Tuesday, May 4, 2010

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे! या अवकाश संशोधनात सिंहाचा वाटा असलेल्या 'हबल दुर्बिणीला' नुकतीच वीस वर्षं पुर्ण झाली, त्यानिमित्ताने हबलची ही छोटीशी ओळख.

'हबल'च्या जन्माची कहाणी ७० वर्षांची आहे. १९२३ मध्ये सर्वप्रथम 'अवकाशातील दुर्बिण' ही कल्पना 'हर्मन ओबर्थ', 'रॉकेट्रीच्या' जनकांपैकी एक, यांनी कागदावर मांडली. अवकाशातील दुर्बिणीचे जनक 'स्पीत्झर' यांनी १९६९ मध्ये शास्त्रंज्ञांना गोळाकरुन या प्रकल्पाची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. अखेर १९७७ मध्ये अमेरीकन काँग्रेसची संमती मिळाली. पृथ्वी विश्वाचे केंद्र आहे पासुन सुरु झालेली ही शोधमालिका, आपली आकाशगंगा हीच मुळात एकटी नाही हे इतर आकाशागंगां शोधुन सिद्ध करणारे 'एडविन हबल' यांचे नाव या दुर्बिणीला देण्यात आले.

२४ एप्रिल १९९० साली 'डिस्कव्हरी हे अंतराळयान हबलला घेउन अवकाशात झेपावले. दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २५ एप्रिल रोजी हबलला त्याच्या ईप्सित कक्षेत कार्यरत करण्यात आले. हबलची कक्षा पृथ्वीतळापासुन ५७५ किलोमीटर वर, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी शेवटी, आहे.

हबल एक पृथ्वी प्रदक्षिणा ९६ मिनिटात करतो, म्हणजेच त्याचा वेग ८ किलोमीटर प्रतीसेकंद किंवा २९,००० किलोमीटर प्रतितास इतका आहे! एखाद्या अंधार्‍या स्वच्छ रात्री तुम्ही हबलला तुमच्या डोळ्यांनी बघुही शकता. त्याकरता हा दुवा पहा. येथे Configuration मध्ये तुमचा देश, आणि शहर निवडा. मग खाली Satellites मध्ये  HST वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक तक्ता दिसेल, त्यावरुन तुम्हाला कधी व कुठे बघायचे हे दिसेल. एक छोटासा प्रकाशीत पण वेगाने हलणारा ठिपका अपेक्षित ठिकाणी-अपेक्षित वेळी दिसला तर तो हबलच असेल. (इतके कष्ट घ्यायचे नसतील तर नुसतेच हबलच्या स्थानाचे बदलते चित्र पहाण्याकरता येथे क्लिक करा)

हबलचे तंत्रज्ञान हे साधारण ८० च्या दशकातले, त्यावेळी कंप्युटर इतका प्रगत नव्हता, त्यानंतर झालेली विलक्षण प्रगती आपण जाणताच. आता ऐकायला गंमत वाटेल, पण हबलवरील एका मुख्य संगणकावर 'अतिप्राचिन' असा ४८६ प्रोसेसर होता! संगणाकाच्या जगात झपाट्याने मागे पडत चाललेले तंत्रज्ञान दुरुस्त करणे म्हणजे काय हे आपल्याला माहित असेलच. तश्याच अडचणी हबल शास्त्रंज्ञांनाही आल्या. ते असो, वाढदिवसाबद्दलच्या लेखात अडचणी नकोत नाही का. हबल दुर्बिणीतील तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती हवे असल्यास येथे पहा.

हबलने आजपर्यंत केलेले योगदान प्रचंड आहे, इतके की त्याने खगोलशास्त्राची पुस्तकेच बदलली आहेत. तसेच हबलने पाठवलेल्या चित्रांनी सामान्यांनाही मोहित केलं आहे. म्हणुनच कदाचित हबल आज एक सेलेब्रीटी आहे. हबलने लावलेल्या अनेक शोधांपैकी काही महत्त्वाचे शोध येथे पाहुयात. विश्वाचे वय, १३७५ कोटी वर्षापर्यंत बरोबर मोजणे हबल मुळे शक्य झाले. याआधी विश्वाचे वय १००० ते २००० कोटी यामध्ये असावे असा अंदाज होता. आता हा शोध कीती महत्त्वाचा? हे पाहण्याकरता ह्या आकड्यांची तुलना करुयात. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा इतिहास ४०० कोटी वर्षांचा आहे, मानवाचा इतिहास जाउद्या!

पण सर्वात महत्त्वाचा हबलने लावलेला शोध म्हणजे 'डार्क एनर्जीचा'. डार्क एनर्जी म्हणजेच ते अद्भुत बल ज्यामुळे हे विश्व सतत प्रसरण पावत आहे. (expanding universe). डार्क एनर्जीबद्दल अधिक जाणुन घेण्याकरता हे जरुर पहा. हे अत्यंत सुंदर असे स्थळ हबलचेच आहे.

याशिवाय हबलमुळे शास्त्रंज्ञांना तार्‍यांची निर्मिती कशी होते ते पाहता आले. अनेक आकाशगंगांना उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्थेंमध्ये पाहता, अभ्यासता आले. जेणे करुन विश्वाच्या निर्मितीचे कोडे काही अंशी तरी सुटेल अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

हबल डीप फील्ड, हबलने शोधलेल्या काही आकाशगंगा इतक्या लांब आहेत की त्यापासुन निघालेला प्रकाश इथे इथे पोहोचण्याकरीता हजारों कोटी वर्षे लागतात, म्हणजेच आपला सुर्य निर्माण होणाच्या आधी तिथुन निघालेला प्रकाश आज आपल्यापर्यंत पोहचत आहे.

हबलने अनेक ग्रहांचा जन्म टिपलांय, तरुण तार्‍यांच्या निर्मितीतील गॅस आणि इतर मॅटरने बनलेल्या  प्रोटोप्लॅनेटरी डिस्क्स दाखवल्या आहेत. ह्या विश्वातील (येथे विश्व म्हणजे फक्त पृथ्वी नाही, फक्त आपली आकाशगंगा नाही) सर्वात तेजस्वी घटना 'गॅमा-रे-बर्स्ट्' सुद्धा दाखवली आहे. ह्या अनंत अश्या विश्वात काही सेकंद ते काहि मिनिटं इतक्याच कालावधी साठी घडणारी ही घटना आपण पाहु शकतो यातच सगळे आले. त्याशिवाय अनेक मनोहर नेब्युले, आकाशगंगा वगैरे वगैरे हबलने दाखवले आहेतच. खाली काही निवडक चित्रे डकवत आहे, अधिक चित्रे येथे पहावित.
ही चित्रे पाहिल्यानंतर मी वरती 'स्वर्गीय' का म्हणालो ते पटले असेलच. चित्रांवर क्लिक केल्यास चित्रांचे स्रोत सापडतील. तर अश्या ह्या हबलच्या वापरासाठी कुणीही संमती मागु शकतो, आजवर हबलच्या मदतीने हजारो संशोधने प्रसिद्ध झाली आहेत. २००१ साली घेतलेल्या इंटरनेट पोलनुसार लोकांनी 'हॉर्सहेड नेब्युला' चे निरीक्षण नासाने करावे असे मत दिले होते.

तर असा हा हबल गेली वीस वर्षे आपल्या ज्ञानात भर घालतोच आहे, अधुनमधुन त्याची डागडुजीही केली गेली आहे. हबल अजुन १०-१५ वर्षे तरी काम करेल, मग त्याला रीटायर केले जाइल, पण अर्थातच त्याच्यापेक्षा प्रगत अश्या दुर्बिणीनेच.