आताशा मला नेहमीच्या डेटिंग रुटीनचा कंटाळा यायला लागला होता. एकटेपणाचा कंटाळा - पोरगी शोधा - डेट बीट मजा - कमिटमेंटचा वैताग - पुन्हा एकटं! काहीतरी नविन उपाय करायला हवा असं वाटू लागलं होतं. पण कसा? नेहमीच्या डेटिंग साईटवर मी एका पाठोपाठ एक प्रोफाईल चाळत होतो. नविन चेहरे असलेली ही जुनीच प्रोफाईल्स आहेत असं वाटत होतं. प्रोफाईल्स निवडायची माझी पद्धत एव्हाना सेट झालेली होती. एखादं प्रोफाईल बरं वाटलं की आधी 'रिलीजन'मध्ये काय लिहलंय हे पहायचं. 'क्रिश्चियानीटी अॅन्ड सिरीअस अबाऊट इट' असेल तर पुढे. 'ज्युडेइजम' असेल तर थोडावेळ न्याहाळून पुढे. ही द्राक्षं आंबट. 'योगा' करायला आवडत असेल, दहा पंधरा लोकांसोबत एकमेकांच्या पोटावर हात ठेवून उताणं पडून 'स्पिरीच्युअल हीलिंगची' आवड असेल तरच 'बुद्धीजम' वाल्यांच्या नादी लागावं. 'हिंदू-इजम' असेल तर मात्र जपून! आमच्या एका मैत्रिणीने भलत्यावेळी "आय फील लाईक आय एम लव्हिंग लॉर्ड शिवा" असे म्हणून बिकट वेळ आणली होती. माझ्या नावाचा अर्थ कृष्ण होतो, शंकर नाही हे मी तिला पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न केला, पण ती शंकरातच गुंतली होती! तेव्हापासून मी या गोर्या हिंदूंपासून दूरच राहतो! भारतीय हिंदू असेल तर अजिबातच वेळ फूकट घालवायला नको!
जुळेलसं एक प्रोफाईल दिसलं. मी जरा काळजीपूर्वक अभ्यास केला. वाचतावाचता डोक्यात काहीतरी कल्पक मेसेज केला पाहिजे अशी चक्रं सुरू झालेली होती. अपेक्षापेक्षा जरा लवकरच मेसेज सुचला. एम आय गेटींग प्रो अॅट इट ऑर व्हॉट! मी 'मेसेज' बटणावर क्लिक केलं. अरे! मी तर हिला सहा महिन्यांअगोदरच मेसेज केलाय. अजून उत्तर नाही! युजरनेमही बदललेलं दिसतंय! (काय या लोकांना युजरनेम बदलायची सवय असते कळत नाही. युजरनेम बदलल्याने काय भविष्य थोडीचं बदलतं!) साला आपण एवढा विचार करून मेसेज करायचा अन यांचं साधी पोच सुद्धा नाही! दिवसेंदिवस सोशल नेटवर्किंग एटीकेट्स खालावत चाललेले आहेत! पुढचं प्रोफाईल. आधी मेसेज केलेला नाही याची खात्री केली. बापरे, केव्हढा मोठा "यु शूड नॉट मेसेज मी इफ" सेक्शन! स्वतः दोन ओळींचा मेसेज केल्यास उत्तर मिळणार नाही असं लिहतात अन आम्ही विचारपूर्वक केलेल्या मेसेजला फक्त एका स्माईलीचं उत्तर पाठवतात! धीस इज नॉट वर्किंग! वैतागुन मी ब्राउझरच बंद केला.
तेव्हढ्यात फोनवर एक नोटीफिकेशन आलं. Congratulations! You have a new match! या टिंडरनं तर भलतीच निराशा केली होती. फक्त फोटो आणि किरकोळ माहीती, स्वाईप राईट ऑर लेफ्ट, 'मॅच' झाल्याशिवाय मेसेज करायची गरज नाही, अभ्यास करकरून मोठमोठाले मेसेजेस करून उत्तराची वाट बघत बसावी लागणार नाही वगैरे फायद्यांमुळे टिंडरकडून भरपूर आशा होती. पहिल्या आठवड्यातच दिवशी शे-दिडशे प्रमाणे प्रोफाईल्स काळजीपूर्वक स्वाईप केली. पण ही तपश्चर्याही फूकटच जाते का काय अशी शंका मला येऊ लागली होती. हजार स्वाईपमागे एखादं मॅच. त्यातही मॅच झाल्यावर मेसेज करावा तर उत्तर नाही. शेवटी मी वैतागून सगळ्यांनाच राईट स्वाईप करू लागलो. मॅच झाल्यावर बघू, साला फक्त आपणचं एटिकेट्स का पाळा!
थोड्याश्या निरुत्साहानेच मी टिंडर उघडलं. फोटो तरी स्वतःचेच दिसताहेत. (डेटिंग साईटवर स्वत:ऐवजी स्वतःच्या मुलांचे फोटो का टाकतात लोक हे मला अजूनही न सुटलेलं कोडं आहे. या लोकांना आणि कुगरलाईफ.कॉम वर जाऊन 'लूकिंग फॉर सोलमेट' वगैरे लिहणार्यांना सबंध इंटरनेटावरूनच ब्यान केलं पाहिजे असं माझं ठाम मत झालेलं आहे.) फोटोंखाली दोनच ओळी लिहलेल्या होत्या. "Bi into poly and tattoed dominatrix here for fwb. Please be hwp republicans swipe left". आपल्याला काय हवं याबद्दल स्पष्ट असणार्या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. मी अर्बन डिक्शनरीवर जाऊन नक्की काय काय आहे याची खात्री करून घेतली. तेव्हढ्यात तिकडून 'हाय' आला. "चॅटवर फार वेळ घालवण्याची इच्छा नाही. शुक्रवारी 'शॉट इन द डार्क' मध्ये भेटूया". संध्याकाळी सहा वाजता भेटायचं ठरलं.
शॉट इन द डार्क मध्ये मी पूर्वी कधी गेलो नव्हतो. डाऊनटाऊनमध्ये जायचं म्हणजे कटकटच असते. त्यात शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे पार्किंग मिळणं अशक्य. या सगळ्याचा विचार करून मी जरा लवकरच निघालो. पार्किंग वगैरे मिळून कॅफेत पोहोतले तेव्हा सहाला दहा-बारा मिनीट शिल्लक होते. कॅफेत गेल्या गेल्या जाणवलं की आपण ओव्हरड्रेस्ड आहोत. तसं मी काही कोट वगैरे घालून गेलेलो नव्हतो. साधेच अन धुतलेले कपडे घातल्यामुळे मी इथे उगाचच उठून दिसत होतो. (एरवी मला नेहमी बरोब्बर उलटा अनुभव येतो. अगदी भारतात असल्यापासून ते अमेरिकेत आल्यानंतरही कोणत्याही दुकानात वगैरे लोक मला येऊन गोष्टींच्या किमती विचारतात. आता वॉलमार्ट वगैरे ठिकाणी युनिफॉर्म-बिल्ले वगैरे लावलेले कर्मचारी असतानाही लोक मला येऊन गोष्टींच्या किमती का विचारतात काही कळत नाही. बहुतेक माझ्या कपाळावरच "आस्क फॉर हेल्प" वगैरे गोंदवलेलं असावं.) डावीकडच्या कोपर्यात एक पंधरा सोळावर्षांचं युगुल कसलातरी धूर काढत बसलं होतं. दोघेही उपोषणनाने ग्रस्त वाटत होते. तरूणाने जागोजागी फाटलेली जीन्स आणि सैलसर 'सॅन्डो' बनियन घातला होता. त्याचा धातीवर डोकं ठेवून तरूणी धताकडे शून्य नजरेनं बघत होती. अनेक दिवसांत तिने केसही धुतलेले नसावेत. मेकअपही अजिबात केलेला नव्हता मात्र प्रियकराकरता थोडंस आकर्षक दिसण्याचा तिने प्रयत्न केल्याचं जाणवत होतं. दोघंही अजिबात बोलत नव्हते, फक्त धुर काढण्यार्या गुंडाळीला आळीपाळीने एकमेकांना देत होते. स्वतःला 'आर्टिस्ट' म्हणवणारे हिप्पी लोक असावेत असा अंदाज बांधून मी पूढे निघालो. डावीकडे कॅफेला जोडून एक खोली होती. काचेच्या बंद दरवाजापलिकडे टेबलाभोवती आठ-दहाजण पत्ते का काहीतरी खेळत होते. खोलीला खिडक्या वगैरे नसाव्यात. सर्वांच्या सहभागाने निर्माण झालेला धूम्रराक्षस खोलीच्या वरच्या भागात अलगद तरंगत होता. कॅफेतली बहुतेकशी टेबलं रिकामी होती. मी दरवाजाकडे लक्ष ठेवता येईल अशा एका टेबलापाशी जाऊन बसलो. काऊंटरपलीकडे असलेल्याने माझ्याकडे टाकलेल्या प्रश्नार्थ नजरेमुळे इथे सेल्फ सर्विस आहे हे माझ्या लक्षात आलं. मानेनेच मी 'परका असलो तरी तुमचे इथले नियम मला मान्य आहेत' हे भाव नम्रपणे व्यक्त केले. काऊंटरपाशी जाऊन वरती रंगीत खडूने लिहलेला मेन्यूबोर्ड वाचू लागलो. खाद्यपदार्थांची नावं वाचून वाचणार्याची भूक मरावी असा उद्देश असावा. मी जरा जास्तच वेळ घेऊन कॉफी दे म्हणालो, मिडीयम रोस्ट. कुठूनकुठून येतात हे बुर्झ्वा लोक अशा नजरेनं माझ्याकडे पाहून तो म्हणाला "वुई हॅव ओन्ली डार्क". मी पुन्हा मानेनेच होकार दिला. मी त्याला स्टीम्ड मिल्कही मागणार होतो, इथे कोणी दूध फारसं वापरत असावं असं मला वाटलं नाही. त्यामुळे बाजूला ठेवलेल्या दुधाच्या थर्मासमधील दूध केव्हाचं असेल कोणास ठावूक. पण त्याने माझ्याकडे पुन्हा त्या नजरेनं पाहिलं असतं तर मलाही इथेच रोज यावं लागेल की काय अशी भिती मला वाटली. कॉफी अत्यंत बंडल होती. दूधही गारेगार असल्याने आधीच कोमट असलेली कॉफी अजून गार झाली. छोटे छोटे घोट घेत मी सहाची वाट पाहू लागलो.
सहा वाजून पाच-सात मिनीटं झाली होती. शेवटच्या चॅटनंतर परत आमचं बोलणं झालेलं नव्हतं. विसरली तर नसेल? मी फोन नंबरही मागून घेतल नव्हता. टिंडरवर जाऊन "आय एम हीअर" म्हणून मेसेज पाठवला. अजून दहा मिनीटं उलटली तरी काही पत्ता नाही. काऊंटरमागचा माझ्याकडे कॉफीच्या पैशात अजून किती वेळ बसशील अशा नजरेनं पाहतोय की काय असं मला वाटत होतं. शेवटी साडेसहाला तिचा मेसेज आला. "गॉट स्टक इन ऑफिस. कॅन यु मीट मी अॅट कॅफे देस्ता इन ३०? गोईंग होम टू चेंज." इथिओपीन कॅफे देस्ता मला माहित होतं. मी ओके म्हणून उत्तर पाठवलं. पाचच मिनीटांत मी देस्ताला पोहोचलो. गाडी पार्क करून बाहेरच वाट पाहत उभा राहिलो. कुठली गाडी चालवत असेल, कशी चालवत असेल, कुठल्या बाजूने येईल वगैरे गोष्टींत मला उगाचच रस आहे. यावेळी मात्र वेळेआधीच मॅडम आल्या. चालण्याच्या दिशेवरून तर इथेच येत आहे, म्हणजे तीच असावी. चालत आलीए, म्हणजे जवळच कुठेतरी राहत असणार. हिल्स! वॉज नॉट एक्स्पेक्टींग दॅट. "हाय!" "हाय! लिंडा?" मी शेकहँड करता हात पुढे केला. (मी सगळ्यांशीच शेकहँड करतो. एकवेळ मॅनरलेस ठरलो तर चालेल, पण सेक्सीट ठरण्यापेक्षा बरं!) माझ्यापेक्षा दोनेक इंच उंचच असावी.
फारशी भूक नाही असं म्हणून तिनं फक्त सूप मागवलं. मीही तेच मागवलं. मेक्सिकन इंमिग्रंट लोकांना मदत करणार्या लॉ सेंटरमध्ये ती काम करते. लॉ सेंटरच्या कामाशिवाय निदर्शनं, लोकांना कागपत्रांची पूर्तता करण्यास मदत वगैरे गोष्टीही करते. मी इंजिनीअर आहे हे सांगताना मला खरंतर थोडंसं अपराध्यासारखंच वाटत होतं. तिनं मात्र 'वॉव' केलं. (खरंतर इंजिनीअर म्हणजे आजकालचे ग्लोरीफाईड कारकून असं दिवसेंदिवस माझं मत होत चाललेलं आहे, पण ते काही मी तिला सांगायला गेलो नाही.) छंद बिंद वगैरे चौकशांवर गाडी घसरली. मी माझी एव्हाना पाठ झालेली यादी घडाघडा वाचून दाखवली. हाईकिंग, कँपिंग, रॉक क्लाईंबिंग, बायकिंग, टेनिस, सॉकर वगैरे सगळं मैदानी! (इव्होल्यूशनमुळे मैदानी खेळणारे बुद्धीबळ वगैरेंपेक्षा स्त्रीयांना जास्त आकर्षक वाटतात असं मी कुठेतरी वाचलं होतं. शिवाय यातलं सगळं मी एकदा का होईना केलेलं होतंच!) "ओह! आय लव्ह बाईकिंग! डू यू नो बायकस?" बायकस म्हणून आमच्या गावात एक सायकल कम्युनिटी आहे. तिथे स्वस्तात त्यांची अवजारं वगैरे वापरून स्वतःच सायकल दुरूस्त करता येते. शिवाय फुकटात सायकलचे वापरलेले पार्ट वगैरे मिळतात म्हणून कालेजात असताना तिथे जायचो. या तिथेही व्हॉलेंटीअर होत्या! "यु नो व्हॉट, वी आर प्रोटेस्टिंग इन फ्रंट ऑफ टीपीडी टूमारो. यु शूड जॉईन अस!" पोलिस हेड्क्वार्टर्स! बोंबला! झाली का फजिती! (साधारण वर्षभरापूर्वी याच पोलिस डिपार्टमेंटची मी 'टूर' घेऊन आलो होतो. त्यांनी अगदी प्रेमाने आम्हाला वेगवेगळ्या ड्रग्जची सॅम्पल्स वगैरे दाखवली होती.) मी आपलं न जमण्याचं काहीतरी कारण सापडेल म्हणून प्रोटेस्ट काय आहे वगैरे चौकशी करू लागलो. पोलिस डिपार्टेमेंटावर सायकल मोर्चा घेऊन जायचा बेत होता. ऑर्गनाईझर कोणतीतरी एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली एनजीओ होती, त्यांचा गाड्या आणि पोलिस दोघांवर राग असणार. तिलाही माझा बेत कळला असावा, मी काही म्हणायच्या आतच ती म्हणाली "आय वील मेक अप फॉर ईट टूमारो नाईट!" (असले संवाद काही मला नविन नाहीत असा भाव माझ्या चेहर्यावर आणण्याचा प्रयत्न करून मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहर्यावर मात्र अजिबात मिश्किली नव्हती.) मी थोड्याश्या सुपाबरोबर एक मोठा आवंढा गिळला. "शुअर, व्हाय नॉट!"
बिल देऊन आम्ही बाहेर आलो. "वूड यु लाईक टू वॉक?" मी हो म्हणालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुनाट घरं होती. इतले सगळे लोक गाव सोडून गेल्याप्रमाणे शांतता होती. रस्त्यावर फारसे दिवेही नव्हते. आमच्या चालण्याने काही घरांसमोरचे मोशन सेंसरचे दिवे चालू होत होते. "सो, यु रेड व्हॉट आय एम लूकिंग फॉर?" मी मानेनेच होकार दिला. "आय वील बी फ्रँक, माय डेज आर वेरी स्ट्रेसफूल अँड आय हॅव नो टाईम फॉर कमिटमेंट प्रॉब्लेम्स!" "आय अंडरस्टॅंड! आय एम इन द सेम बोट." मी पण कसा बिझी आहे, जुने अनुभव वगैरे तिला सांगितलं. त्यानं तिचं समाधान झालं असावं. "सो येस, आय एम आल्सो लूकिंग फॉर समथिंग कॅज्युअल!" मी. "दॅट्स गूड! आय थिंग आय लाईक यू! बिसाईड्स, आय हॅव नेव्हर हॅड अॅन इंडियन बिफोर!" असं म्हणून ती जराशी चावट हसली. मी एखादा लुसलुशीत मांसाचा तुकडा असण्याचा भास मला झाला! एव्हाना आम्ही एका घरासमोर येऊन थांबलो होतो. इथे राहते बहुतेक. तिनं मला निरोपाचं अलगद अलिंगन दिलं. घराची नोंद मनात करून मी परत फिरलो.
गेल्या दोन तीन वर्षांत सायकलला हात लावलेला नव्हता. घरी जाता जाता वॉलमार्टातून दोन टायर्स, दोन ट्युबा, पंक्चर कीट अन एक ऑईलची बुदली घेतली. टायरट्यूब्स बदलून ऑईलिंग वगैरे केलं. झोपेपर्यंत हवा राहते का नाही लक्ष द्यायला पाहिजे. गुगल मॅप्सवर जाऊन अंतर पाहिलं. भेटण्याची जागा दहा मैलांवर! तिथून पुढे मैलभर पोलिस स्टेशन.
सकाळी उठून अंग मोकळं करण्याकरता जरासा व्यायाम केला. सायकल चालवताना काही लचकलं बिचकलं तर सगळी तपश्चर्या फूकट जायची. तास-दोन तास आधी निघून आरामात जावूया! पाणी, डीओडरंट, इनर्जी बार वगैरे गोष्टी ब्यागेत घातल्या. पुर्वी घेतलेले सायकलिंगचे कपडे घातले पण ते ठिकठिकाणी पाण्याने भरलेल्या फुग्यासारखे भरले! या कपड्यांत थोडीच निदर्शन करणार असं म्हणून जीन्स अन टीशर्ट घातला. दरवाजाला कुलूप लावून सायकल जीन्यावर घेऊन खाली उतरलो. जीन्समुळे सायकलवर टांगच टाकता येईना! पुन्हा सायकल घेऊन वर! शॉर्टच बरी. शेवटी एकदाची सायकल हलली. पण पुढे आलेल्या पोटामुळे अन गुबगुबीतपणाची सवय झालेल्या कण्याने पहिल्या मिनीटातच असहकार पुकारला! भारतात ज्याला बीएसए म्हणत तसली 'रेसिंग' सायकल. पुढे आलेल्या पोटामुळे वाकून हँडल धरताना त्रास अन ताठ बसून चालवावी म्हणलं तर पाठीला रग लागत होती! शेवटी एकावेळी एका हातानेच हँडल धरून अर्ध्या शरीराला विश्रांती द्यायची अन मिंटामिंटाला हात बदलायचा असा प्रकार सुरू झाला. मजल दरमजल करत भेटायच्या जागी पोहोचलो. हळूहळू लोक जमा झाले. मला पहिल्यावर तिने पुन्हा एकदा अलिंगन दिलं. (हे कालच्या इतकं अलगद नव्हतं!) दोन-तीन लोकांशी ओळख करून देऊन ती पुन्हा कार्यकर्त्यांच्या घोळक्यात घुसली. काहीतरी झालं असणार, कार्यकर्त्यांच्या घोळक्यात एकदम गडबड झाली. तेव्हढ्यात एका जणाने बाहेर येऊन काय प्रकार आहे ते सांगितलं. जवळच एका कॉलनीत पोलिस इल्लिगल इमिग्रंट लोकांना अटक करायला आले होते. तिथून त्यांना डिपोर्टेशन सेंटरला नेणार. मुळचा प्लॅन बदलून तिथंच निदर्शनला जायचं ठरलं.
आम्ही पोहचेपर्यंत तिथं बरीच गर्दी झाली होती. पोलिसांच्याही बर्याच गाड्या येऊन थांबलेल्या होत्या. निदर्शन करणारे लोक घोषणा देत होते, काही पोलिसांची हुज्जत घालत होते. पोलिस बहुतेक घरात जाऊन कागदपत्र मागत असावेत, गर्दीमुळे नक्की काय चालू आहे दिसत नव्हतं. आमच्या ग्रुपमधली कार्यकर्ते मंडळी घोळक्यात पुढे शिरली. मी लांबूनच एका घराच्या पायर्यांवर चढून काही दिसतंय का पाहत होतो. पोलिस घोळक्याला घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक पोलिसांना रेटत होते. पोलिसांशी तावातावाने हुज्जत घालताना ती मला क्षणभरच दिसली अन पुन्हा कोणीतरी मध्ये आल्याने दिसेनाशी झाली. अजून काही पोलिस आले. एक मोटरसायकलवाला पोलिस माझ्या शेजारीच येऊन थांबला. मी आपला उगाचच त्या पोलिसाकडे पाहून हसलो. "नाईस बाईक! इज दॅट १०००?" त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. जवळपास तासाभरानंतर पोलिसांच्या गाड्या एकेक करून गेल्या. बहुतेक त्यांना कोणी सापडलं नसावं, कार्यकर्त्यांचा मूड बरा वाटत होता. काहीतरी एकमेकांत बोलून कार्यकर्ते पांगले. मला लॉ सेंटरला जावं लागणार आहे असं म्हणून तीही घाईघाईने निघून गेली. मी सायकल घेऊन बस स्टॉपवर आलो. बसच्या कॅरीअरला सायकल अडकवली अन बसमध्ये शिरलो. हे मला आधी का नाही सुचलं? बसमध्ये बसल्यावर कोणत्याही अवयवाने तक्रार केली नाही. अजूनही दहा मैल सायकलिंग करता येतंय तर! बहुतेक माझा डोळा लागला असणार, नोटीफिकेशनच्या आवाजाने जाग आली. "पिक मी अप अॅट सेव्हन!"
बरोबर सातला मी तिच्या घरी पोहोचलो. दरवाजा ठोठावू का नको! बाहेरून आल्याचा मेसेज केला. तीने आत बोलावलं. गाडी नो पार्किंगमध्ये नाही ना याची पुन्हा एकदा खात्री केली. मी दरवाजावर टकटक करून आत गेलो. मॅडम अजून तयारच होत होत्या. "फिफ्टीन मिनीट्स!" तिने तिच्या रूममेटला हाक मारली. तिला माझी ओळख स्पॅनिशमधे करून दिली आणि मला इंग्रजीत. मेक्सिकोहून नोकरी शोधायला ती इथे आली होती. रूममेटला तिने काहीतरी सांगितलं. रूममेट आतमध्ये जाऊन एक स्पाईरल बाइंडर घेऊन आली. हीचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून जरा सजेशन्स वगैरे दे जॉब अॅप्लिकेशनला फायदा होईल असं मला सांगून मॅडम आत तयार व्हायला गेल्या! मी तो स्पॅनिशमध्ये लिहलेला रिपोर्ट चाळू लागलो. तिचं स्पॅनिश, माझं महान इंग्रजी आणि भरपूर हातवारे यांच्या मदतीने मी प्रोजेक्टबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दोघांनाही एकमेकांचं नक्की किती कळलं कुणास ठावूक! पण मी सांगितलेलं तिला जे काही कळलं ते तिला आवडलं असावं. मॅडम तयार होऊन बाहेर आल्या. निघताना तिनं रुममेटला काहीतरी स्पॅनिशमधे सांगितलं आणि मला म्हणाली. "इफ यु मर्डर मी टूनाईट, शी वील बी द विटनेस!" मी तिच्या गळ्यात हात टाकून रूममेटला म्हणालो, "देन यु शूड टेक अवर पिक्चर!" ती आमच्याकडे बघून फक्त भरपूर हसली, पण तिला कळलं की नाही कुणास ठावूक!
आम्ही थेट माझ्या घरी आलो. जेवणाचा बेत परस्परसंमतीने रद्द केला होता. (पोटातल्या गोळ्यामुळे तसंही धड जेवता येत नाही अन जेवल्यानंतर उगाचच पोट बिघडण्याची भिती लागून राहते!) दोन ग्लासांत जरा जास्तच वाईन ओतली. मी कारपेट व्हॅक्युम केलं होतं, बेडशिट्स, ब्लँकेट्स वगैरे सगळं धुवून घेतलंल होतं. घरात रूमफ्रेशनर मारलेला होता. माझ्याकडून सगळी तयारी होती. पण विषयाला हात घालायचा कसा? "लेट्स वॉच सम मूव्ही!" मूव्ही! विसरली का काय! वायदा तिनं केलाय पुढाकार पण तिनेच घ्यायला पाहिजे! (माझ्या डोक्यात कैकैयीचं 'मोडू नका वचनास' किंचाळू लागलं!) "हॅव यू सीन फोर रूम्स?" नेटफ्लिक्सावर मिळाला. टॅरंटिनोचा सिनेमा आणि मी अजून पाहिलेला नाही!
३१ डिसेंबरची रात्र. टेड या हॉटेल अटेंडन्टचा नोकरीचा पहिलाच दिवस. एकेक करून पाच सहा गमतीदार बायका हॉटेलातील 'हनिमून स्वीट' मध्ये रहायला येतात. टेडला कळतं की या चेटकिणी आहेत. आणि त्यांच्या चेटकिणराणीला शापातून मुक्त करण्याकरता आज इथे जमलेल्या आहेत. प्रत्येक चेटकिणीनं राणीला अर्पण करायला एकेक गोष्ट आणलेली आहे. मात्र एक चेटकिण पुरषाचं वीर्य आणू शकलेली नाही. टेडचं वीर्य मिळवण्याकरता ती त्यांच्यावर जादू करते...
"आर वुई डुईंग समथिंग टुनाईट ऑर नॉट?" च्यायला! मी सिनेमात भलताच गुंग झालो होतो. मी वाईनचा ग्लास शेजारच्या टेबलावर ठेवला आणि जवळ सरकलो.
"डू यु हॅव अ काँडम?"
"येस!" पुन्हा तीच चूक मी कशी करेन!
"ब्रिंग इट." इथं सोफ्यावर!! मी, मनातल्या मनात! बेडरूममध्ये जाऊन घेऊन आलो आणि तिला ते रॅपर दाखवलं. (मुर्खच आहे मी! त्यात दाखवायचं काय!)
"प्लीज टर्न द लाईट्स ऑफ." मी दिवा बंद केला.
"ऑल द लाईट्स!" किचनमधला दिवा बंद करून बेडरूममध्ये जाऊन तोही बंद करून आलो.
अंधारात मला अंधुकसं दिसत होतं. मी चाचपडत सोफ्यापाशी गेलो. तिचं गोरं अंग मला दिसलं. इज शी नेकेड!! तितक्यात तिने मला सोफ्यावर ओढलं.
...
गडद अंधारात मला काही दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त तिचा तो तावातावाने हुज्जत घालणारा चेहरा तरळत होता.
...
सकाळी जाग आली तेव्हा मी कारपेटवर पसरलेलो होतो. मी उठायचा प्रयत्न केला आणि दहा बारा कळा वेगवेगळ्या ठिकाणाहून माझ्या मेंदूत गेल्या. उजवीकडे माझा वाईनचा ग्लासही कारपेटवर पसरलेला होता. एखाद्या योद्ध्याने लढाईत कमववलेल्या जखमेकडे पहावं तसं मी त्या कारपेटवर पडलेल्या वाईनच्या डागाकडे पाहिलं. आता सायकलच काय, कशावरच महिनाभरतरी बसता येणार नाही!
No comments:
Post a Comment