ग्लासही कारपेटवर पसरलेला होता. एखाद्या योद्ध्याने लढाईत कमववलेल्या जखमेकडे पहावं तसं मी त्या कारपेटवर पडलेल्या वाईनच्या डागाकडे पाहिलं. आता सायकलच काय, कशावरच महिनाभरतरी बसता येणार नाही!

Wednesday, July 1, 2015

Venus-Jupiter Conjuction (गुरू आणि शुक्र यांची युती)३० जून रोजी शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह एकमेकांच्या खूप जवळ आले. इतके जवळ की जर त्यांच्या पुढे चंद्र असता तर ते संपूर्णपणे झाकले गेले असते. खरंतर चंद्राच्या व्यासाच्या सुमारे एक तृतीआंश इतके जवळ. त्याशिवाय ही युती आकाशात क्षितीजापासून बर्‍यापैकी वर असल्याने सहज जगभरात दिसली. गुरू आणि शुक्र हे पुन्हा इतके जवळ यायला अणि सुर्यास्तानंतर दिसायला साधारण १०० वर्षे वाट पहावी लागेल असे गणित खगोलशास्त्रज्ञांनी मांडले आहे. दुर्दैवाने आमच्याकडे मान्सूनचे ढग आल्याने ३० जूनला फोटो काढता आला नाही, पण मिनिटभर का होईना डोळ्यांनी युती पाहता आली, १ जुलैला रात्री उशीरा आकाश मोकळे झाल्यावर मला फोटो घ्यायची संधी मिळाली. हा फोटो गुरू क्षितीजापासून ४ अंशावर असताना घेतला आहे. चंद्राप्रमाणे शुक्राच्याही कला दिसतात, वरील फोटोत काळजीपूर्वक पाहिल्यास शुक्राची कला दिसेल. त्याशिवाय गुरूजे चार मोठे चंद्रही (ज्याला गॅलिलीअन मून्स असं म्हणतात) गुरूच्या डाव्या बाजूला दिसत आहेत. (ज्यांना गॅलिलीअन मून्स असं म्हणतात)

Sunday, January 12, 2014

शुक्रवार सकाळ

शुक्रवार हा माझा अत्यंत आवडता वार आहे. शुक्रवारी मला अर्धंच हाफिस असतं, म्हणजे फक्त ४ तास. ४ तासांत कोणालाही काम करायचं नसतं. त्यात अमेरिकन फुटबॉल सुरू असला की ऑफिसात प्रत्येकाच्या अस्मिता वगैरेंची धमाल असते. मी खरंतर अमेरिकन फुटबॉल बघत नाही, पण कोणी ना कोणी हरणारा असतोच, त्याला डिवचण्याइतकं माहित असलं म्हणजे झालं! त्याशिवाय, कॉलेज बास्केटबॉल मध्ये आमचे 'अल्मा माटर' सद्ध्या अव्वल क्रमांकावर आहे. फुटबॉलपेक्षा हे प्रकरण जरा नाजूक आह, त्यामुळे जरा जपून टोमणे मारावे लागतात. असं सगळं असताना शुक्रवारी बोंबलायला कोणी काम करत नाही!

शनिवार म्हणजे सुटीचा वार,त्यामुळे लवकर उठायची घाई नसते. आम्ही जन्मजातच निशाचर, त्यामुळे शुक्रवारची आख्खी रात्र जशी मिळते तशी इतर कोणतीच मिळत नाही. हॉटेलंही उशीरापर्यंत उघडी असतात. आमच्या विवाहित मित्रांना विकेंडला धुणीभांडी (खरोखरची बरंका), झाडाझाडी, डायपरं वगैरे खरेदी नायतर बायकोबरोबर शॉपिंग मॉलमध्ये उगाचच मागेमागे फिरणे वगैरे अनेक रटाळ कामं असतात. घरी आई-वडिल, सासू-सासर्‍यांना फोन बिन करायला (आणि अविवाहीतांना आई-वडिलांनी दिलेल्या नंबरांवर कॉल करायला) शनिवार-रविवार पुरत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी काहीही करायचं म्हणलं तर सहसा या लोकांची ना नसते. शिवाय शुक्रवारी नविन सिनेमे रिलिझ होतात त्यामुळे अगदीच कोणी नसलं तरी एकट्याने मस्त थेटरात जाऊन एक दोन सिनेमे पाहता येतात! थोडक्यात काय तर शुक्रवार हा तसा आठवड्यातला एकमेव मर्जीने जगायचा दिवस!

शुक्रवारी सकाळी मी लवकर उठतो, एरवी सातच्या हाफिसला जायला ६:४५ पर्यंत झोपलं तरी चालतं. पण अशी घाईघाईची सुरुवात शुक्रवारचा बट्ट्याबोळ करू शकते. लवकर उठून आरामात चहा घेऊन, पंधरा-वीस मिनिटं अरामात आंघोळ करून, पेपर वगैरे वाचून, इंटरनेटवर जाऊन लोकांच्या खोड्या काढल्या की दिवसाची कशी झकास सुरुवात होते. आज मी पाचलाच उठलो, गजराशिवाय! सगळ्यात पहिले एनपीआर लावला आणि गॅसवर चहाचे आधन ठेवले. सकाळीच एनपीआर वरून जगाच्या घडामोडी ऐकल्या की कसं एकदम स्मार्ट वगैरे वाटतं. मस्त अर्धात तास मोठ्ठा मगभरून चहा घेत लोकांच्या फेसबुकावर, धाग्यांवर किंवा खरडवहीत खोचक आणि भोचक कमेंटा टाकत वेळ झकास गेला. अशावेळी आपोआप गाणी वगैरे सुचतात (एरवी मी जाहीर कबुली देत नाही अशा गोष्टींची). 'पहाटे पहाटे मला जाग आली' वगैरे डोक्यात सुरु झालं. (पण रेशमाची मिठी वगैरे तशी दुर्मिळ असल्याने ह्या गाण्याची पुढची ओळ "अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली" अशी डोक्यात आपोआप पक्की झालेली आहे!)

सगळं कसं सुरळीत सुरु झालं होतं. पण असं सगळं सुरळीत चालू झालं की डोक्यात किडा येतोच. च्यायला काहीतरी भानगड आहे! असा विचार यायला आणि पहिला अपशकुन व्हायला! मध्यंतरी मी एक अंडरवेअरचा सेट विकत घेतला होता. तर मी म्हणजे तसा 'थर्ड वर्ल्ड कंट्रीचा' मनुष्य असेल तशा अंगकाठीचा मनुष्य. आताशा थोडा सुटलोय, पण तरी फारतर पुण्याच्या एखाद्या गरीब सबर्बातला, म्हणजे वारजेमाळवाडी वगैरे, म्हणून खपेन. तर या सेटमध्ये शेवटची अंडरवेर (बाकीच्या सगळ्या धुवायला पडलेल्या) ही चक्क डब्बल एक्सएल साईझची निघाली! डब्बल एक्सएल!! स्वतःला डब्बल एक्सेल मध्ये इमॅजिन करणं म्हण्जे उभ्यापेक्षा आडवा जास्त प्रकार!! 'Signs of the universe', 'universe conspires' वगैरे म्हणत पावलो कोहलो उगाचच डोळ्यांसमोर नाचू लागला! (या कोहलोनं तरुणाईतला महत्त्वाचा काळ वाया घालवला. लोकांना छळावं म्हणून त्याकाळी आम्ही कोहलोची पुस्तकं भेट द्यायचो!) च्यायला, या शुक्रवारची सुरूवात भलतीच झाली!

माझ्यासारख्या बॅचलरचे अंडरवेअरचे हिशेब तसे फार किचकट असतात. खास शुक्रवारसाठी राखून ठेवलेली अंडरवेअर डब्बल एक्सएल निघाल्याने मोठी पंचाईतच झाली. (ह्या अंडरवेअरच्या जाहिराती बाकी फार फसव्या असतात. फलाना कंपनीची अंडरवेअर घातलेल्याला लै भारी ललना मिठ्या मारते वगैरे. मला एक कळत नाही, अंडरवेअर दिसेपर्यंत एकदा मजल गेल्यावर अंडरवेअर आवडली नाही म्हणून बेत फिसकला असे कोणाचे कधी झाले आहे काय? कोणास ठावूक, पण च्यायला आपण रिस्क कशाला घ्या?) पंधरा-वीस मिनिटे शोधाशोध केल्यानंतर एक धुतलेली वर्ष-दोन वर्ष जुनी अंडरवेअर सापडली आणि आमचा जीव भांड्यात पडला! (इथे फार उपमेत घुसू नका!) थोडीशी घट्ट झाली, पण डब्बल एक्सएल किंवा घामटलेल्या पेक्षा बरी! (आता आम्ही राहतो वाळवंटात, घाम येणार नाहीतर काय रोझवॉटर झिरपणार?)


 या सगळ्या गोंधळात हाफिसला जायला पाच-दहा मिनिटं उशीरच झाला. स्ट्रारबक्सच्या चहाचे बरेच कस्टमाईझेशन करून मला आवडेल असा चहा मी ऑफिसच्या शेजारच्या स्टारबक्समधून घेत असतो. अगदी तसेच कस्टमायझेशन करणारी आमची एक चहा-मैत्रिण आहे. (आम्ही दोघे अगदी तस्साच चहा मागवतो म्हणून खरंतर आमची भेट इथल्या स्टारबक्सवालीनेच एका शुक्रवारी घालून दिली होती.) आज उशीर झाल्याने नेमकी तिची भेट चुकणार! अशा संधी गेल्या की फार चरफड होते! शिंचा कोहलो!!

 इमेल वगैरे चेक करून, नेहमीची कामं संपवून आज काय करावं याचा विचारच करत होतो की जीमेलावर एका मैत्रिणीनं 'हल्लो' केलं. (ही आमची मैत्रिण म्हणजे फक्त मैत्रिणच, बरं का!) इकडच्या तिकडच्या गप्पा आटोपल्यावर आज काय बेत वगैरे सुरू झालं. (कालेजात असल्याने यांच्या अजून सुट्या सुरू होत्या.) सिनेमा वगैरे पाहिन म्हणल्यावर ती म्हणाली "मला पण आवडेल बघायला"! (कोहलो आठवला! जपून पावलं टाकणं आवश्यक होतं. जरी नुस्तीच मैत्री असली तरी शेवटी 'उम्मीद पर दुनिया कायम' वगैरे!) कधी पहायचा? मी तिला म्हणलं लवकरात लवकर पाहू, "if you like the first, we can watch one more after". (आम्ही आपलं थोडंसं फ्लर्टिंग केलं. आमच्या इतर फ्लर्टिंगप्रमाणे हेही तिच्या डोक्यावरून गेलं.) खरंतर मला मॅटिनीच्या शोला जायला आवडतं. एकतर तिकीट कमी असतं, चाळीस-चाळीस टक्के सुट मिळते कधी कधी! (मध्यमवर्गीयाला किती चैन परवडणार हो शेवटी?) दुसरं म्हणजे, फारसं पब्लिक नसल्यानं आपल्याला हवी तशी जागा निवडून बसता येतं. (ही कमीतकमी पैशात चांगल्यात चांगला अनुभव मिळवण्याची सवय मला पुण्याला असताना लागली.) दुपारच्या शोची आयड्या तिलाही आवडली. (तिलाही कुणालातरी भेटायचं होतं रात्री. चालायचंच!) कोणता सिनेमा? हा यक्षप्रश्न. (पुर्वी केलेल्या चुकांमुळे आता मी जरा काळजीपूर्वक वागतो. 12 Years A Slave वगैरे आड्यंसला रडवण्याचे सिनेमे नकोत! Saving Mr. Banks सारखे गोग्गोड नकोच नकोत वगैरे चाळण्या लावून झाल्या!) मला खरंतर Wolf of Wall Street पहायचा होता, पण मी तिला Her सुचवला. (स्कारलेट जोहान्सनचा आवाजच काय सेक्सी आहे! शिवाय एकट्या पुरुषाची गोष्ट वगैरे असल्याने झालाच तर काही फायदा होईल असा आपला विचार! उम्मीद हो!) पण त्यांना कप्रियोला पहायचं होतं. Wolf सारखा सिनेमा उम्मीदवाल्या मैत्रिणीबरोबर पहाणं म्हणजे भलतीच रिस्क! (फोकलीचा कोहलो!) बरं ह्यांचं फ-कारावर आमच्याही पेक्षा जास्त प्रेम (म्हणजे आमचे फ-कारावर आहे त्यापेक्षा. समासप्रेमी लोक कधी काय अर्थ लावतील काय सांगता येत नाही.) असल्याने ते कारण देऊन उपयोग नव्हता. झालं, Wolf पहायचं ठरलं. बाराचा सिनेमा, म्हणलं थोडावेळ आधी भेटून कॉफी वगैरे घेऊन सिनेमाला जावं. सव्वा अकराला तुला पिक-अप करतो म्हणून चॅट संपवलं.

अकराला हाफिसातून निघून ठरल्याप्रमाणे पिक-अप केलं आणि सवयीप्रमाणे मॅडमनी बेत बदलला, "कॉफी आधी लंच करूयात का?". मला खरं तर लंच करायचा नव्हता. एकतर अंडरवेअर घट्ट! दुसरं म्हणजे सुटणार्‍या पोटाला आवरायचं म्हणून विकेंडाला लंच करायचा नाही असं एक व्रत मी नुकतंच सुरू केलं होतं. (शिवाय खाल्ल्यावर पोट अजून पुढे येतं. त्यात आज शुक्रवार, म्हणजे कॅज्युअल फ्रायडे, असल्याने जरासा घट्टच टी शर्ट घातला होता!) हाफिसात खाल्ल्याचं निमित्त करून "तु खा मी काहीतरी लाईट घेतो" म्हणून मी वेळ मारून नेली. मॅड्मचा लंच होईपर्यंत पावणे बारा झाले! स्टारबक्सातून कॉफि पिक-अप करून थेटरात गेलो. (कॉफिबरोबर जरा गप्पा मारता येतील म्हणून खरंतर कॉफिचा बेत आखला होता. आता अनवेळी मी नको कसं म्हणणार? आलिया भोगासी!) थेटरात बाहेरचे खाणे-पिणे नेऊ देत नाहीत. आमच्या मैत्रिणीने स्वतःच्या पर्समध्ये कॉफिचा कप लपवला! माझा उष्टा कप तिच्या पर्समध्ये ठेवणं भलतंच ऑकवर्डं वाटलं (मध्यमवर्गीय काय मरत नाही!) म्हणून मोठाले घोट घेऊन कॉफी संपवण्याच्या प्रयत्नांत जीभ भाजून घेतली. मरू दे म्हणलं, अर्धी अधिक कॉफि कचर्‍यांत!

माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच लोक सिनेमा पहायला आले होते, प्रत्येक रांगेत कोणीना कोणी होतंच. त्यातल्या त्यात चांगली जागा निवडून आम्ही बसलो. सिनेमा सुरू झाला आणि काही वेळातच एक विचित्र वास यायला लागला. थोड्या वेळातच वासाची तीव्रता वाढली. माझ्या उजवीकडे दोन सिटं सोडून एक दांपत्य बसलेलं होतं. ते काहीतरी खात होते, अंधारात नीट दिसलं नाही. थोड्यावेळाने अजून विचित्र वास आला, मगाच्याच सारखा पण थोडा वेगळा. मी पुन्हा उजवीकडे पाहिलं. यावेळी मी नीट दिसेपर्यंत पाहत राह्यलो. आता वासाकडे मेंदूचं नीट लक्ष गेलं असणार कारण हा वास थाई खाण्याचा आहे असं मला वाटायला लागलं. पण थेटरात थाई फूड? मला थाई फूड तसंही आवडत नाही, आणि पोटात कावळे कोकलत असताना त्या वासाने अजूनच वैतागायला झालं! तेव्हढ्यात मला त्यांच्या हातातली ताटं आणि त्यामध्ये ठेवलेले काचेचे बोल्स (म्हणजे आपले मराठीत चिनीमातीचे बाऊल्स) दिसले! या महान लोकांनी आख्खं थाई जेवण, ते ही सूपासकट, पार्सल करून थेटरात आणलं होतं! आता मला त्या पाणचट थाई सूपाचा अन खोबरं घातलेल्या कोणत्यातरी करीचा वास अगदी सुस्पष्ट येऊ लागला. (आणि त्याच प्रमाणात या लोकांविषयीचा तिरस्कार माझ्या मनात ठळक होऊ लागला!)

इकडे सिनेमाची एक वेगळीच तर्‍हा. स्कोर्सेसीचे सिनेमे काही मला नविन नाहीत, उलट कसिनो तर माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमांपैकी आहे. पण हा प्रकार भलताच किळसवाणा होता. नग्नता, अश्लीलता आणि किळसवाण्या घटनांचा अजब मिलाप दिग्दर्शकाने घडवून आणला होता. त्यात गुंफलेल्या काही विनोदी सीन्समुळे तर मला शिसारी येणंच बाकी होतं. ('घाण' पेक्षाही रसहीन म्हणून.) आमची मैत्रिण मात्र एकंदरीत सिनेमा एंजॉय करताना दिसत होती. तो पर्यंत आमच्या थाई काकूंचं खाऊन झालं असणार. कारण, आता त्यांचं सिनेमाला निवेदन देणं सुरू झालं होतं. मधून अधून एखाद्या विकृत दॄश्याला (जिथे थेटरात सगळे eww करतात) यांचं एकट्याचं विचित्र हसू ऐकू येऊ लागल. या लोकांचा मला फार वैताग येतो! एक दोनदा मी काकूंकडे कटाक्ष टाकून पाह्यला, पण काकू सिनेमात दंग होत्या. (आणि काका बहूतेक माझ्यासारखंच लाजून गपगूमान सूप पित असावेत.) सिनेमात नायक आणि त्याचे वडील (हे एक अत्यंत आऊट ऑफ प्लेस कॅरॅक्टर सिनेमात उगाचच घेतलेलं आहे) आजकालच्या स्त्रियांच्या 'हेअरस्टाईल्स' बद्दल बोलतात असा एक सीन आहे. कप्रियो आजकाल 'तिथे' सगळं कसं एकदम 'स्वच्छ' असतं आणि ते मला आवडतं वगैरे सांगतो. सीनच्या शेवटी त्याच्या वडीलांच्या तोंडी "मला मात्र 'बुश' आवडतं" असा संवाद आहे. त्यावर आमच्या शेजारच्या काकू जोरात "डॅम राईट" म्हणल्या! (आमच्या मैत्रिणीनेही त्यांच्याकडे मान वळवून पाह्यल्याने फक्त मलाच तसे ऐकू आले नाही या बद्दल माझी खात्री झाली. नेमका काकांचा चेहरा मात्र दिसला नाही!)

 मला कधी या संकटातून सुटतोय असं झालं होतं. त्यात हा सिनेमा तीन तासांचा, संपता संपेना. एव्हना बहुतेक सगळ्यांनाच सिनेमा कंटाळवाणा झाला असावा, कारण हशा वगैरे आता सौम्य झालेला होता. कथानायकाची उतरंड सुरू झालेली होती. कप्रियो कुठल्यातरी जोरदार ड्र्ग्ज घेतल्याने जमिनीवर कोसळतो असा सीन सुरू होता. त्याला हातपाय हलवता येत नाहीएत वगैरे (पण तरीसुद्धा मेल्याला नीट विचार करण्याची बुद्धी आहे, असं दाखवलंय). सरपटत सरपटत तो हॉटेलच्या लॉबीतून बाहेर गाडीकडे चालल्लाय. रटाळ लांब सीन. माझ्या मैत्रिणीलाही कंटाळा आला असणार, तिने माझ्याकडे पाह्यलं. म्हणून मी तिच्याकडे पाहिलं. ती काहितरी विचित्रच बघत होती आणि एकदम माझी टूब पेटली. डझ शी वाँट मी टू किस हर?! नो वे! शीट! शी डझ!! माझ्या पोटात गोळाच आला (टाईट अंडरवेअर मुळे जरा जास्तच दुखलं). मी थोडासा तिच्याकडे जातच होतो आणि एकदम "OH MY GOD" अशी किंकाळी सुटली. काकू!! कप्रिओ हॉटेलातल्या चार पायर्‍यांवरून गडगडल्यामुळे या ओरडल्या होत्या. (वास्तविक कप्रिओ त्या पायर्‍यांवर चांगला दोन मिनीटभर गडगडू का नको म्हणून विचार करताना दाखवलेला आहे. तो कोसळणार होताच! त्यात एव्हढं मेलं किंचाळायचं काय होतं कोणास ठावूक!) झालं, आमची मैत्रिण पुन्हा सिनेमांत घुसली. आता मात्र मी काकूंवर (अन कोहलोवर) सॉलीड चरफडलो, पण करतो काय! हट साला! कित्येक दिवसांची आराधना आज फळाला आली होती!

 सिनेमा एकदाचा संपला. माझ्या चेहर्‍यावर वैताग स्पष्ट दिसत असणार, मैत्रिणीने सिनेमाचा विषय काढला नाही. तिला घरी सोडलं. गाडीतच मी तिला जरा जास्तच थंडपणे बाय केलं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "we should do this again"!

Sunday, February 19, 2012

वॅलेंटाईन्स डे...

नेहमीच्या वेळेआधीच मी जागा होतो, अलार्मला अजून एक तास अवकाश आहे. आज काय समोर मांडलयं कोणास ठाऊक. फकिंग प्रोबॅबिलिटी!!

अलार्म मोड ऑफ करून मी उठतो. अरिझोनातील गुलाबी सकाळ, डोक्यात घुटमळणार्‍या अनिश्चिततेने वेगळाच उत्साह भरल्यासारखा जाणवतोय. अ‍ॅड्रेनलिन.. की एन्डॉर्फिन्स?

फोर्टीन फेब..

साला, बाप जन्मात फोर्टीन फेब माझ्या आयुष्यात येईल असा विचार कधी केला नव्हता. पुरोगामी विचारसरणी असली तरी याबाबतीत आम्ही प्रतिगामीच! बारमध्ये वगैरे जाऊन पोरींना प्रपोज करायची कधी हिंमत वगैरे झाली नाही. डेटिंगच्या सीटकॉम्स जरा लवकर पाहिल्या असत्या आयुष्यात तर काहीतरी उपयोग तरी झाला असता. शेवटी हिय्या करून ऑनलाईन डेटींग साईटवर रजिस्टर केलं. पण तरी स्वतःहून कोणाला मॅसेज करायची हिंमत होत नव्हती. डेटिंगसाईटचं अ‍ॅप मात्र भारी होतं, डेट्स अ‍ॅक्टीव्ह इन युवर एरिया वगैरे. आम्ही आपलं महिनाभर फोटो बघणे, प्रोफाईल्स चाळणे वगैरे अभ्यास करत होतो. अरिझोना फार कंझर्वेटिव्ह आहे, इथल्या 'गॉड फिअरींग' पोरी काय ब्राउन स्कीनवाल्यात इंटरेस्ट दाखवणार? असं वाटायला लागलं होतं. एके दिवशी ऑफिसात फोनवर नोटीफिकेशन आलं. ब्ला ब्ला मेसेज्ड यू! टिपीकल मेसेज, प्रोफाईल आवडलं वगैरे वगैरे. उत्तर देताना परिक्षेत केला नसेल एव्हढा विचार केला. मॅनेजमेंटमध्ये शिकवतात तसली सगळी कन्व्हर्सेशनल स्किल्स वाचून काढली. एखाद्या अमेरीकन पोरीने स्वतःहून मेसेज करण्याची शक्यता इतकी कमी होती की, उत्तराला उत्तर मिळवण्याशिवाय पर्याय नव्हता. थोड्याश्या मेहनतीने हे जमलं. पुढे इमेल देवाण घेवाण झाली, टेक्स्ट झाले आणि फोनवर बोलणंही झालं. भेटायचं ठरलं. सगळीकडे पुढाकार तिचाच. दोन दिवसात इतकी प्रगती माझ्या पुढाकाराने होण्याची शक्यता तशी नव्हतीच म्हणा.

मित्राचे आईवडील भारतातून आले होते त्यांना भेटायचं म्हणून विकेंडला जमलं नाही. येडपटच आहे मी!! मग तिचाच इमेल आला, हाऊ अबाऊट वॅलेंटाईन्स डे? बोंबला! व्हाट डझ इट मीन? इमेल पन्नास वेळा वाचला, गुगलवर अभ्यास करून झाला पण अर्थ काही लागेना. बराच वेळ गेल्याने तिला अंदाज आला असावा. तिचाच नवा इमेल आला, "डोंट वरी, वुई डोंट हॅव टु सेलिब्रेट इट अ‍ॅज ए वॅलेंटाईन्स. जस्ट अ कॅज्युअल डेट" वगैरे. याह, राईट! मी स्वत:शीच म्हणालो. पण एखाद्या सुंदर मुलीने विचारल्यावर तुमच्याकडे काही ऑप्शन असतो का?

एकदम फाटली होती. समबडी डेटींग मी वॉज ए मॅथेमॅटिकल इंपॉसिबिलीटी. भलत्यासलत्या शंका होत्याच, पण फाटली होती वेगळ्याच कारणाने. त्या अमेरिकन पोरीची ही शंभरावी डेट असेल आणि आमची इथे सुरुवात होती. तीन दिवस गुगलवरून जितकं जमेल तितकं ज्ञान गोळा केलं होतं. पण व्हेरीबएल्स, टू मेनी व्हेरीएबल्स!! आज जमणार नाही, एकदम मिटिंग लांबली, सर्दी झाली, गाडी बिघडली, काहीतरी कारण काढून टेक्स्ट करावं वाटत होतं. नर्व्हसनेस आणि लूज मोशनचा काही संबंध आहे का? गुगलायला पाहिजे. शंखवटी घेऊन दिवस काढावा लागणार आज!

फक इट, आय एम गोईंग ऑन अ डेट टुनाईट!!

कसाबसा आवरून ऑफिसात पोहोचलो. आज क्लायंट बरोबर मिटिंग, माझं मॉडेल अजेंडावर आहे. सकाळी सकाळी मॉडेलवरून बॉसशी वाजतं. च्यायला, बायकोबरोबर भांडून येतो की काय रोज? झालं, ऐनवेळेला मॉडेलमध्ये बदल! माझं सगळं लक्ष मात्र मोबाईलकडे.

एक बरं झालं की भारतीय हॉटेलात जेवायला जायचं ठरलं. तीन वर्षं होऊन गेली इथे तरी मी अजून फारसा भारतीय हॉटेलांच्या पलिकडे गेलो नव्हतो. नॉन्व्हेज अगदी वर्ज्य नसलं तरी जीभ काही अजून सरावली नव्हती. मिटींग ठीकठाक झाली, औपचारिक बदल वगैरे सोडले तर काही टेंशन नाही. माझं प्रेझेंटेशन उरकल्यानंतर मात्र मिटिंग माझ्यासाठी संपलीच होती. काहीही न ऐकता आपण मान डोलावून ऐकतो आहोत असं दाखवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया एव्हाना मला जमली होती. आता एकच विषय डोक्यात उरला होता...

नखं कापायची राहिलीएत. शॅंपू करूनच जावं. इस्त्री? फॉर्मल घालावेत की कॅज्युअल? डेटला घालावा असा एकही स्वेटर किंवा जॅकेट नाही आपल्याकडे. टेबल बुक करायला पाहिजे, आज गर्दी असणार. बरं झालं आठवलं नाहीतर पचका झाला असता. पोटाचा घेर वाढतोय!! च्यायला, गाडीत फार कचरा झालाय. माझा फेवरेट बँड कोणता? मेटॅलिका डाऊनलोडकरून जमाना झाला, पण अजून ऐकलं नाहीए. सालसा वगैरे तरी शिकायला हवा होता. यूझलेस!! भूक लागलीए, पण आता काही खाल्लं तर वांदा होणार. हा फारच कॅज्युअल वाटतोय टीशर्ट. एकदम प्लेन टीशर्ट म्हणजे बोअरींग होईल. फुल शर्ट घालावा, थंडीचीपण सोय होईल. वॉक वगैरे घ्यायची वेळ आली तर कुडकुडकायला नको. च्युईंगम ठेवावा बरोबर. इंडियन म्हणजे कांदा-लसूण असणार. अशीच आमुची आई असती हा डायलॉग मला आत्ता का आठवतोय!! तीचं प्रोफाईल परत एकदा वाचून घ्यावं. ह्यातला एकही लेखक ओळखीचा नाही!! टीव्ही फारशी बघत नाही वाटतं!...

वेळ झाली, तिला तिच्या घरून पिक अप केलं. फोटोत दिसते तशीच आहे तर. प्रोफाईलवरचं वयही खरंच असावं. मला न्याहाळणारी तिची नजर मला आतल्या आत लाजवून गेली. या क्षणी माझं बिपी किती असेल? अ‍ॅक्सरलरेटर जरा जास्तच दाबतोय का मी? चिल इट, मॅन!! हॉटेलपाशी पोहोचलो, पार्किंग लाईटमध्ये पहिल्यांदाच एकमेकांना नीट पाह्यलं. बरं झालं फुल शर्ट घातलाय, नाहीतर हातावरचे उभे राहिलेले केस तिला दिसले असते. तिने पंजाबी ड्रेस घातलाय की काय!! काहीही!

भेंडी, नेमकं कोणीतरी ओळखीचं दिसणार इथे. छ्या! हे कसं लक्षात आलं नाही आधी! हॉटेलात गेल्यावर पहिले नजर फिरवली. हुश्श! कोणी नाही. एकमेकांना पारखत असतानाच ऑर्डरी गेल्या. हा प्रकार एकदम गमतीदार होता. आईस ब्रेक झाला आणि जरा हलकं वाटलं. एकंदरीत गप्पा टप्पा ठीकच झाल्या. आपल्याला तर पोरगी आवडली. भूक मात्र का मेली होती काय माहित! टिपीकल अमेरीकन लोकांसारखं लो इन स्पाईस न मागता तिने 'स्पाईसी' मागवलं होतं. इंटरेस्टिंग! पॉलिटीक्स, इनइक्वॅलिटी वगैरे विषय म्हणजे काय रोम्यांटिक नाहीत, पण तरी तिला त्यात इंटरेस्ट असावा. नाहीतर वांदाच झाला असता. टु गो बॉक्सेस आल्यानंतर निघूया म्हटलं. तिला बहूतेक बसून गप्पा मारायच्या होत्या! मिडलक्लास मोरॉन आहे मी!

हाऊ अबाऊट अ मूव्ही? तिनेच विचारलं. दगड आहेस लेका तू, दगड! जवळच्याच थेटरात गाडी दामटवली. 'द डिसेंडन्ट्स'ची तिकिटं काढली. खरं तर 'द व्हाव'ची काढायला हवी होती. पण तेव्हढी अक्कल असती असती तर ना. आख्ख्या थेटरात आम्ही दोघंच होतो. 'द डिसेंडन्ट्स' सारखा बायको कोमात वगैरे असलेला रडका सिनेमा वॅलेंटाईन्स डे-ला पहायला अजून कोण येणार? आम्ही दोघंच असल्याने माझं बिपी पुन्हा वाढलं. थेटरात विशेष काही घडलं नाही. मला अपेक्षा होती असं नाही, पण प्रोबॅबिलिटी!!

सिनेमावरून घरी निघालो. माझं घरं जाताना रस्त्यातच होतं. सिग्नलला थांबलो असताना तिला बोट करून दाखवलं. दॅट इज माय अपार्टमेंट. दोन पाच मिनिटांनी तिने विचारलं. डू यु हॅव वाईन अ‍ॅट होम?

येड** आहेस तू! दॅट शूड हॅव बिन यूअर लाईन! पुढे यु टर्न मारला आणि ट्युब पेटली. शीट!!! काँडम??? या शक्यतेचा विचारच नव्हता केला. फकिंग प्रोबॅबिलिटी!! एकदम थंडच पडलो. चेतन भगतच्या पुस्तकापासून ते हॉलिवूड सिमेनात पाहिलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. समोरच मिळेल, पण आता कसं घेणार? मनात फक्त शिव्याच येत होत्या. आता काय??
...

चार पाच वेळा अलार्म स्नूझ करून झाला होता. ऑफिसची वेळ केव्हाच टळली होती. नंतरची रात्र फारच वेगात गेली. माझ्याकडून गाढवपणा झाला नाही असं नाही, पण प्रत्येकवेळी तिनंच प्रसंगावधान राखलं होतं. ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता. अलगद बिलगून मी तिच्या कानात म्हणालो, हॅपी वॅलेंटाईन्स डे...

Tuesday, May 4, 2010

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे! या अवकाश संशोधनात सिंहाचा वाटा असलेल्या 'हबल दुर्बिणीला' नुकतीच वीस वर्षं पुर्ण झाली, त्यानिमित्ताने हबलची ही छोटीशी ओळख.

'हबल'च्या जन्माची कहाणी ७० वर्षांची आहे. १९२३ मध्ये सर्वप्रथम 'अवकाशातील दुर्बिण' ही कल्पना 'हर्मन ओबर्थ', 'रॉकेट्रीच्या' जनकांपैकी एक, यांनी कागदावर मांडली. अवकाशातील दुर्बिणीचे जनक 'स्पीत्झर' यांनी १९६९ मध्ये शास्त्रंज्ञांना गोळाकरुन या प्रकल्पाची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. अखेर १९७७ मध्ये अमेरीकन काँग्रेसची संमती मिळाली. पृथ्वी विश्वाचे केंद्र आहे पासुन सुरु झालेली ही शोधमालिका, आपली आकाशगंगा हीच मुळात एकटी नाही हे इतर आकाशागंगां शोधुन सिद्ध करणारे 'एडविन हबल' यांचे नाव या दुर्बिणीला देण्यात आले.

२४ एप्रिल १९९० साली 'डिस्कव्हरी हे अंतराळयान हबलला घेउन अवकाशात झेपावले. दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २५ एप्रिल रोजी हबलला त्याच्या ईप्सित कक्षेत कार्यरत करण्यात आले. हबलची कक्षा पृथ्वीतळापासुन ५७५ किलोमीटर वर, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी शेवटी, आहे.

हबल एक पृथ्वी प्रदक्षिणा ९६ मिनिटात करतो, म्हणजेच त्याचा वेग ८ किलोमीटर प्रतीसेकंद किंवा २९,००० किलोमीटर प्रतितास इतका आहे! एखाद्या अंधार्‍या स्वच्छ रात्री तुम्ही हबलला तुमच्या डोळ्यांनी बघुही शकता. त्याकरता हा दुवा पहा. येथे Configuration मध्ये तुमचा देश, आणि शहर निवडा. मग खाली Satellites मध्ये  HST वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक तक्ता दिसेल, त्यावरुन तुम्हाला कधी व कुठे बघायचे हे दिसेल. एक छोटासा प्रकाशीत पण वेगाने हलणारा ठिपका अपेक्षित ठिकाणी-अपेक्षित वेळी दिसला तर तो हबलच असेल. (इतके कष्ट घ्यायचे नसतील तर नुसतेच हबलच्या स्थानाचे बदलते चित्र पहाण्याकरता येथे क्लिक करा)

हबलचे तंत्रज्ञान हे साधारण ८० च्या दशकातले, त्यावेळी कंप्युटर इतका प्रगत नव्हता, त्यानंतर झालेली विलक्षण प्रगती आपण जाणताच. आता ऐकायला गंमत वाटेल, पण हबलवरील एका मुख्य संगणकावर 'अतिप्राचिन' असा ४८६ प्रोसेसर होता! संगणाकाच्या जगात झपाट्याने मागे पडत चाललेले तंत्रज्ञान दुरुस्त करणे म्हणजे काय हे आपल्याला माहित असेलच. तश्याच अडचणी हबल शास्त्रंज्ञांनाही आल्या. ते असो, वाढदिवसाबद्दलच्या लेखात अडचणी नकोत नाही का. हबल दुर्बिणीतील तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती हवे असल्यास येथे पहा.

हबलने आजपर्यंत केलेले योगदान प्रचंड आहे, इतके की त्याने खगोलशास्त्राची पुस्तकेच बदलली आहेत. तसेच हबलने पाठवलेल्या चित्रांनी सामान्यांनाही मोहित केलं आहे. म्हणुनच कदाचित हबल आज एक सेलेब्रीटी आहे. हबलने लावलेल्या अनेक शोधांपैकी काही महत्त्वाचे शोध येथे पाहुयात. विश्वाचे वय, १३७५ कोटी वर्षापर्यंत बरोबर मोजणे हबल मुळे शक्य झाले. याआधी विश्वाचे वय १००० ते २००० कोटी यामध्ये असावे असा अंदाज होता. आता हा शोध कीती महत्त्वाचा? हे पाहण्याकरता ह्या आकड्यांची तुलना करुयात. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा इतिहास ४०० कोटी वर्षांचा आहे, मानवाचा इतिहास जाउद्या!

पण सर्वात महत्त्वाचा हबलने लावलेला शोध म्हणजे 'डार्क एनर्जीचा'. डार्क एनर्जी म्हणजेच ते अद्भुत बल ज्यामुळे हे विश्व सतत प्रसरण पावत आहे. (expanding universe). डार्क एनर्जीबद्दल अधिक जाणुन घेण्याकरता हे जरुर पहा. हे अत्यंत सुंदर असे स्थळ हबलचेच आहे.

याशिवाय हबलमुळे शास्त्रंज्ञांना तार्‍यांची निर्मिती कशी होते ते पाहता आले. अनेक आकाशगंगांना उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्थेंमध्ये पाहता, अभ्यासता आले. जेणे करुन विश्वाच्या निर्मितीचे कोडे काही अंशी तरी सुटेल अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

हबल डीप फील्ड, हबलने शोधलेल्या काही आकाशगंगा इतक्या लांब आहेत की त्यापासुन निघालेला प्रकाश इथे इथे पोहोचण्याकरीता हजारों कोटी वर्षे लागतात, म्हणजेच आपला सुर्य निर्माण होणाच्या आधी तिथुन निघालेला प्रकाश आज आपल्यापर्यंत पोहचत आहे.

हबलने अनेक ग्रहांचा जन्म टिपलांय, तरुण तार्‍यांच्या निर्मितीतील गॅस आणि इतर मॅटरने बनलेल्या  प्रोटोप्लॅनेटरी डिस्क्स दाखवल्या आहेत. ह्या विश्वातील (येथे विश्व म्हणजे फक्त पृथ्वी नाही, फक्त आपली आकाशगंगा नाही) सर्वात तेजस्वी घटना 'गॅमा-रे-बर्स्ट्' सुद्धा दाखवली आहे. ह्या अनंत अश्या विश्वात काही सेकंद ते काहि मिनिटं इतक्याच कालावधी साठी घडणारी ही घटना आपण पाहु शकतो यातच सगळे आले. त्याशिवाय अनेक मनोहर नेब्युले, आकाशगंगा वगैरे वगैरे हबलने दाखवले आहेतच. खाली काही निवडक चित्रे डकवत आहे, अधिक चित्रे येथे पहावित.
ही चित्रे पाहिल्यानंतर मी वरती 'स्वर्गीय' का म्हणालो ते पटले असेलच. चित्रांवर क्लिक केल्यास चित्रांचे स्रोत सापडतील. तर अश्या ह्या हबलच्या वापरासाठी कुणीही संमती मागु शकतो, आजवर हबलच्या मदतीने हजारो संशोधने प्रसिद्ध झाली आहेत. २००१ साली घेतलेल्या इंटरनेट पोलनुसार लोकांनी 'हॉर्सहेड नेब्युला' चे निरीक्षण नासाने करावे असे मत दिले होते.

तर असा हा हबल गेली वीस वर्षे आपल्या ज्ञानात भर घालतोच आहे, अधुनमधुन त्याची डागडुजीही केली गेली आहे. हबल अजुन १०-१५ वर्षे तरी काम करेल, मग त्याला रीटायर केले जाइल, पण अर्थातच त्याच्यापेक्षा प्रगत अश्या दुर्बिणीनेच.

Sunday, April 18, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास-३


तंबोराह-द ईयर विदाउट समर-१८१५
१२ चौ. कीमी क्षेत्रफळाचा कॅल्डेरा बनवणारा हा उद्रेक 'रेकॉर्डेड' इतिहासातील सर्वात मोठा. मागच्या भागात पाहिलेल्या क्राकातुआपेक्षा सुमारे पाच पट विध्वंसक. तंबोराह हा सुद्धा इंडोनेशीआतील एक पर्वतावर असलेला ज्वालामुखी. सुमारे १२५ क्युबीक किलोमीटर राख या उद्रेकातुन बाहेर पडली. ही राख सुमारे १५०० कीमी पर्यंत पसरली. ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम ४४ कीमी उंच होता. ह्या उद्रेकाच्या आधी सुमारे सहा वर्षे तंबोराह सक्रीय होता.

उद्रेकामुळे झालेल्या पर्वताच्या उंचीतील फरक पाहिल्यास या उद्रेकाची तीव्रता कीती असेल याची कल्पना येइल. उद्रेकामुळे पर्वताची उंची सुमारे ५००० फुटांनी कमी झाली. या घटनेत जवळजवळ १लाख लोक मृत्युमुखी पडले. यातील  १० हजार लोक विस्फोट, पायरोक्लास्टीक फ्लो इ. मुळे मेले, इतरांचा शेवट रोगराई आणि उपासमारीमुळे झाला.

या वर्षात जगभरात थंडीची लाट आली होती,म्हणुनच या वर्षाला 'द ईयर विदाउट समर' असे म्हणले जाते. यु. एस. जीऑलॉजीकल सर्वेनुसार जगभरातील तापमान ३ अंश सेल्सीअस पर्यंत खाली गेले. वाढलेल्या थंडीमुळे पीकांचे प्रचंड नुकसान होउन जीवीतहानी अधिकच वाढली.

कमी झालेल्या तापमानाचे मुख्य कारण उद्रेकातुन बाहेर पडलेला २० कोटी टन सल्फर डायॉक्साईड वायु. पण त्याशिवाय कमी झालेल्या सौरउर्जेच्या उत्सर्जनामुळे या तापमान बदलास हातभार लागल्याची शक्यता वर्तवली जाते. या काळात कमी झालेल्या उत्सर्जनाला डाल्टन मिनीमम म्हणले जाते.पीनाटुबो-१९९१
१५ जुन १९९१ साली फीलीपाईन्स मधील याच नावाच्या पर्वतावर झालेला हा शक्तीशाली विस्फोट.  भुगर्भ हालचालीचे निरीक्षण सर्वप्रथम सर्वात यशस्वीरीत्या या वेळी केले गेले. अगदीच कमी झालेली मनुष्यहानी प्रगत तंत्रज्ञानाचे यशच आहे असे म्हणावे लागेल. ५० हजारांपेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर यशस्वीरीत्या केले गेले.यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक रोगराइचे बळी ठरले. दुर्देवाने याच वेळी आलेल्या वादळाने परिस्थीती आणखीन बिघडली.

ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम सुमारे ७ कीमी उंच होता. या उद्रेकाआधी आणि नंतर भुकंपाचे अनेक हादरे नोंदवले गेले आहेत. उद्रेकाने पर्वाताच्या शिखरावर २ कीमी व्यासाचा कॅल्डेरा तयार झाला. ह्या उद्रेकाने जगभरातील तापमान सुमारे अर्धा अंश खाली गेल्याचे मानले जाते.

यांशिवाय काही महत्त्वाचे उद्रेक म्हणजे, वायोमींग राज्यातील यलो स्टोन येथे ठरावीक कालांतराने झालेले प्रचंड उद्रेक. (पहिला २१ लाख वर्षांपुर्वी, दुसरा त्यानंतर ७ लाख वर्षांनी, आणि तिसरा १४ लाख वर्षांनी, ह्या नियमाने या पुढचा उद्रेक आता होण्याची शक्यता आहे, कदाचित २०१२ ला व्हावा. ;) ) हे तीनही उद्रेक तंबोराहच्या उद्रेकाइतकेच शक्तीशाली होते.

३५०० वर्षांपुर्वीचा सँतोरीनी उद्रेक. 'लॉस्ट सीटी ओफ अ‍ॅटलांटीस', 'बायबल मधील दहा प्लेग' अश्या काही दंतकथांचा संबंध या उद्रेकाशी जोडला जातो.

आईसलँडचा उद्रेक कीती विनाशक?
हे पाहण्याकरीता आपण ह्या सगळ्या उद्रेकांची ढोबळमानाने तुलना करुयात.

शास्त्रज्ञ उद्रेकाची तीव्रता Volcanic Explosivity Index(VEI) ने मोजतात. ह्याची कल्पना येण्याकरता खालील चित्र पहा.

उद्रेक ---            VEI
टोबा   ---            ८
तंबोराह ---           ७
क्राकातुआ---         ६
पिनाटुबो ---          ६


राखेच्या उत्सर्जनानुसार तुलना

Thorvaldur Thordarson या शास्त्रज्ञाच्या मते आईसलँडच्या ह्या उद्रेकाचा VEI २ ते ३ असावा. आईसलँड्वर होणारी ही हालचाल प्रथमच होत नाहीए. मागील दहा वर्षांची हालचाल पाहता हालचाल आजुन वाढण्याची शक्यता थोर्वाल्दुर व्यक्त करतो.  शास्त्रज्ञांना काळजी आहे ती या पेक्षा मोठ्या अश्या 'काटला' ज्वालामुखी जागृत होण्याची. गेल्या हजार वर्षात आजपर्यंत तीन वेळा Eyjafjallajokull जागा झाला आहे आणि त्यानंतर काटला ही.

थोडक्यात्, हवाईकंपन्यांना होत असलेल्या प्रचंड नुकसानाशिवाय आज तरी फार मोठे नुकसान अपे़क्षित नाही.

समाप्त.

संदर्भ साभार,
१. HOW VOLCANOES WORK सॅन डीएगो स्टेट युनिव्हर्सिटी.

Saturday, April 17, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास-२

बहुतेक जगातील सर्वात प्रसिद्ध ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे पॉम्पेईचा. इसवीसन ७८-७९ मध्ये झालेल्या उद्रेका मुळे पॉम्पेई शहराचा संपुर्ण विनाश झाला.जगातील हा पहिला असा उद्रेक ज्याची तपशीलवार माहिती इतिहासात आढळते. प्लीनी द यंगर नामक मनुष्याने साधारण २० मैलांवरुन याची निरिक्षणे नोंदवली आहेत. यात त्याने उद्रेकाच्या आधी झालेले भुकंपाचे हादरे, इरप्शन कॉलम *, पायरोक्लास्टीक फ्लो, आणि त्सुनामीबद्दल नोंदी केल्या आहेत. शास्त्रंज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ह्याचा इरप्शन कॉलम सुमारे २० मैल (३२ कीमी) असावा, २० तासात सुमारे ४ क्युबिक किलोमीटर राख या उद्रेकात बाहेर पडली.

*ह्या प्रकारच्या उद्रेकाला प्लीनीयन उद्रेक असे संबोधले जाते.

वेसुविअस पर्वतातील या उद्रेकामुळे सुमारे ३००० लोक पडणार्‍या राखेमुळे गुदमरुन मेले,काही विषारु वायुंमुळे मेले आणि गाडले गेले. पॉम्पेईमध्ये अनेक सांगाडे अश्या अवस्थेत उत्खननात सापडले आहेत. त्याच सांगाड्यांमध्ये प्लॅस्टर भरुन केलेल्या पुतळ्यांची ही काही चित्रे.
१.
 २.

३. साखळीने बांधलेला कुत्रा (शक्यता)

पॉम्पेई हे सोळाव्या शतकापर्यंत जमिनीखाली होते. १७ व्या शतकात सुरु केलेले उत्खनन तेथे आजही सुरु आहे. जवळ जवळ ७०-७५ % गावाचे उत्खनन आजपर्यंत झाले आहे. आज पॉम्पेई हे 'वर्ल्ड हेरीटेज साइट' असुन सुमारे २५ लाख प्रेक्षक दर वर्षी तेथे जातात.

ह्या उद्रेकानंतरही आज पर्यंत वेसुवियस ५० वेळा जागा झाला आहे. ११व्या शतकापर्यंत १०० वर्षांतुन किमान एकदा वेसुवियस जागा झाला. ११ व्या शतकानंतर मात्र ६०० वर्षे तो निद्रीतावस्थेत गेला. सद्ध्या जागृत नसला तरी गेल्या शतकात काही उद्रेक झाले आहेत. उत्खननातील माहितीनुसार पॉम्पेईच्या घटनेआधीही काही लहान उद्रेक झाले असावेत असा अंदाज बांधता येतो.

क्राकातुआ १८८३
भुकंपप्रवण अश्या इंडोनेशीयातील सुमात्राच्या जवळील बेटावरील १८८३ साली झालेला हा प्रचंड उद्रेक. ह्या उद्रेकाची क्षमता, हिरोशिमावर टाकलेल्या न्युक्लीअर बॉम्बच्या तेरा हजारपट असावी. हा विस्फोट ऑस्ट्रेलियापर्यंत ऐकु गेल्याच्या नोंदी आहेत. २१ क्युबीक किलोमीटर राख हवेत सोडण्यार्‍या या उद्रेकाची ताकद इतकी होती की यामुळे नवीन बेटाची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते.जर्मन वॉरशीप एलिझाबेथने या उद्रेकाच्या इरप्सशन कॉलमची नोंद ११ कीमी इतकी केली आहे. ह्यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटा ४० मीटर उंचीच्या होत्या. याची माहीती एका प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत,

"Suddenly we saw a gigantic wave of prodigious height advancing toward the seashore with considerable speed. Immediately, the crew . . .managed to set sail in face of the imminent danger; the ship had just enough time to meet with the wave from the front. The ship met the wave head on and the Loudon was lifted up with a dizzying rapidity and made a formidable leap... The ship rode at a high angle over the crest of the wave and down the other side. The wave continued on its journey toward land, and the benumbed crew watched as the sea in a single sweeping motion consumed the town. There, where an instant before had lain the town of Telok Betong, nothing remained but the open sea."

पायरोक्लास्टीक फ्लो, त्सुनामी आणि उद्रेक यासगळ्यांचा परिणाम म्हणुन ३५००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. उद्रेकामुळे सजीव सृष्टी पुर्ण नाहीशी झाली आहे का हे बघायला जेव्हा काही शास्त्रज्ञ बेटावर पोहोचले तेव्ह्या त्यांना फक्त काही कोळी (स्पाईडर) जीवंत सापडले, पण एक-दोन वर्षात पुन्हा गवत वगैरे उगवणे सुरु झाल्याचे सांगितले जाते.

ह्या उद्रेकाने हवेत फेकली गेलेली राख कित्येक वर्षे वातावरणात(स्ट्रॅटोस्फीअर जवळ) होती. ह्या राखेमुळे तयार झालेला ढग विषुववृत्तापर्यंत पसरला. ह्या ढगात सल्फर डाय-ऑक्साइड वायुही होता. यावायुचे पाण्याच्या वाफेबरोबर रसायन झाल्याने आम्ल (अ‍ॅसीडीक एअरोसोल्स) आणि राखेचे एक आवरण तयार झाले, ह्या आवरणामुळे सुर्याचा बराच प्रकाश परावर्तित होउ लागला. यामुळे जगभरातील तापमान २ अंशांपर्यंत खाली गेले. या आवरणामुळे अवकाशात रंगांची उधळण झाल्याच्या नोंदी आहेत. या काळातील सुर्योदय आणि सुर्यास्त चित्रकारांच्या विशेष आवडीचे होते.

विल्यम अ‍ॅस्क्रॉफ्टने चितारलेला एक सुर्यास्त.

ज्वालामुखी आणि इतिहास

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.

सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.

सर्वात नुकताच झालेला सुपर व्होल्कॅनो म्हणजे टोबाचा वोल्कॅनो जवळ जवळ ७४,००० वर्षांपुर्वीचा , याचा आपल्या इतिहासाशी असलेला संबंध थोडासा रंजक आणि मतभेद असलेला आहे.

पर्मिअन एक्स्टींशन
सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रेट्स (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रेट मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.

ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.


द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे सापडल्याने ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो.

संदर्भ