Sunday, February 19, 2012

वॅलेंटाईन्स डे...

नेहमीच्या वेळेआधीच मी जागा होतो, अलार्मला अजून एक तास अवकाश आहे. आज काय समोर मांडलयं कोणास ठाऊक. फकिंग प्रोबॅबिलिटी!!

अलार्म मोड ऑफ करून मी उठतो. अरिझोनातील गुलाबी सकाळ, डोक्यात घुटमळणार्‍या अनिश्चिततेने वेगळाच उत्साह भरल्यासारखा जाणवतोय. अ‍ॅड्रेनलिन.. की एन्डॉर्फिन्स?

फोर्टीन फेब..

साला, बाप जन्मात फोर्टीन फेब माझ्या आयुष्यात येईल असा विचार कधी केला नव्हता. पुरोगामी विचारसरणी असली तरी याबाबतीत आम्ही प्रतिगामीच! बारमध्ये वगैरे जाऊन पोरींना प्रपोज करायची कधी हिंमत वगैरे झाली नाही. डेटिंगच्या सीटकॉम्स जरा लवकर पाहिल्या असत्या आयुष्यात तर काहीतरी उपयोग तरी झाला असता. शेवटी हिय्या करून ऑनलाईन डेटींग साईटवर रजिस्टर केलं. पण तरी स्वतःहून कोणाला मॅसेज करायची हिंमत होत नव्हती. डेटिंगसाईटचं अ‍ॅप मात्र भारी होतं, डेट्स अ‍ॅक्टीव्ह इन युवर एरिया वगैरे. आम्ही आपलं महिनाभर फोटो बघणे, प्रोफाईल्स चाळणे वगैरे अभ्यास करत होतो. अरिझोना फार कंझर्वेटिव्ह आहे, इथल्या 'गॉड फिअरींग' पोरी काय ब्राउन स्कीनवाल्यात इंटरेस्ट दाखवणार? असं वाटायला लागलं होतं. एके दिवशी ऑफिसात फोनवर नोटीफिकेशन आलं. ब्ला ब्ला मेसेज्ड यू! टिपीकल मेसेज, प्रोफाईल आवडलं वगैरे वगैरे. उत्तर देताना परिक्षेत केला नसेल एव्हढा विचार केला. मॅनेजमेंटमध्ये शिकवतात तसली सगळी कन्व्हर्सेशनल स्किल्स वाचून काढली. एखाद्या अमेरीकन पोरीने स्वतःहून मेसेज करण्याची शक्यता इतकी कमी होती की, उत्तराला उत्तर मिळवण्याशिवाय पर्याय नव्हता. थोड्याश्या मेहनतीने हे जमलं. पुढे इमेल देवाण घेवाण झाली, टेक्स्ट झाले आणि फोनवर बोलणंही झालं. भेटायचं ठरलं. सगळीकडे पुढाकार तिचाच. दोन दिवसात इतकी प्रगती माझ्या पुढाकाराने होण्याची शक्यता तशी नव्हतीच म्हणा.

मित्राचे आईवडील भारतातून आले होते त्यांना भेटायचं म्हणून विकेंडला जमलं नाही. येडपटच आहे मी!! मग तिचाच इमेल आला, हाऊ अबाऊट वॅलेंटाईन्स डे? बोंबला! व्हाट डझ इट मीन? इमेल पन्नास वेळा वाचला, गुगलवर अभ्यास करून झाला पण अर्थ काही लागेना. बराच वेळ गेल्याने तिला अंदाज आला असावा. तिचाच नवा इमेल आला, "डोंट वरी, वुई डोंट हॅव टु सेलिब्रेट इट अ‍ॅज ए वॅलेंटाईन्स. जस्ट अ कॅज्युअल डेट" वगैरे. याह, राईट! मी स्वत:शीच म्हणालो. पण एखाद्या सुंदर मुलीने विचारल्यावर तुमच्याकडे काही ऑप्शन असतो का?

एकदम फाटली होती. समबडी डेटींग मी वॉज ए मॅथेमॅटिकल इंपॉसिबिलीटी. भलत्यासलत्या शंका होत्याच, पण फाटली होती वेगळ्याच कारणाने. त्या अमेरिकन पोरीची ही शंभरावी डेट असेल आणि आमची इथे सुरुवात होती. तीन दिवस गुगलवरून जितकं जमेल तितकं ज्ञान गोळा केलं होतं. पण व्हेरीबएल्स, टू मेनी व्हेरीएबल्स!! आज जमणार नाही, एकदम मिटिंग लांबली, सर्दी झाली, गाडी बिघडली, काहीतरी कारण काढून टेक्स्ट करावं वाटत होतं. नर्व्हसनेस आणि लूज मोशनचा काही संबंध आहे का? गुगलायला पाहिजे. शंखवटी घेऊन दिवस काढावा लागणार आज!

फक इट, आय एम गोईंग ऑन अ डेट टुनाईट!!

कसाबसा आवरून ऑफिसात पोहोचलो. आज क्लायंट बरोबर मिटिंग, माझं मॉडेल अजेंडावर आहे. सकाळी सकाळी मॉडेलवरून बॉसशी वाजतं. च्यायला, बायकोबरोबर भांडून येतो की काय रोज? झालं, ऐनवेळेला मॉडेलमध्ये बदल! माझं सगळं लक्ष मात्र मोबाईलकडे.

एक बरं झालं की भारतीय हॉटेलात जेवायला जायचं ठरलं. तीन वर्षं होऊन गेली इथे तरी मी अजून फारसा भारतीय हॉटेलांच्या पलिकडे गेलो नव्हतो. नॉन्व्हेज अगदी वर्ज्य नसलं तरी जीभ काही अजून सरावली नव्हती. मिटींग ठीकठाक झाली, औपचारिक बदल वगैरे सोडले तर काही टेंशन नाही. माझं प्रेझेंटेशन उरकल्यानंतर मात्र मिटिंग माझ्यासाठी संपलीच होती. काहीही न ऐकता आपण मान डोलावून ऐकतो आहोत असं दाखवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया एव्हाना मला जमली होती. आता एकच विषय डोक्यात उरला होता...

नखं कापायची राहिलीएत. शॅंपू करूनच जावं. इस्त्री? फॉर्मल घालावेत की कॅज्युअल? डेटला घालावा असा एकही स्वेटर किंवा जॅकेट नाही आपल्याकडे. टेबल बुक करायला पाहिजे, आज गर्दी असणार. बरं झालं आठवलं नाहीतर पचका झाला असता. पोटाचा घेर वाढतोय!! च्यायला, गाडीत फार कचरा झालाय. माझा फेवरेट बँड कोणता? मेटॅलिका डाऊनलोडकरून जमाना झाला, पण अजून ऐकलं नाहीए. सालसा वगैरे तरी शिकायला हवा होता. यूझलेस!! भूक लागलीए, पण आता काही खाल्लं तर वांदा होणार. हा फारच कॅज्युअल वाटतोय टीशर्ट. एकदम प्लेन टीशर्ट म्हणजे बोअरींग होईल. फुल शर्ट घालावा, थंडीचीपण सोय होईल. वॉक वगैरे घ्यायची वेळ आली तर कुडकुडकायला नको. च्युईंगम ठेवावा बरोबर. इंडियन म्हणजे कांदा-लसूण असणार. अशीच आमुची आई असती हा डायलॉग मला आत्ता का आठवतोय!! तीचं प्रोफाईल परत एकदा वाचून घ्यावं. ह्यातला एकही लेखक ओळखीचा नाही!! टीव्ही फारशी बघत नाही वाटतं!...

वेळ झाली, तिला तिच्या घरून पिक अप केलं. फोटोत दिसते तशीच आहे तर. प्रोफाईलवरचं वयही खरंच असावं. मला न्याहाळणारी तिची नजर मला आतल्या आत लाजवून गेली. या क्षणी माझं बिपी किती असेल? अ‍ॅक्सरलरेटर जरा जास्तच दाबतोय का मी? चिल इट, मॅन!! हॉटेलपाशी पोहोचलो, पार्किंग लाईटमध्ये पहिल्यांदाच एकमेकांना नीट पाह्यलं. बरं झालं फुल शर्ट घातलाय, नाहीतर हातावरचे उभे राहिलेले केस तिला दिसले असते. तिने पंजाबी ड्रेस घातलाय की काय!! काहीही!

भेंडी, नेमकं कोणीतरी ओळखीचं दिसणार इथे. छ्या! हे कसं लक्षात आलं नाही आधी! हॉटेलात गेल्यावर पहिले नजर फिरवली. हुश्श! कोणी नाही. एकमेकांना पारखत असतानाच ऑर्डरी गेल्या. हा प्रकार एकदम गमतीदार होता. आईस ब्रेक झाला आणि जरा हलकं वाटलं. एकंदरीत गप्पा टप्पा ठीकच झाल्या. आपल्याला तर पोरगी आवडली. भूक मात्र का मेली होती काय माहित! टिपीकल अमेरीकन लोकांसारखं लो इन स्पाईस न मागता तिने 'स्पाईसी' मागवलं होतं. इंटरेस्टिंग! पॉलिटीक्स, इनइक्वॅलिटी वगैरे विषय म्हणजे काय रोम्यांटिक नाहीत, पण तरी तिला त्यात इंटरेस्ट असावा. नाहीतर वांदाच झाला असता. टु गो बॉक्सेस आल्यानंतर निघूया म्हटलं. तिला बहूतेक बसून गप्पा मारायच्या होत्या! मिडलक्लास मोरॉन आहे मी!

हाऊ अबाऊट अ मूव्ही? तिनेच विचारलं. दगड आहेस लेका तू, दगड! जवळच्याच थेटरात गाडी दामटवली. 'द डिसेंडन्ट्स'ची तिकिटं काढली. खरं तर 'द व्हाव'ची काढायला हवी होती. पण तेव्हढी अक्कल असती असती तर ना. आख्ख्या थेटरात आम्ही दोघंच होतो. 'द डिसेंडन्ट्स' सारखा बायको कोमात वगैरे असलेला रडका सिनेमा वॅलेंटाईन्स डे-ला पहायला अजून कोण येणार? आम्ही दोघंच असल्याने माझं बिपी पुन्हा वाढलं. थेटरात विशेष काही घडलं नाही. मला अपेक्षा होती असं नाही, पण प्रोबॅबिलिटी!!

सिनेमावरून घरी निघालो. माझं घरं जाताना रस्त्यातच होतं. सिग्नलला थांबलो असताना तिला बोट करून दाखवलं. दॅट इज माय अपार्टमेंट. दोन पाच मिनिटांनी तिने विचारलं. डू यु हॅव वाईन अ‍ॅट होम?

येड** आहेस तू! दॅट शूड हॅव बिन यूअर लाईन! पुढे यु टर्न मारला आणि ट्युब पेटली. शीट!!! काँडम??? या शक्यतेचा विचारच नव्हता केला. फकिंग प्रोबॅबिलिटी!! एकदम थंडच पडलो. चेतन भगतच्या पुस्तकापासून ते हॉलिवूड सिमेनात पाहिलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. समोरच मिळेल, पण आता कसं घेणार? मनात फक्त शिव्याच येत होत्या. आता काय??
...

चार पाच वेळा अलार्म स्नूझ करून झाला होता. ऑफिसची वेळ केव्हाच टळली होती. नंतरची रात्र फारच वेगात गेली. माझ्याकडून गाढवपणा झाला नाही असं नाही, पण प्रत्येकवेळी तिनंच प्रसंगावधान राखलं होतं. ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता. अलगद बिलगून मी तिच्या कानात म्हणालो, हॅपी वॅलेंटाईन्स डे...