Tuesday, May 4, 2010

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे! या अवकाश संशोधनात सिंहाचा वाटा असलेल्या 'हबल दुर्बिणीला' नुकतीच वीस वर्षं पुर्ण झाली, त्यानिमित्ताने हबलची ही छोटीशी ओळख.

'हबल'च्या जन्माची कहाणी ७० वर्षांची आहे. १९२३ मध्ये सर्वप्रथम 'अवकाशातील दुर्बिण' ही कल्पना 'हर्मन ओबर्थ', 'रॉकेट्रीच्या' जनकांपैकी एक, यांनी कागदावर मांडली. अवकाशातील दुर्बिणीचे जनक 'स्पीत्झर' यांनी १९६९ मध्ये शास्त्रंज्ञांना गोळाकरुन या प्रकल्पाची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. अखेर १९७७ मध्ये अमेरीकन काँग्रेसची संमती मिळाली. पृथ्वी विश्वाचे केंद्र आहे पासुन सुरु झालेली ही शोधमालिका, आपली आकाशगंगा हीच मुळात एकटी नाही हे इतर आकाशागंगां शोधुन सिद्ध करणारे 'एडविन हबल' यांचे नाव या दुर्बिणीला देण्यात आले.

२४ एप्रिल १९९० साली 'डिस्कव्हरी हे अंतराळयान हबलला घेउन अवकाशात झेपावले. दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २५ एप्रिल रोजी हबलला त्याच्या ईप्सित कक्षेत कार्यरत करण्यात आले. हबलची कक्षा पृथ्वीतळापासुन ५७५ किलोमीटर वर, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी शेवटी, आहे.

हबल एक पृथ्वी प्रदक्षिणा ९६ मिनिटात करतो, म्हणजेच त्याचा वेग ८ किलोमीटर प्रतीसेकंद किंवा २९,००० किलोमीटर प्रतितास इतका आहे! एखाद्या अंधार्‍या स्वच्छ रात्री तुम्ही हबलला तुमच्या डोळ्यांनी बघुही शकता. त्याकरता हा दुवा पहा. येथे Configuration मध्ये तुमचा देश, आणि शहर निवडा. मग खाली Satellites मध्ये  HST वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक तक्ता दिसेल, त्यावरुन तुम्हाला कधी व कुठे बघायचे हे दिसेल. एक छोटासा प्रकाशीत पण वेगाने हलणारा ठिपका अपेक्षित ठिकाणी-अपेक्षित वेळी दिसला तर तो हबलच असेल. (इतके कष्ट घ्यायचे नसतील तर नुसतेच हबलच्या स्थानाचे बदलते चित्र पहाण्याकरता येथे क्लिक करा)

हबलचे तंत्रज्ञान हे साधारण ८० च्या दशकातले, त्यावेळी कंप्युटर इतका प्रगत नव्हता, त्यानंतर झालेली विलक्षण प्रगती आपण जाणताच. आता ऐकायला गंमत वाटेल, पण हबलवरील एका मुख्य संगणकावर 'अतिप्राचिन' असा ४८६ प्रोसेसर होता! संगणाकाच्या जगात झपाट्याने मागे पडत चाललेले तंत्रज्ञान दुरुस्त करणे म्हणजे काय हे आपल्याला माहित असेलच. तश्याच अडचणी हबल शास्त्रंज्ञांनाही आल्या. ते असो, वाढदिवसाबद्दलच्या लेखात अडचणी नकोत नाही का. हबल दुर्बिणीतील तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती हवे असल्यास येथे पहा.

हबलने आजपर्यंत केलेले योगदान प्रचंड आहे, इतके की त्याने खगोलशास्त्राची पुस्तकेच बदलली आहेत. तसेच हबलने पाठवलेल्या चित्रांनी सामान्यांनाही मोहित केलं आहे. म्हणुनच कदाचित हबल आज एक सेलेब्रीटी आहे. हबलने लावलेल्या अनेक शोधांपैकी काही महत्त्वाचे शोध येथे पाहुयात. विश्वाचे वय, १३७५ कोटी वर्षापर्यंत बरोबर मोजणे हबल मुळे शक्य झाले. याआधी विश्वाचे वय १००० ते २००० कोटी यामध्ये असावे असा अंदाज होता. आता हा शोध कीती महत्त्वाचा? हे पाहण्याकरता ह्या आकड्यांची तुलना करुयात. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा इतिहास ४०० कोटी वर्षांचा आहे, मानवाचा इतिहास जाउद्या!

पण सर्वात महत्त्वाचा हबलने लावलेला शोध म्हणजे 'डार्क एनर्जीचा'. डार्क एनर्जी म्हणजेच ते अद्भुत बल ज्यामुळे हे विश्व सतत प्रसरण पावत आहे. (expanding universe). डार्क एनर्जीबद्दल अधिक जाणुन घेण्याकरता हे जरुर पहा. हे अत्यंत सुंदर असे स्थळ हबलचेच आहे.

याशिवाय हबलमुळे शास्त्रंज्ञांना तार्‍यांची निर्मिती कशी होते ते पाहता आले. अनेक आकाशगंगांना उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्थेंमध्ये पाहता, अभ्यासता आले. जेणे करुन विश्वाच्या निर्मितीचे कोडे काही अंशी तरी सुटेल अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

हबल डीप फील्ड, हबलने शोधलेल्या काही आकाशगंगा इतक्या लांब आहेत की त्यापासुन निघालेला प्रकाश इथे इथे पोहोचण्याकरीता हजारों कोटी वर्षे लागतात, म्हणजेच आपला सुर्य निर्माण होणाच्या आधी तिथुन निघालेला प्रकाश आज आपल्यापर्यंत पोहचत आहे.

हबलने अनेक ग्रहांचा जन्म टिपलांय, तरुण तार्‍यांच्या निर्मितीतील गॅस आणि इतर मॅटरने बनलेल्या  प्रोटोप्लॅनेटरी डिस्क्स दाखवल्या आहेत. ह्या विश्वातील (येथे विश्व म्हणजे फक्त पृथ्वी नाही, फक्त आपली आकाशगंगा नाही) सर्वात तेजस्वी घटना 'गॅमा-रे-बर्स्ट्' सुद्धा दाखवली आहे. ह्या अनंत अश्या विश्वात काही सेकंद ते काहि मिनिटं इतक्याच कालावधी साठी घडणारी ही घटना आपण पाहु शकतो यातच सगळे आले. त्याशिवाय अनेक मनोहर नेब्युले, आकाशगंगा वगैरे वगैरे हबलने दाखवले आहेतच. खाली काही निवडक चित्रे डकवत आहे, अधिक चित्रे येथे पहावित.








ही चित्रे पाहिल्यानंतर मी वरती 'स्वर्गीय' का म्हणालो ते पटले असेलच. चित्रांवर क्लिक केल्यास चित्रांचे स्रोत सापडतील. तर अश्या ह्या हबलच्या वापरासाठी कुणीही संमती मागु शकतो, आजवर हबलच्या मदतीने हजारो संशोधने प्रसिद्ध झाली आहेत. २००१ साली घेतलेल्या इंटरनेट पोलनुसार लोकांनी 'हॉर्सहेड नेब्युला' चे निरीक्षण नासाने करावे असे मत दिले होते.

तर असा हा हबल गेली वीस वर्षे आपल्या ज्ञानात भर घालतोच आहे, अधुनमधुन त्याची डागडुजीही केली गेली आहे. हबल अजुन १०-१५ वर्षे तरी काम करेल, मग त्याला रीटायर केले जाइल, पण अर्थातच त्याच्यापेक्षा प्रगत अश्या दुर्बिणीनेच.

Sunday, April 18, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास-३


तंबोराह-द ईयर विदाउट समर-१८१५
१२ चौ. कीमी क्षेत्रफळाचा कॅल्डेरा बनवणारा हा उद्रेक 'रेकॉर्डेड' इतिहासातील सर्वात मोठा. मागच्या भागात पाहिलेल्या क्राकातुआपेक्षा सुमारे पाच पट विध्वंसक. तंबोराह हा सुद्धा इंडोनेशीआतील एक पर्वतावर असलेला ज्वालामुखी. सुमारे १२५ क्युबीक किलोमीटर राख या उद्रेकातुन बाहेर पडली. ही राख सुमारे १५०० कीमी पर्यंत पसरली. ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम ४४ कीमी उंच होता. ह्या उद्रेकाच्या आधी सुमारे सहा वर्षे तंबोराह सक्रीय होता.

उद्रेकामुळे झालेल्या पर्वताच्या उंचीतील फरक पाहिल्यास या उद्रेकाची तीव्रता कीती असेल याची कल्पना येइल. उद्रेकामुळे पर्वताची उंची सुमारे ५००० फुटांनी कमी झाली. या घटनेत जवळजवळ १लाख लोक मृत्युमुखी पडले. यातील  १० हजार लोक विस्फोट, पायरोक्लास्टीक फ्लो इ. मुळे मेले, इतरांचा शेवट रोगराई आणि उपासमारीमुळे झाला.

या वर्षात जगभरात थंडीची लाट आली होती,म्हणुनच या वर्षाला 'द ईयर विदाउट समर' असे म्हणले जाते. यु. एस. जीऑलॉजीकल सर्वेनुसार जगभरातील तापमान ३ अंश सेल्सीअस पर्यंत खाली गेले. वाढलेल्या थंडीमुळे पीकांचे प्रचंड नुकसान होउन जीवीतहानी अधिकच वाढली.

कमी झालेल्या तापमानाचे मुख्य कारण उद्रेकातुन बाहेर पडलेला २० कोटी टन सल्फर डायॉक्साईड वायु. पण त्याशिवाय कमी झालेल्या सौरउर्जेच्या उत्सर्जनामुळे या तापमान बदलास हातभार लागल्याची शक्यता वर्तवली जाते. या काळात कमी झालेल्या उत्सर्जनाला डाल्टन मिनीमम म्हणले जाते.



पीनाटुबो-१९९१
१५ जुन १९९१ साली फीलीपाईन्स मधील याच नावाच्या पर्वतावर झालेला हा शक्तीशाली विस्फोट.  भुगर्भ हालचालीचे निरीक्षण सर्वप्रथम सर्वात यशस्वीरीत्या या वेळी केले गेले. अगदीच कमी झालेली मनुष्यहानी प्रगत तंत्रज्ञानाचे यशच आहे असे म्हणावे लागेल. ५० हजारांपेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर यशस्वीरीत्या केले गेले.यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक रोगराइचे बळी ठरले. दुर्देवाने याच वेळी आलेल्या वादळाने परिस्थीती आणखीन बिघडली.

ह्या उद्रेकाचा इरप्शन कॉलम सुमारे ७ कीमी उंच होता. या उद्रेकाआधी आणि नंतर भुकंपाचे अनेक हादरे नोंदवले गेले आहेत. उद्रेकाने पर्वाताच्या शिखरावर २ कीमी व्यासाचा कॅल्डेरा तयार झाला. ह्या उद्रेकाने जगभरातील तापमान सुमारे अर्धा अंश खाली गेल्याचे मानले जाते.

यांशिवाय काही महत्त्वाचे उद्रेक म्हणजे, वायोमींग राज्यातील यलो स्टोन येथे ठरावीक कालांतराने झालेले प्रचंड उद्रेक. (पहिला २१ लाख वर्षांपुर्वी, दुसरा त्यानंतर ७ लाख वर्षांनी, आणि तिसरा १४ लाख वर्षांनी, ह्या नियमाने या पुढचा उद्रेक आता होण्याची शक्यता आहे, कदाचित २०१२ ला व्हावा. ;) ) हे तीनही उद्रेक तंबोराहच्या उद्रेकाइतकेच शक्तीशाली होते.

३५०० वर्षांपुर्वीचा सँतोरीनी उद्रेक. 'लॉस्ट सीटी ओफ अ‍ॅटलांटीस', 'बायबल मधील दहा प्लेग' अश्या काही दंतकथांचा संबंध या उद्रेकाशी जोडला जातो.

आईसलँडचा उद्रेक कीती विनाशक?
हे पाहण्याकरीता आपण ह्या सगळ्या उद्रेकांची ढोबळमानाने तुलना करुयात.

शास्त्रज्ञ उद्रेकाची तीव्रता Volcanic Explosivity Index(VEI) ने मोजतात. ह्याची कल्पना येण्याकरता खालील चित्र पहा.

उद्रेक ---            VEI
टोबा   ---            ८
तंबोराह ---           ७
क्राकातुआ---         ६
पिनाटुबो ---          ६


राखेच्या उत्सर्जनानुसार तुलना

Thorvaldur Thordarson या शास्त्रज्ञाच्या मते आईसलँडच्या ह्या उद्रेकाचा VEI २ ते ३ असावा. आईसलँड्वर होणारी ही हालचाल प्रथमच होत नाहीए. मागील दहा वर्षांची हालचाल पाहता हालचाल आजुन वाढण्याची शक्यता थोर्वाल्दुर व्यक्त करतो.  शास्त्रज्ञांना काळजी आहे ती या पेक्षा मोठ्या अश्या 'काटला' ज्वालामुखी जागृत होण्याची. गेल्या हजार वर्षात आजपर्यंत तीन वेळा Eyjafjallajokull जागा झाला आहे आणि त्यानंतर काटला ही.

थोडक्यात्, हवाईकंपन्यांना होत असलेल्या प्रचंड नुकसानाशिवाय आज तरी फार मोठे नुकसान अपे़क्षित नाही.

समाप्त.

संदर्भ साभार,
१. HOW VOLCANOES WORK सॅन डीएगो स्टेट युनिव्हर्सिटी.

Saturday, April 17, 2010

ज्वालामुखी आणि इतिहास-२

बहुतेक जगातील सर्वात प्रसिद्ध ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे पॉम्पेईचा. इसवीसन ७८-७९ मध्ये झालेल्या उद्रेका मुळे पॉम्पेई शहराचा संपुर्ण विनाश झाला.जगातील हा पहिला असा उद्रेक ज्याची तपशीलवार माहिती इतिहासात आढळते. प्लीनी द यंगर नामक मनुष्याने साधारण २० मैलांवरुन याची निरिक्षणे नोंदवली आहेत. यात त्याने उद्रेकाच्या आधी झालेले भुकंपाचे हादरे, इरप्शन कॉलम *, पायरोक्लास्टीक फ्लो, आणि त्सुनामीबद्दल नोंदी केल्या आहेत. शास्त्रंज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ह्याचा इरप्शन कॉलम सुमारे २० मैल (३२ कीमी) असावा, २० तासात सुमारे ४ क्युबिक किलोमीटर राख या उद्रेकात बाहेर पडली.

*ह्या प्रकारच्या उद्रेकाला प्लीनीयन उद्रेक असे संबोधले जाते.

वेसुविअस पर्वतातील या उद्रेकामुळे सुमारे ३००० लोक पडणार्‍या राखेमुळे गुदमरुन मेले,काही विषारु वायुंमुळे मेले आणि गाडले गेले. पॉम्पेईमध्ये अनेक सांगाडे अश्या अवस्थेत उत्खननात सापडले आहेत. त्याच सांगाड्यांमध्ये प्लॅस्टर भरुन केलेल्या पुतळ्यांची ही काही चित्रे.
१.
 २.

३. साखळीने बांधलेला कुत्रा (शक्यता)

पॉम्पेई हे सोळाव्या शतकापर्यंत जमिनीखाली होते. १७ व्या शतकात सुरु केलेले उत्खनन तेथे आजही सुरु आहे. जवळ जवळ ७०-७५ % गावाचे उत्खनन आजपर्यंत झाले आहे. आज पॉम्पेई हे 'वर्ल्ड हेरीटेज साइट' असुन सुमारे २५ लाख प्रेक्षक दर वर्षी तेथे जातात.

ह्या उद्रेकानंतरही आज पर्यंत वेसुवियस ५० वेळा जागा झाला आहे. ११व्या शतकापर्यंत १०० वर्षांतुन किमान एकदा वेसुवियस जागा झाला. ११ व्या शतकानंतर मात्र ६०० वर्षे तो निद्रीतावस्थेत गेला. सद्ध्या जागृत नसला तरी गेल्या शतकात काही उद्रेक झाले आहेत. उत्खननातील माहितीनुसार पॉम्पेईच्या घटनेआधीही काही लहान उद्रेक झाले असावेत असा अंदाज बांधता येतो.

क्राकातुआ १८८३
भुकंपप्रवण अश्या इंडोनेशीयातील सुमात्राच्या जवळील बेटावरील १८८३ साली झालेला हा प्रचंड उद्रेक. ह्या उद्रेकाची क्षमता, हिरोशिमावर टाकलेल्या न्युक्लीअर बॉम्बच्या तेरा हजारपट असावी. हा विस्फोट ऑस्ट्रेलियापर्यंत ऐकु गेल्याच्या नोंदी आहेत. २१ क्युबीक किलोमीटर राख हवेत सोडण्यार्‍या या उद्रेकाची ताकद इतकी होती की यामुळे नवीन बेटाची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते.



जर्मन वॉरशीप एलिझाबेथने या उद्रेकाच्या इरप्सशन कॉलमची नोंद ११ कीमी इतकी केली आहे. ह्यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटा ४० मीटर उंचीच्या होत्या. याची माहीती एका प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत,

"Suddenly we saw a gigantic wave of prodigious height advancing toward the seashore with considerable speed. Immediately, the crew . . .managed to set sail in face of the imminent danger; the ship had just enough time to meet with the wave from the front. The ship met the wave head on and the Loudon was lifted up with a dizzying rapidity and made a formidable leap... The ship rode at a high angle over the crest of the wave and down the other side. The wave continued on its journey toward land, and the benumbed crew watched as the sea in a single sweeping motion consumed the town. There, where an instant before had lain the town of Telok Betong, nothing remained but the open sea."

पायरोक्लास्टीक फ्लो, त्सुनामी आणि उद्रेक यासगळ्यांचा परिणाम म्हणुन ३५००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. उद्रेकामुळे सजीव सृष्टी पुर्ण नाहीशी झाली आहे का हे बघायला जेव्हा काही शास्त्रज्ञ बेटावर पोहोचले तेव्ह्या त्यांना फक्त काही कोळी (स्पाईडर) जीवंत सापडले, पण एक-दोन वर्षात पुन्हा गवत वगैरे उगवणे सुरु झाल्याचे सांगितले जाते.

ह्या उद्रेकाने हवेत फेकली गेलेली राख कित्येक वर्षे वातावरणात(स्ट्रॅटोस्फीअर जवळ) होती. ह्या राखेमुळे तयार झालेला ढग विषुववृत्तापर्यंत पसरला. ह्या ढगात सल्फर डाय-ऑक्साइड वायुही होता. यावायुचे पाण्याच्या वाफेबरोबर रसायन झाल्याने आम्ल (अ‍ॅसीडीक एअरोसोल्स) आणि राखेचे एक आवरण तयार झाले, ह्या आवरणामुळे सुर्याचा बराच प्रकाश परावर्तित होउ लागला. यामुळे जगभरातील तापमान २ अंशांपर्यंत खाली गेले. या आवरणामुळे अवकाशात रंगांची उधळण झाल्याच्या नोंदी आहेत. या काळातील सुर्योदय आणि सुर्यास्त चित्रकारांच्या विशेष आवडीचे होते.

विल्यम अ‍ॅस्क्रॉफ्टने चितारलेला एक सुर्यास्त.

ज्वालामुखी आणि इतिहास

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.

सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.

सर्वात नुकताच झालेला सुपर व्होल्कॅनो म्हणजे टोबाचा वोल्कॅनो जवळ जवळ ७४,००० वर्षांपुर्वीचा , याचा आपल्या इतिहासाशी असलेला संबंध थोडासा रंजक आणि मतभेद असलेला आहे.

पर्मिअन एक्स्टींशन
सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रेट्स (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रेट मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.

ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.


द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे सापडल्याने ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो.

संदर्भ

Thursday, March 25, 2010

बाप्पाशी गप्पा-2.


काय भानगड असेल असा विचार करतच होतो तेव्हढ्यात जी-मेल वर "बाप्पा wants to chat with you" !!! बाप्पाचा इमेल तर भन्नाटच होता. फक्त 'बाप्पा' @ वगैरे काही नाही! मी चॅट रीक्वेस्ट अक्सेप्ट करणार इतक्यात तिकडुन बाप्पाने नमस्कार पाठवला,

बाप्पा: नमस्कार!

बाप्पाची चॅट रीक्वेस्ट आपोआप नाहीशी झाली.

मी: राम राम!

बाप्पा: बरोबर ओळखलस मला. :-)

स्माइली!

मी: म्हणजे?

बाप्पा: हा हा. तुझा 'म्हणजे' अपेक्षितच होता. तुझे प्रतिसाद वाचत असतो मी.

आता मात्र मला रहावले नाही, मी विचारलंच!
मी: पण मी?

बाप्पा: अरे बाबा, माझ्यावर अंधश्रद्धा ठेवणारे एकाचे दहा करुन काय काय पसरवात माझ्या नावाने हे तुला मी का सांगायला हवे?

मी: तुच तयार केलेले लोक ना हे?

बाप्पा: अजुन प्रश्नचिन्ह आहेच का? :-)

मी: शेवटी मी पडलो नास्तिक. :-)

बाप्पा: अरे, हा माणुस एकच काय तो चुकीचा बनवला रे मी. तुमच्या भाषेत सांगायचं तर डी-बगींग मध्ये गोंधळ झाला अन बर्‍याच चुका राहुन गेल्या. जे निसर्गाच्या नियमानुसार घडते त्याला चमत्कार म्हणणारी मंडळी तुम्ही, आणि स्वत:च केलेल्या पराक्रमाला मात्र दगडं फेकुन मारता!

मी: ???

बाप्पा: माणसानेच शोधलेल्या रेल्वेवर 'भुतांनी चालवलेली गाडी' म्हणुन दगड फेकणारे कोण? ओटीसच्या इलीवेटरला काय समजला होतात? तु विसरलास?

मी: :-) पण मग तु काही करत का नाहीस?

बाप्पा: अरे ही मंडळी इतकी आंधळी झाली आहेत की खुद्द मी सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणारच नाही. मुळात देव तोच जो कुणालाही कधीच दिसु शकणार नाही असा रुलच करुन ठेवलाय त्यांनी.खुद्द मी आलो तर लगेच 'फाउल' म्हणुन पुढील सर्व बादच की!

मी तुझ्याशी खरंच बोललो का ह्यावर तु जरा विचार करशील, माझा शोध घ्यायचा प्रयत्न केलासच, पण हे नक्की काय याचा छडा लावायचा प्रयत्न करशील. या उलट जर मी माझ्याबद्द्ल भ्रामक कल्पना असणार्‍यांशी बोललो तर एकतर कंप्युटर भुताने झपाटला आहे म्हणतील नाहीतर मठ उघडुन 'सत्यानंद स्वामी' होउन लोकांना लुबाडतील.

मी: पण मग हे प्रकरण संपायचे तरी कसे?

बाप्पा: माणसानेच ह्या कल्पना माणसाच्या मनात घुसवल्या, माणुसच त्या दुर करु शकतो.

मी:खरंय! अरे पण तु कंप्युटर, चॅट, फोरम्स इथे काय करतोयस?

बाप्पा: अनादी मी अनंत मी!

मी: हा हा!

बाप्पा: असो, आता पळतो, एका तमिळ फोरम वरती जोरदार काथ्याकुट सुरु आहे माझ्या नावाने, जायला हवे! जाता, जाता ट्वीटरवर माझे 'बाप्पा' हॅँडल आहे, 'फ़ॉलो' करा!

मी: जरुर! भेटुच!

दुर कुठुन तरी मला, ' .. डंका बोले दुम दुम, जागो जागो अब तुम' ऐकु यायला लागलं! माझ्या समोर पांढरी चमकादार छोटीसी चौकट दिसत होती. त्यावर इँग्रजीत 'डीसमीस आणि स्नुझ' असं लिहलेलं होतं. मी काहीतरी बटण दाबतोय असं मला जाणवलं. आवाज बंद झाला...

Saturday, March 20, 2010

बाप्पाशी गप्पा!

नेहमीप्रमाणे आख्खी रात्र इंटरनेटावर वाया घालवुन पहाटे सहा-सातच्या सुमारास मी झोपायलाच निघालो होतो तितक्यात 'व्यक्तीगत निरोप (1)' असे वाचले आणि म्हणलं आता कोण?

व्यनीचा विषय होता, 'गुड मॉर्निंग' आणि पाठवणा-या सदस्याचे नाव 'बाप्पा'! मी निरोप उघडला आणि काय लिहलेय ते वाचले पण काही संदर्भ लागेना, निरोपात मजकुर होता,
काय राव, नवीन सदस्यांची उडवता वगैरे ठिक आहे हो, पण आमच्या मागे हात धुवुन का लागलात?
-बाप्पा.
माझ्या डोक्यात काहीही उजेड न पडल्याने म्हणलं हा बाप्पा आहे तरी कोण बघावे! 'बाप्पा' वर क्लिक केले तर समोर "तुम्हाला या पानाशी पोहोचण्याची मुभा नाही" !! नेहमीप्रमाणे राजेंच ड्रुपल गंडलं दिसतंय असं म्हणत चार शिव्या देउन पुन्हा लॉग़ इन केलं. पुन्हा क्लिकलो, पुन्हा तेच, "तुम्हाला या पानाशी पोहोचण्याची मुभा नाही"!!! लॉग आउट तर झालेलो नाही याची यावेळी खात्री केली! काय भानगड आहे कळेना! ट्युब पेटली, संपादकमंडळींपैकी कुणीतरी चेष्टा करतंय तर! धम्याच असणार म्हणुन चार शिव्या त्याला दिल्या आणि हजर सभासदांची लिस्ट पाहीली तर फक्त मीच हजर! निरोप तर काही क्षणांपुर्वीच आलेला आहे! अच्छा बच्चु असं म्हणुन बाप्पाला निरोपाचं उत्तर लिहायला घेतलं.

मॉर्निंग, पण ती तर इथे, तुम्ही भारतात असाल तर एव्हीनींग. कशाबद्दल बोलता आहात? मला काही संदर्भ लागला नाही. जरा सविस्तर लिहा. असो, आता मी झोपायला जात आहे, उद्या भेटुच!
-नाईल.


उत्तर पाठवले आणि लॉगआउट झालो, मुद्दाम! मला पाळत ठेवायची होती हा बाप्पा पुन्हा लॉग इन होतो का! सारखं रीफ्रेश करत राहिलो. इतर मराठी संस्थळांवरुनही लॉग आउट केले, तिथल्या हजर सभासदांच्या यादीकडे लक्ष ठेवुनच होतो. जवळ जवळ अर्धा तास कुठेच काही संशयास्पद आढळलं नाही. जाम झोप येत होती, म्हणलं एकदा लॉगइन करुन पहावं आणि झोपावं. लॉग इन केलं आणि मी उडालोच! पुन्हा 'व्यक्तीगत निरोप (1)' !! हजर सभासदात मी एकटाच! व्यनी उघडुन सर्वप्रथम वेळ पाहीली! मी उत्तर दिल्याच्या दुस-याच मिनिटाला उत्तर आलेले होते, तेव्हा तर मी लॉग्ड इन होतो, इतर कोणीही हजर नव्हते! आता मात्र डोस्कं सटकलं! 'माझे खाते' वर क्लिक करुन नव्या टॅबमध्ये उघडले, 'वाटचाल' वर गेलो. माझे नुकतेच दिलेले प्रतिसाद वाचले, त्याखाली आलेले इतर प्रतिसाद वाचले, बाप्पा हे नाव कुठेच दिसलं नाही! एकदम आठवलं, च्यायला मी त्याचा निरोप तर वाचलाच नाही!

किती शोधाशोध कराल राव? दिव्या खाली अंधार असे झाले की तुमचे! खरंच कळले नाही मी कोण ते?
असं करा, तुमचा इमेल पाठवा व्यनीने, चॅट करुयात!
-बाप्पा

क्रमश:

तळटिपा: व्यक्तीगत निरोप=इमेल. इतर पात्रे म्हणजे आमचे संस्थळांवरील मित्र.