Monday, January 4, 2021

पक्षीनिरीक्षण - बाळगावा असा छंद

लहानपणापासून माहितीपटांत पाहिल्याप्रमाणे जसा डेव्हिड अ‍टेनबरो कोणत्यातरी जंगलात किंवा अभयारण्यात एखाद्या प्राण्याच्या शोधात जातो, तसे आपणही अद्भुत आणि विविध प्राणी-पक्षी पहावयास जावे असे मला नेहमीच वाटत आले आहे. अनेक प्राणी-पक्षी नामशेष व्हायच्या आत पहायला जायचे बेत मी शक्य होईल तसे आखतो आहे. बोर्नीयोच्या जंगलात जाऊन नामशेष होण्याच्या काठावर असलेल्या ओरांगउटान आणि र्‍हायनॉसोरस हॉर्नबील (Rhinoceros Hornbill) पाहण्याची संधीही नुकतीच मिळाली. मानवाने जवळजवळ संपुष्टात आणलेल्या फिलीपीन्सच्या पर्जन्यवनात (rain-forest) अगदी तुरळक संख्येने उरलेल्या फिलीपिनी गरुडांचा (Philippine Eagle) अयशस्वी शोधही घेतला. या वर्षी, म्हणजे २०२० साली ब्राझिलच्या जंगलात जाण्याचे बेत मी आखत होतो, मात्र करोना विषाणूने सगळेच बेत रद्द केले.

Rhinoceros Hornbill, Borneo, Malaysia.
 

पण करोनामुळे एकदम थंडावलेल्या मानवी जगात वन्यजीवनाचे अस्तित्व जवळपासही आहे हे जाणवायला लागले. या विषयीच्या बातम्या तुम्ही सर्वांनी वाचल्या असतीलच. विशेषत: पक्षीनिरीक्षणांत यावेळी खास वाढ दिसून आली. घरात अडकून बसलेल्या अनेकांना अंगणातील-खिडकीतील पक्ष्यांच्या वास्तव्याने दिलासा मिळाला. जवळपासच्या ओस पडलेल्या बागांमध्ये अचानक नवीन आणि दुर्मीळ पक्षी दिसू लागले. ह्या नवीनच सापडलेल्या छंदामुळे फार दूर न जाताही पक्षीनिरीक्षणाचा आनंद माझ्याप्रमाणे कोणालाही लुटता येईल.

उन्हाळ्यात कॅनडातील जंगलात प्रजननासाठी येणारा आणि एरवी दक्षिण अमेरिकेत असणारा 'कॅनडा वॉर्बलर' सहसा आमच्या राज्यात दिसून येत नाही. यंदा मात्र तो माझ्या घरापासून पासून पाच मैलांवर एका बागेत सापडला.

कॅनडा वॉर्बलर.

बदामीला लेणी बघत असताना जवळच्याच डबक्यात नेम धरून बसलेला हा बगळा (Pond Heron) यशस्वी शिकार करताना सहजच पहायला मिळाला.

बगळा (Indian Pond Heron).

पक्षीनिरीक्षणाची परंपरा अमेरिकेत साधारण दोनशे वर्षांपासून आहे. जॉन जेम्स ऑडोबॉन या मूळच्या फ्रेंच निसर्गसंशोधकाने एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील पक्ष्यांचे शास्त्रीय निरीक्षण केले आणि त्याआधारे 'Birds of America' हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या काळी हे पुस्तक युरोपमध्ये फार लोकप्रिय झाले. खुद्द चार्ल्स डार्विनने त्याच्या 'On the Origin of Species' या सुप्रसिद्ध पुस्तकात ऑडोबॉनच्या निरीक्षणांचा वापर/उल्लेख केलेला आहे. पक्षीनिरीक्षणाची लोकप्रियता जसजशी वाढली, तसतसे पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना दाणापाणी देणेही हळूहळू युरोप-अमेरिकेत वाढू लागले. विशेषत: उत्तर खंडातील कडक थंडीत पक्ष्यांचे किडामुंगीसारखे एरवीचे खाद्य नाहीसे होते. अशा वेळी पक्ष्यांना मदत म्हणून लोक थंडीत पक्ष्यांसाठी दाणे, धान्य वगैरे ठेवू लागले.

अमेरिका खंडात दरवर्षी कोट्यवधी पक्षी वसंत ऋतूत उत्तरेकडे प्रवास करतात. तिथे महिन्या-दोन महिन्यांत पिलांना जन्म देऊन पुन्हा परततात. जगभरात अनेक पक्षी अशा प्रकारे स्थलांतर करत असतात. हजारो वर्षे हे पक्षी त्यांच्या पूर्वजांनी चालवलेला क्रम पुढे चालवत आहेत. काही पक्षी दरवर्षी अगदी आधीच्याच वास्तव्य असलेल्या झाडावरल्या ढोलीत परततानाही आढळलेले आहेत. नुकतीच जन्मलेली पिले काही आठवड्यांच्या वयातच हजारो मैलांचा प्रवास करून परत जातात अन् पुढच्या वर्षी पुन्हा हजारो मैलांचा प्रवास करून जन्मस्थानी परततात! काही निवडक पक्ष्यांवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा (GPS) वापर करून अनेक वैज्ञानिक संस्था त्यांच्या या नियमित स्थलांतरावर संशोधन करत आहेत. खाली GPS चा वापर करून निर्माण केलेले एका अ‍ॅनिमेशन पहा. अ‍ॅनिमेशन अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बनवले आहे. (अधिक माहिती इथे पहा.)


अ‍ॅनिमेशन साभार: All About Birds
 

अशा स्थलांतरांत काही पक्ष्यांचे वजन ४०%नी कमी होते. स्थलांतरादरम्यान पक्षी वाटेत काही ठिकाणी विश्रांती घेत उरलेल्या स्थलांतरासाठी आवश्यक ती ऊर्जा राखण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांची ही टप्प्यांची ठिकाणेही पिढ्यानपिढ्या ठरलेली आहेत. दुर्दैवाने गेल्या शतकभरात मनुष्याने अशा अनेक जागांवर आक्रमण केले आहे आणि त्यामुळे अनेक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. स्थलांतर करताना वाटेत थांबलेल्या पक्ष्यांना पाहण्याची संधी अल्पकाळच असते. मनुष्यवस्तीपासून लांब राहणार्‍या अनेक पक्ष्यांना अभ्यासण्यास ही स्थलांतराच्या मार्गावरील ठिकाणे फार महत्त्वाची आहेत.

'टर्न' पक्षी आपल्या लांबच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. तीन महिन्यांच्या एका 'आर्क्टिक टर्न'ने २२,००० किमीचा प्रवास केल्याची नोंद आढळते.

Common Tern.

सहसा एकट्या-दुकट्याने राहणारे आणि आपला टापू राखणारे ससाणे परतीच्या मार्गावर लागले, की हळूहळू मोठ्या थव्याने जमू लागतात - ज्यांना 'केटल' (kettle) असेही म्हणतात. आपल्या हजारो मैलांच्या परतीच्या प्रवासाला निघालेले हे थवे पहायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच असते.

Swainson's Hawk.

Swainson's Hawk kettle.

पक्षीनिरीक्षण म्हणजे नक्की काय? याची स्पष्ट अशी व्याख्या नाही. अनेक शतके मनुष्य पशुपक्ष्यांचे निरीक्षण करत आला आहे. अमेरिकेतील काही मूलनिवासी लोकांनी, काही पक्षी थंडीत अचानक गायब होतात अन पुढील वर्षी पुन्हा दिसू लागतात हे जाणले होते. 'पर्पल मार्टिन' (Purple Martin) हा पक्षी गिधाडांना दूर ठेवण्यास मदत करतो म्हणून हे मूलनिवासी भोपळ्याची ढोली करून 'पर्पल मार्टिन'ला आपल्या जवळ घरटं करण्यास उद्युक्त करतात, हे जॉन जेम्स ऑडोबॉनने १८२१ साली नोंदविलेले आहे.

 

Audubon ने केलेले रेखाटन. (साभार)

सध्या जगभरात लोक अनेक प्रकारे पक्षीनिरीक्षण करत आहेत. अनेक जण आपल्या अंगणात, कॉलनीत/सोसायटीत दिसणार्‍या पक्ष्यांची नियमाने नोंद करत आहेत. काही लोक जवळपासच्या बागेत, जंगलात, डोंगरांवर, नदी-समुद्रकिनारी जाऊन पक्ष्यांची नोंदणी करत आहेत. तर अनेक लोक पक्ष्यांसाठी असलेल्या प्रसिद्ध ठिकाणी जाऊन एरवी सहज न दिसणारे पक्षी आपल्या खाती नोंदवत आहेत. पक्षीनिरीक्षणाची ही लोकप्रियता लक्षात घेऊन याचा वापर विज्ञानासाठीही केला जातो आहे.

परतीच्या प्रवासात माझ्या बाल्कनीत काही दिवस थांबलेला- Black-Chinned Hummingbird.

कॉर्नेल विद्यापीठातील पक्षीविज्ञान शाखा (Cornell Lab of Ornithology) आणि ऑडोबॉन सोसायटी यांनी प्रथम शास्त्रीय अभ्यासाकरता लोकांच्या अंगणातील पक्ष्यांची मोजदाद लोकांच्याच मदतीने सुरू केली. या प्रकारच्या प्रयोगाला ‘सिटीझन सायन्स’ असे म्हटले जाते. सिटीझन सायन्स ही संज्ञा जरी नवीन असली तर या प्रकारचा उपयोग पक्षीविज्ञानात एकोणिसाव्या शतकापासून होत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, लोकांकडले स्मार्टफोन आणि संगणक यांमुळे ही पक्ष्यांची मोजदाद आणि नोंदणी फारच सुकर झाली. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तयार होणार्‍या माहितीच्या साठ्यातून पक्ष्यांच्या संख्येवर, आरोग्यावर परिणाम करणार्‍या विविध घटकांचा अभ्यास करणे शक्य झाले.

डीडीटी आणि इतर काही जंतुनाशकांमुळे अमेरिकेतील अनेक पक्ष्यांवर फार विपरीत परिणाम झाला. पक्ष्यांच्या अंड्यांची कवचं यामुळे अत्यंत नाजूक बनली व अंडी फुटून पक्ष्यांची पिले मरू लागली. या जंतुनाशकांवर बंदी आणल्यानंतर, ज्या पक्ष्यांवर परिणाम झाला होता, त्या पक्ष्यांच्या संवर्धनार्थ सरकारने काही उपक्रम राबवले. त्यांपैकी 'बाल्ड इगल', 'ऑस्प्रे' इ. पक्ष्यांसाठी हजारो घरटी बांधण्यात आली. या घरट्यांवरल्या देखरेखीसाठी लोकांच्या सिटीझन सायन्सचा वापर केला गेला आणि त्यावरून घरट्यांचा वापर कोठे होतो आहे, कोणत्या भागात पक्षी किती अंडी देत आहेत आणि किती पिलांना यशस्वीरित्या मोठं करत आहेत यांचे दस्तावेज बनवले गेले. या प्रयत्नांमुळे या पक्ष्यांच्या संवर्धनात मदत झालीच, पण त्याच बरोबर त्या त्या भागातील परिसंस्था कशा प्रकारची आहे या बाबींच्या संशोधनासही मदत झाली. काही ठिकाणी पक्ष्यांच्या संख्येवरून इतर काही विषारी पदार्थांमुळे नद्या, तलाव प्रदूषित झाले आहेत का, या बाबतची सूचना कमी अवधीत मिळण्यातही मदत झाली आहे.

या अनुभवांवरून आता जगभरात अनेक पक्ष्यांच्या घरट्यांवर देखरेख केली जाते. NestWatch या वेबसाईटच्या आधारे जगभरातील लोक अनेक पक्ष्यांच्या घरट्यांची माहिती गोळा करत आहेत. त्याशिवाय तुम्हांला तुमच्या आसपास कोणत्या पक्ष्यांची संख्या घटत आहे किंवा वाढत आहे हे पाहता येते. तुम्हांला ज्या पक्ष्यात रस आहे, त्या पक्ष्याची घरटी कशा प्रकारची असतात, कोणत्या आकाराची असतात वगैरे माहितीही मिळवता येते. काही पक्ष्यांकरता लाकडापासून कृत्रिम घर (Nest box) बनवण्याचे आराखडेही या वेबसाईटवर मिळतात. असे नेस्ट बॉक्स तुम्ही तुमच्या परिसरात उभारून पक्ष्यांना मदत करू शकता. वेबकॅम आणि इंटरनेटमुळे अशा घरट्यांवर देखरेख करणे आता अजूनच सोपे झाले आहे. जगातील वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अशा होणार्‍या चित्रणांचे थेट प्रक्षेपण तुम्ही घरबसल्याही बघू शकता.

ऑस्प्रे (Osprey).

सिटीझन सायन्सचा उपयोग जसा विज्ञानाकरता होतो आहे, तसाच तो छंद जोपासणार्‍यांनाही होतो आहे. कोणत्या ठिकाणी कोणते पक्षी दिसण्याची शक्यता आहे, ही माहिती या सिटीझन सायन्स डेटामुळे कोणालाही उपलब्ध असल्याने लोक निव्वळ पक्षीनिरीक्षणासाठीही प्रवास करू लागले आहेत. eBird ह्या कॉर्नेल विद्यापीठाने चालविलेल्या वेबसाइटवर जगभरातील लोकांनी नोंदवलेल्या पक्ष्यांची इत्थंभूत माहिती तत्काळ मिळते. चालू २०२० सालापर्यंत सहा लाखांपेक्षाही जास्त लोकांनी जवळजवळ दहा हजार पक्ष्यांच्या प्रजातींची नोंदणी केलेली आहे. आजपर्यंत जगात एकूण १०,५१२ प्रजातींची नोंद झालेली आहे.

विज्ञानासाठी सिटीझन सायन्सद्वारे मिळवलेल्या माहितीचा उपयोग व्हायचा असेल, तर मुळात पुरेशा, योग्य नमुन्याबद्दलची शास्त्रीय माहिती हवी. पुरेशी माहिती मिळवण्याकरता eBird आणि इतर संस्था वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवतात. यांची काही उदाहरणे म्हणजे 'ग्लोबल बॅकयार्ड बर्ड काऊंट' - वर्षातील काही ठरावीक दिवसांत आपापल्या अंगणातील पक्षी नोंदवणे; 'हॉकवॉच' - ससाणे, गरूड, घारी इ. शिकारी पक्ष्यांची त्यांच्या स्थलांतरादरम्यान मोजदाद करणे. ही मोजदाद सहसा स्थलांतराच्या मार्गावरील डोंगरांवर, समुद्रकिनार्‍यांवर जाऊन केली जाते; 'ग्लोबल बिग डे' - जगभरातून चोवीस तासांत जास्तीत जास्त पक्ष्यांची मोजदाद करणे.

या वर्षीचा 'ग्लोबल बिग डे' १७ ऑक्टोबरला होता. चोवीस तासांत जगभरातून ३२,०००पेक्षा जास्त लोकांनी सात ७,०००हून अधिक पक्ष्यांच्या जातींची नोंदणी केली. त्यात जगभरातील सुमारे ७०% पक्ष्यांच्या जाती एका दिवसात नोंदवल्या गेल्या! या नोंदणीस उत्तेजन म्हणून सर्वांत जास्त जाती नोंदवणारे; सर्वांत जास्त जाती नोंदवली गेलेली गावे, राज्ये, देश अशा प्रकारच्या याद्याही जाहीर केल्या जातात. सहभागी झालेल्यांना लॉटरीपद्धतीने आयोजकांकडून बक्षीसही दिले जाते.

या वर्षीच्या 'ग्लोबल बिग डे'मध्ये मीही भाग घेतला होता. आमच्या संपूर्ण राज्यात एकूण २९२ पक्ष्यांच्या जाती नोंदवण्यात आल्या. पहाटे साडेपाचपासून ते सूर्यास्तापर्यंत मी त्यांपैकी ११० पक्ष्यांच्या जाती नोंदवू शकलो. एकूण पक्ष्यांच्या जाती नोंदवण्यात मी आमच्या राज्यात तिसर्‍या क्रमांकावर होतो.


 

शास्त्रीय अभ्यासासाठी जर उपयोग करायचा असेल, तर माहितीही शास्त्रीय असायला हवी. नोंद करणार्‍यांनी चुकीच्या पक्ष्यांची नोंद केली, तर त्याचा फारसा उपयोग नाही. अमेरिकेत १,००० पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्याशिवाय अनेक पक्ष्यांच्या उपजातीही आढळतात. जंगलात, झुडपांत, पानाफुलांच्या सावलीत नेमकी पक्ष्याची जात ओळखणे वाटते तितके सोपे नाही. मोठे पक्षी एका ठिकाणी स्थिर बसतात, मात्र अनेक लहान पक्षी सतत हालचाल करत असल्याने त्यांचे नीट निरीक्षण करणे हीसुद्धा एक कलाच आहे. त्याशिवाय पक्ष्यांचे रंगरूप वर्षभरात बदलत असते. काही नर पक्षी प्रजननाच्या काळात अगदी आकर्षक रंगांनी सजलेले असतात, त्यामुळे ओळखणे सोपे जाते. एरवी मात्र त्यांचे रंग आणि माद्यांचे रंग अनेकदा सारखे दिसतात. शिवाय एकाच कुळातील पक्ष्यांमध्ये असलेल्या साम्यामुळे दोन जातीतील पक्ष्यांत फरक करणे फार अवघड जाते. अनेक पक्ष्यांचे रंग वयाच्या पहिल्या वर्षी वेगळे असतात. काही पक्ष्यांमध्ये रंगरूप पहिल्या तीन-चार वर्षांत बदलत जाते.

ब्लू ग्रोसबीक (Blue Grosbeak)- प्रजननातील रंगरूप (breeding plumage)
 

पक्षी बरोबर ओळखण्यासाठी त्याचे रंगरूप, चोचीचा आकार, पंखांची-पायांची लांबी, शेपटीचा आकार, शेपटी हलवण्याची एखादी लकब, पक्ष्याचे वागणे - जमिनीवरील दाणे वेचतो आहे की फांदीवर लटकून दाणे खातो आहे, झाडांवर खाणे शोधतोय की गवतात, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे, पक्षी उडताना कोणते आवाज काढतो आहे अशा अनेक गोष्टींचा उपयोग होतो. स्थलांतराच्या वेळी काही पक्षी त्यांचा नेहमीच्या सवयींनुसारच वागतील याचाही नेम नसतो. एरवी उंच डोंगरांवर सापडणारे डोंगरपायथ्याशीही सापडतात.

'eBird'सारख्या प्रणालीसेवांचा वापर केल्यास पक्ष्यांच्या जाती ओळखणे सोपे जाते. पक्ष्याचा साधारण आकार, रंग, त्याचे वागणे वगैरेंचा वापर करून तुम्ही पहात असलेला पक्षी कोणता असू शकेल, हे अशा अ‍ॅपवर तपासता येते. पक्ष्यांच्या फोटोंबरोबर पक्ष्यांचे आवाज आणि इतर उपयुक्त माहितीही अ‍ॅपवर मिळते. त्याशिवाय, तुमच्या फोनवरील जीपीएसच्या साहाय्याने तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी कोणते पक्षी दिसण्याची शक्यता आहे, हेही सहज पाहता येते. तुमच्या आसपासचे पक्षी ओळखण्यासाठी अनेक पुस्तकेही बाजारात उपलब्ध असतात, यांना सहसा 'फील्ड गाइड्स' असे म्हणतात. मात्र आता या पुस्तकांची जागा हळूहळू डिजिटल पुस्तके घेत आहेत.

या माहितीच्या आधारे तुम्ही पाहिलेल्या पक्ष्याची नोंद eBird मध्ये यादीत करू शकतात. यादीत करताना जीपीएसने तुमचे स्थान आपोआप घेतलेले असते अथवा तुम्हांलाही ते निवडता येते. जर तुम्ही पाहिलेला पक्षी विरळा असेल, तर नोंद घेतानाच हा पक्षी इथे सहसा सापडत नाही अशी सूचना तुम्हांला अ‍ॅपमध्ये मिळते. या याद्या, विशेषत: दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी त्या त्या भागातले परीक्षक सतत तपासत असतात. दुर्मीळ पक्ष्याच्या सविस्तर वर्णनाची नोंद केल्यास तुम्ही पक्षी बरोबर ओळखला आहे की नाही हे परीक्षकांना ठरवता येते. त्याशिवाय तुम्हांला पक्ष्यांची छायाचित्रे आणि आवाजाचे मुद्रणही पुरावा म्हणून जोडता येते. खात्रीलायक पुरावा नसल्यास परीक्षक अधिक माहिती मिळेस्तोवर ती नोंद ग्राह्य धरत नाहीत. बहुसंख्य परीक्षक सहसा पक्षीवैज्ञानिक, जीवशास्त्रज्ञ वगैरे असतात. पक्षीनिरीक्षणाचा दांडगा अनुभव असलेलेही काही लोक परीक्षक म्हणून नेमले जातात.

अमेरिकेतील या छंदाची लोकप्रियता पाहता सोशल मीडियावर हजारो लोकांचे ग्रुप्स आहेत हे ऐकल्यावर नवल वाटायला नको. अशा ग्रुप्सचा मुख्यत: उपयोग हा दुर्मीळ पक्षी कोठे सापडत आहेत याची बित्तंबातमी मिळवण्यासाठी होतो. काही गटांतील पक्ष्यांच्या जाती हुबेहूब एकसारख्या असतात. अशा पक्ष्यांची जात ओळखणे हे बर्‍यापैकी किचकट काम असते. ते सोपे करण्यासाठीही सोशल मीडियावरील ग्रुप्स उपयोगी पडतात. अनेक चिमण्यांच्या थव्यातून एखाद्या दुर्मीळ चिमणीची जात अचूक शोधणारे, किंवा हजारो बदकं आणि बगळ्यांच्या घोळक्यात एखादाच चुकून युरोप वा आशियातून आलेला पक्षी हुडकणारे आपोआप अशा ग्रुप्सवर सेलिब्रिटी बनतात.

अमेरिकेत तीस-पस्तीस जातींच्या चिमण्या आहेत; तितक्यांच जातींची बदकं आहेत. पन्नासपेक्षा जास्त प्रकारचे 'फ्लायकॅचर्स' (हवेत झेप घेऊन कीटक पकडणार्‍या पक्ष्यांचा एक गट) आणि सात-आठ प्रकारचे 'फिन्च' आहेत. यांतल्या अनेक जाती-उपजाती ओळखणे सोपे नाही. ('गलापागोस' बेटांवरील वेगवेगळ्या फिन्च पक्ष्यांमधील फरकाचा अभ्यास डार्विनला उत्क्रांतिवादाच्या शोधासाठी उपयोगी पडला, हे इथे सांगायला हरकत नाही). म्हणूनच अशा गोंधळात टाकणार्‍या एखाद्या पक्ष्याची जात बरोब्बर ओळखण्याची मजा काही औरच. आणि त्यात जर तो पक्षी क्वचितच आढळणारा असेल, तर क्या केहने! या छंदात रमलेले अनेक लोक क्वचित सापडणारे पक्षी शोधत गावांच्या, राज्यांच्या आणि अगदी देश-परदेशांतल्या कानाकोपर्‍यांत भटकत असतात.

अर्थात छंद म्हटला, की त्यात दोन्ही टोकांची उदाहरणं आलीच. फावल्या वेळात छंद जोपासणारे आणि या छंदाला वाहून घेतलेले अशा दोन्ही प्रकारचे लोक पक्षीनिरीक्षण करताना भेटतात. विशेषत: अमेरिकेत या छंदी लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ, 'बिग इयर'. थोडक्यात, वर्षभरात उत्तर अमेरिकेच्या हद्दीत जास्तीत जास्त पक्ष्यांच्या जातींची नोंदणी आपल्या खाती करायची स्पर्धा. हजारो मैल प्रवास करून उत्तर अमेरिकेच्या कानाकोपर्‍यांत जाऊन पक्ष्यांची नोंदणी करणं पन्नासच्या दशकापासून चालू आहे. (यावर 'द बिग इयर' नावाचा, सत्यघटनेवर आधारित विनोदी चित्रपटही येऊन गेला आहे.)

अमेरिकेत अभावानेच आढळणारा 'ईअर्ड केट्झल' पक्षी माझ्या राज्यात नुकताच, जवळजवळ वीस वर्षांनंतर, नोंदला गेला. याची नोंदणी होताच देशभरातील लोकांपर्यंत ती बातमी पोहोचली. हा पक्षी पाहण्याची दुर्मीळ संधी साधावी म्हणून देशभरातून हजारो मैलांचा प्रवास करून आलेले लोक मला भेटले!

ईअर्ड केट्झल (Eared Quetzal)

या छंदामुळे संवर्धनासही मोठी मदत होते आहे असे संशोधनाअंती दिसून आलेले आहे. अमेरिकेतील 'US Fish & Wildlife Service' खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४ कोटी ५० लाख लोक पक्षीनिरीक्षण करतात आणि त्यांच्यामुळे ८० अब्ज डॉलरची मदत अमेरिकी अर्थव्यवस्थेला होते. त्याशिवाय लाखो लोकांचा रोजगार पक्षीनिरीक्षणासंबंधीच्या प्रवासव्यवसायावर अवलंबून आहे. पक्षीनिरीक्षणात रस असलेले लोक संवर्धनासाठी देणग्या वगैरेही देण्यात अग्रेसर आहेत. पक्ष्यांना आपल्या अंगणात येण्यास प्रवृत्त करण्यासाठी बरेच लोक स्थानिक फुलझाडे, झुडपे वाढवतात आणि वृक्षारोपण करतात. शोभेच्या झाडांनी आणि कातरलेल्या गवताने सजलेल्या अंगणांपेक्षा अशा विविध झाडाझुडपांमुळे अनेक स्थानिक प्राणिमात्रांच्या संवर्धनास मदत होते.

कीटक हे अनेक पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. 'स्वालो' (swallows), 'मार्टिन' हे पक्षी मुख्यत: माशा, डास असे उडणारे कीटक खातात. जर पक्ष्यांची संख्या संतुलित असेल, तर वेगवेगळ्या कीटक-जंतूंनाही आपोआप अटकाव केला जातो.

मनुष्याने निसर्गाची पुष्कळ हानी केली आहे हे खरे आहे पण मनुष्याच्या काही प्रयत्नांनी निसर्गाला हातभारही लावलेला आहे. पक्ष्यांना दाणापाणी दिल्या जाणार्‍या ठिकाणी त्यांची संख्या आणि एकूण पिलांच्या जगण्याची शक्यता इतर ठिकाणांपेक्षा बरीच जास्त असल्याचे संशोधनांतून दिसून आलेले आहे. वर म्हणल्याप्रमाणे 'बाल्ड इगल', 'ऑस्प्रे' इत्यादी पक्ष्यांना नामशेष होण्याचा मार्गावरून परत आणले गेले आहे. 'हमिंगबर्ड' हे सहसा दक्षिण अमेरिकेतील पर्जन्यवनात राहतात. वर्षातील काही महिने अमेरिकेत येणार्‍या या पक्ष्यांना अनेक जण साखरेच्या पाण्याचे (नेक्टर) आमिष दाखवून आपल्या अंगणात आणतात. अमेरिकेत इतक्या लोकांनी अशी 'हमिंगबर्ड-फीडर्स' बसवलेली आहेत, की काही पक्ष्यांनी त्यांचे कायमचे वास्तव्य आता अमेरिकेतच पक्के केले आहे.

जागतिक महामारीच्या या दिवसांत घरात अडकून पडलेलो असताना एखाद्या जंगलात वा अभयारण्यात जाण्याची ओढ सतावत होती. पण निसर्ग आपल्या आजूबाजूलाच आहे आणि पक्षी तर सगळीकडेच आहेत. हा छंद सुरू केल्यापासून माझी निरीक्षणशक्तीही आपोआप तीक्ष्ण झाली आहे. घराच्या आजूबाजूला सतत येणारा सुतारपक्ष्याचा आवाज मी या आधी कसा ऐकला नव्हता!? ज्या डोंगरावर मी कायम जात होतो तिथे देशभरातून लोक 'एलिगंट ट्रोगन' पहायला येतात, तो मला पूर्वी कसा दिसला नव्हता या गोष्टींचे आता नवल वाटते.

Elegant Trogon.

वाघ, सिंह प्राण्यांप्रमाणेच दुर्मीळ पक्षी बघण्यातील आनंदही सहज मिळवता येण्यासारखा आहे. विशेषत: माझ्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर, ताशी चारशे किलोमीटर वेगाने झेप घेणारा जगातील सर्वात वेगवान असा बहिरी ससाणा शिकार करताना बघायला मिळत असेल तर! जिथे मी अनेक वर्षं राहतो आहे, त्या भागातील अनेक निसर्गरम्य ठिकाणी मी नवनवीन पक्ष्यांच्या शोधार्थ प्रथमच गेलो.

बहिरी ससाणा (Peregrine Falcon)

शहरी रहाटगाडग्यात मनुष्याने निसर्गाला हळूहळू दूर लोटले असले, तरी संधी दिल्यास तोच निसर्ग सहज तुमच्या अंगणात परत येईल, हे टाळेबंदीतल्या सक्तीच्या घरी राहण्याने दाखवून दिले आहे. माझ्या बाल्कनीत चिमण्या आणि फिन्च आता रोज दाणे खायला येत आहेत. संत्र्याची फोड खायला स्थानिक सुतारपक्षी सकाळी येऊन जातो. बाल्कनीत टांगलेल्या साखरेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी इनमीनतीन-सव्वातीन इंचांच्या दहा-बारा हमिंगबर्ड्सची एकमेकांवरची दादागिरी तर आता रोजचीच झाली आहे. समोरच्या झाडावरील रिकाम्या घरट्यात काही महिन्यांत घुबडांची पिलं असतील. समोरच्या खोलीत काम करत असताना माझ्या बाल्कनीचा दरवाजा आता सतत उघडाच असतो आणि लॅपटॉपच्या शेजारी आता कायम दुर्बीण असते. कोणतातरी दुर्मीळ पक्षी माझ्या बाल्कनीत कधीतरी येईल याची मी वाट पाहतो आहे!

 

प्रथम प्रकाशित: ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०२०


No comments: