Sunday, April 18, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास-३


तंबोराह-द ईयर विदाउट समर-१८१५
१२ चौ. कीमी क्षेत्रफळाचा कॅल्डेरा बनवणारा हा उद्रेक 'रेकॉर्डेड' इतिहासातील सर्वात मोठा. मागच्या भागात पाहिलेल्या क्राकातुआपेक्षा सुमारे पाच पट विध्वंसक. तंबोराह हा सुद्धा इंडोनेशीआतील एक पर्वतावर असलेला ज्वालामुखी. सुमारे १२५ क्युबीक किलोमीटर राख या उद्रेकातुन बाहेर पडली. ही राख सुमारे १५०० कीमी पर्यंत पसरली. ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम ४४ कीमी उंच होता. ह्या उद्रेकाच्या आधी सुमारे सहा वर्षे तंबोराह सक्रीय होता.

उद्रेकामुळे झालेल्या पर्वताच्या उंचीतील फरक पाहिल्यास या उद्रेकाची तीव्रता कीती असेल याची कल्पना येइल. उद्रेकामुळे पर्वताची उंची सुमारे ५००० फुटांनी कमी झाली. या घटनेत जवळजवळ १लाख लोक मृत्युमुखी पडले. यातील  १० हजार लोक विस्फोट, पायरोक्लास्टीक फ्लो इ. मुळे मेले, इतरांचा शेवट रोगराई आणि उपासमारीमुळे झाला.

या वर्षात जगभरात थंडीची लाट आली होती,म्हणुनच या वर्षाला 'द ईयर विदाउट समर' असे म्हणले जाते. यु. एस. जीऑलॉजीकल सर्वेनुसार जगभरातील तापमान ३ अंश सेल्सीअस पर्यंत खाली गेले. वाढलेल्या थंडीमुळे पीकांचे प्रचंड नुकसान होउन जीवीतहानी अधिकच वाढली.

कमी झालेल्या तापमानाचे मुख्य कारण उद्रेकातुन बाहेर पडलेला २० कोटी टन सल्फर डायॉक्साईड वायु. पण त्याशिवाय कमी झालेल्या सौरउर्जेच्या उत्सर्जनामुळे या तापमान बदलास हातभार लागल्याची शक्यता वर्तवली जाते. या काळात कमी झालेल्या उत्सर्जनाला डाल्टन मिनीमम म्हणले जाते.



पीनाटुबो-१९९१
१५ जुन १९९१ साली फीलीपाईन्स मधील याच नावाच्या पर्वतावर झालेला हा शक्तीशाली विस्फोट.  भुगर्भ हालचालीचे निरीक्षण सर्वप्रथम सर्वात यशस्वीरीत्या या वेळी केले गेले. अगदीच कमी झालेली मनुष्यहानी प्रगत तंत्रज्ञानाचे यशच आहे असे म्हणावे लागेल. ५० हजारांपेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर यशस्वीरीत्या केले गेले.यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक रोगराइचे बळी ठरले. दुर्देवाने याच वेळी आलेल्या वादळाने परिस्थीती आणखीन बिघडली.

ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम सुमारे ७ कीमी उंच होता. या उद्रेकाआधी आणि नंतर भुकंपाचे अनेक हादरे नोंदवले गेले आहेत. उद्रेकाने पर्वाताच्या शिखरावर २ कीमी व्यासाचा कॅल्डेरा तयार झाला. ह्या उद्रेकाने जगभरातील तापमान सुमारे अर्धा अंश खाली गेल्याचे मानले जाते.

यांशिवाय काही महत्त्वाचे उद्रेक म्हणजे, वायोमींग राज्यातील यलो स्टोन येथे ठरावीक कालांतराने झालेले प्रचंड उद्रेक. (पहिला २१ लाख वर्षांपुर्वी, दुसरा त्यानंतर ७ लाख वर्षांनी, आणि तिसरा १४ लाख वर्षांनी, ह्या नियमाने या पुढचा उद्रेक आता होण्याची शक्यता आहे, कदाचित २०१२ ला व्हावा. ;) ) हे तीनही उद्रेक तंबोराहच्या उद्रेकाइतकेच शक्तीशाली होते.

३५०० वर्षांपुर्वीचा सँतोरीनी उद्रेक. 'लॉस्ट सीटी ओफ अ‍ॅटलांटीस', 'बायबल मधील दहा प्लेग' अश्या काही दंतकथांचा संबंध या उद्रेकाशी जोडला जातो.

आईसलँडचा उद्रेक कीती विनाशक?
हे पाहण्याकरीता आपण ह्या सगळ्या उद्रेकांची ढोबळमानाने तुलना करुयात.

शास्त्रज्ञ उद्रेकाची तीव्रता Volcanic Explosivity Index(VEI) ने मोजतात. ह्याची कल्पना येण्याकरता खालील चित्र पहा.

उद्रेक ---            VEI
टोबा   ---            ८
तंबोराह ---           ७
क्राकातुआ---         ६
पिनाटुबो ---          ६


राखेच्या उत्सर्जनानुसार तुलना

Thorvaldur Thordarson या शास्त्रज्ञाच्या मते आईसलँडच्या ह्या उद्रेकाचा VEI २ ते ३ असावा. आईसलँड्वर होणारी ही हालचाल प्रथमच होत नाहीए. मागील दहा वर्षांची हालचाल पाहता हालचाल आजुन वाढण्याची शक्यता थोर्वाल्दुर व्यक्त करतो.  शास्त्रज्ञांना काळजी आहे ती या पेक्षा मोठ्या अश्या 'काटला' ज्वालामुखी जागृत होण्याची. गेल्या हजार वर्षात आजपर्यंत तीन वेळा Eyjafjallajokull जागा झाला आहे आणि त्यानंतर काटला ही.

थोडक्यात्, हवाईकंपन्यांना होत असलेल्या प्रचंड नुकसानाशिवाय आज तरी फार मोठे नुकसान अपे़क्षित नाही.

समाप्त.

संदर्भ साभार,
१. HOW VOLCANOES WORK सॅन डीएगो स्टेट युनिव्हर्सिटी.

No comments: