Thursday, March 25, 2010

बाप्पाशी गप्पा-2.


काय भानगड असेल असा विचार करतच होतो तेव्हढ्यात जी-मेल वर "बाप्पा wants to chat with you" !!! बाप्पाचा इमेल तर भन्नाटच होता. फक्त 'बाप्पा' @ वगैरे काही नाही! मी चॅट रीक्वेस्ट अक्सेप्ट करणार इतक्यात तिकडुन बाप्पाने नमस्कार पाठवला,

बाप्पा: नमस्कार!

बाप्पाची चॅट रीक्वेस्ट आपोआप नाहीशी झाली.

मी: राम राम!

बाप्पा: बरोबर ओळखलस मला. :-)

स्माइली!

मी: म्हणजे?

बाप्पा: हा हा. तुझा 'म्हणजे' अपेक्षितच होता. तुझे प्रतिसाद वाचत असतो मी.

आता मात्र मला रहावले नाही, मी विचारलंच!
मी: पण मी?

बाप्पा: अरे बाबा, माझ्यावर अंधश्रद्धा ठेवणारे एकाचे दहा करुन काय काय पसरवात माझ्या नावाने हे तुला मी का सांगायला हवे?

मी: तुच तयार केलेले लोक ना हे?

बाप्पा: अजुन प्रश्नचिन्ह आहेच का? :-)

मी: शेवटी मी पडलो नास्तिक. :-)

बाप्पा: अरे, हा माणुस एकच काय तो चुकीचा बनवला रे मी. तुमच्या भाषेत सांगायचं तर डी-बगींग मध्ये गोंधळ झाला अन बर्‍याच चुका राहुन गेल्या. जे निसर्गाच्या नियमानुसार घडते त्याला चमत्कार म्हणणारी मंडळी तुम्ही, आणि स्वत:च केलेल्या पराक्रमाला मात्र दगडं फेकुन मारता!

मी: ???

बाप्पा: माणसानेच शोधलेल्या रेल्वेवर 'भुतांनी चालवलेली गाडी' म्हणुन दगड फेकणारे कोण? ओटीसच्या इलीवेटरला काय समजला होतात? तु विसरलास?

मी: :-) पण मग तु काही करत का नाहीस?

बाप्पा: अरे ही मंडळी इतकी आंधळी झाली आहेत की खुद्द मी सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणारच नाही. मुळात देव तोच जो कुणालाही कधीच दिसु शकणार नाही असा रुलच करुन ठेवलाय त्यांनी.खुद्द मी आलो तर लगेच 'फाउल' म्हणुन पुढील सर्व बादच की!

मी तुझ्याशी खरंच बोललो का ह्यावर तु जरा विचार करशील, माझा शोध घ्यायचा प्रयत्न केलासच, पण हे नक्की काय याचा छडा लावायचा प्रयत्न करशील. या उलट जर मी माझ्याबद्द्ल भ्रामक कल्पना असणार्‍यांशी बोललो तर एकतर कंप्युटर भुताने झपाटला आहे म्हणतील नाहीतर मठ उघडुन 'सत्यानंद स्वामी' होउन लोकांना लुबाडतील.

मी: पण मग हे प्रकरण संपायचे तरी कसे?

बाप्पा: माणसानेच ह्या कल्पना माणसाच्या मनात घुसवल्या, माणुसच त्या दुर करु शकतो.

मी:खरंय! अरे पण तु कंप्युटर, चॅट, फोरम्स इथे काय करतोयस?

बाप्पा: अनादी मी अनंत मी!

मी: हा हा!

बाप्पा: असो, आता पळतो, एका तमिळ फोरम वरती जोरदार काथ्याकुट सुरु आहे माझ्या नावाने, जायला हवे! जाता, जाता ट्वीटरवर माझे 'बाप्पा' हॅँडल आहे, 'फ़ॉलो' करा!

मी: जरुर! भेटुच!

दुर कुठुन तरी मला, ' .. डंका बोले दुम दुम, जागो जागो अब तुम' ऐकु यायला लागलं! माझ्या समोर पांढरी चमकादार छोटीसी चौकट दिसत होती. त्यावर इँग्रजीत 'डीसमीस आणि स्नुझ' असं लिहलेलं होतं. मी काहीतरी बटण दाबतोय असं मला जाणवलं. आवाज बंद झाला...

Saturday, March 20, 2010

बाप्पाशी गप्पा!

नेहमीप्रमाणे आख्खी रात्र इंटरनेटावर वाया घालवुन पहाटे सहा-सातच्या सुमारास मी झोपायलाच निघालो होतो तितक्यात 'व्यक्तीगत निरोप (1)' असे वाचले आणि म्हणलं आता कोण?

व्यनीचा विषय होता, 'गुड मॉर्निंग' आणि पाठवणा-या सदस्याचे नाव 'बाप्पा'! मी निरोप उघडला आणि काय लिहलेय ते वाचले पण काही संदर्भ लागेना, निरोपात मजकुर होता,
काय राव, नवीन सदस्यांची उडवता वगैरे ठिक आहे हो, पण आमच्या मागे हात धुवुन का लागलात?
-बाप्पा.
माझ्या डोक्यात काहीही उजेड न पडल्याने म्हणलं हा बाप्पा आहे तरी कोण बघावे! 'बाप्पा' वर क्लिक केले तर समोर "तुम्हाला या पानाशी पोहोचण्याची मुभा नाही" !! नेहमीप्रमाणे राजेंच ड्रुपल गंडलं दिसतंय असं म्हणत चार शिव्या देउन पुन्हा लॉग़ इन केलं. पुन्हा क्लिकलो, पुन्हा तेच, "तुम्हाला या पानाशी पोहोचण्याची मुभा नाही"!!! लॉग आउट तर झालेलो नाही याची यावेळी खात्री केली! काय भानगड आहे कळेना! ट्युब पेटली, संपादकमंडळींपैकी कुणीतरी चेष्टा करतंय तर! धम्याच असणार म्हणुन चार शिव्या त्याला दिल्या आणि हजर सभासदांची लिस्ट पाहीली तर फक्त मीच हजर! निरोप तर काही क्षणांपुर्वीच आलेला आहे! अच्छा बच्चु असं म्हणुन बाप्पाला निरोपाचं उत्तर लिहायला घेतलं.

मॉर्निंग, पण ती तर इथे, तुम्ही भारतात असाल तर एव्हीनींग. कशाबद्दल बोलता आहात? मला काही संदर्भ लागला नाही. जरा सविस्तर लिहा. असो, आता मी झोपायला जात आहे, उद्या भेटुच!
-नाईल.


उत्तर पाठवले आणि लॉगआउट झालो, मुद्दाम! मला पाळत ठेवायची होती हा बाप्पा पुन्हा लॉग इन होतो का! सारखं रीफ्रेश करत राहिलो. इतर मराठी संस्थळांवरुनही लॉग आउट केले, तिथल्या हजर सभासदांच्या यादीकडे लक्ष ठेवुनच होतो. जवळ जवळ अर्धा तास कुठेच काही संशयास्पद आढळलं नाही. जाम झोप येत होती, म्हणलं एकदा लॉगइन करुन पहावं आणि झोपावं. लॉग इन केलं आणि मी उडालोच! पुन्हा 'व्यक्तीगत निरोप (1)' !! हजर सभासदात मी एकटाच! व्यनी उघडुन सर्वप्रथम वेळ पाहीली! मी उत्तर दिल्याच्या दुस-याच मिनिटाला उत्तर आलेले होते, तेव्हा तर मी लॉग्ड इन होतो, इतर कोणीही हजर नव्हते! आता मात्र डोस्कं सटकलं! 'माझे खाते' वर क्लिक करुन नव्या टॅबमध्ये उघडले, 'वाटचाल' वर गेलो. माझे नुकतेच दिलेले प्रतिसाद वाचले, त्याखाली आलेले इतर प्रतिसाद वाचले, बाप्पा हे नाव कुठेच दिसलं नाही! एकदम आठवलं, च्यायला मी त्याचा निरोप तर वाचलाच नाही!

किती शोधाशोध कराल राव? दिव्या खाली अंधार असे झाले की तुमचे! खरंच कळले नाही मी कोण ते?
असं करा, तुमचा इमेल पाठवा व्यनीने, चॅट करुयात!
-बाप्पा

क्रमश:

तळटिपा: व्यक्तीगत निरोप=इमेल. इतर पात्रे म्हणजे आमचे संस्थळांवरील मित्र.