Sunday, January 12, 2014

शुक्रवार सकाळ

शुक्रवार हा माझा अत्यंत आवडता वार आहे. शुक्रवारी मला अर्धंच हाफिस असतं, म्हणजे फक्त ४ तास. ४ तासांत कोणालाही काम करायचं नसतं. त्यात अमेरिकन फुटबॉल सुरू असला की ऑफिसात प्रत्येकाच्या अस्मिता वगैरेंची धमाल असते. मी खरंतर अमेरिकन फुटबॉल बघत नाही, पण कोणी ना कोणी हरणारा असतोच, त्याला डिवचण्याइतकं माहित असलं म्हणजे झालं! त्याशिवाय, कॉलेज बास्केटबॉल मध्ये आमचे 'अल्मा माटर' सद्ध्या अव्वल क्रमांकावर आहे. फुटबॉलपेक्षा हे प्रकरण जरा नाजूक आह, त्यामुळे जरा जपून टोमणे मारावे लागतात. असं सगळं असताना शुक्रवारी बोंबलायला कोणी काम करत नाही!

शनिवार म्हणजे सुटीचा वार,त्यामुळे लवकर उठायची घाई नसते. आम्ही जन्मजातच निशाचर, त्यामुळे शुक्रवारची आख्खी रात्र जशी मिळते तशी इतर कोणतीच मिळत नाही. हॉटेलंही उशीरापर्यंत उघडी असतात. आमच्या विवाहित मित्रांना विकेंडला धुणीभांडी (खरोखरची बरंका), झाडाझाडी, डायपरं वगैरे खरेदी नायतर बायकोबरोबर शॉपिंग मॉलमध्ये उगाचच मागेमागे फिरणे वगैरे अनेक रटाळ कामं असतात. घरी आई-वडिल, सासू-सासर्‍यांना फोन बिन करायला (आणि अविवाहीतांना आई-वडिलांनी दिलेल्या नंबरांवर कॉल करायला) शनिवार-रविवार पुरत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी काहीही करायचं म्हणलं तर सहसा या लोकांची ना नसते. शिवाय शुक्रवारी नविन सिनेमे रिलिझ होतात त्यामुळे अगदीच कोणी नसलं तरी एकट्याने मस्त थेटरात जाऊन एक दोन सिनेमे पाहता येतात! थोडक्यात काय तर शुक्रवार हा तसा आठवड्यातला एकमेव मर्जीने जगायचा दिवस!

शुक्रवारी सकाळी मी लवकर उठतो, एरवी सातच्या हाफिसला जायला ६:४५ पर्यंत झोपलं तरी चालतं. पण अशी घाईघाईची सुरुवात शुक्रवारचा बट्ट्याबोळ करू शकते. लवकर उठून आरामात चहा घेऊन, पंधरा-वीस मिनिटं अरामात आंघोळ करून, पेपर वगैरे वाचून, इंटरनेटवर जाऊन लोकांच्या खोड्या काढल्या की दिवसाची कशी झकास सुरुवात होते. आज मी पाचलाच उठलो, गजराशिवाय! सगळ्यात पहिले एनपीआर लावला आणि गॅसवर चहाचे आधन ठेवले. सकाळीच एनपीआर वरून जगाच्या घडामोडी ऐकल्या की कसं एकदम स्मार्ट वगैरे वाटतं. मस्त अर्धात तास मोठ्ठा मगभरून चहा घेत लोकांच्या फेसबुकावर, धाग्यांवर किंवा खरडवहीत खोचक आणि भोचक कमेंटा टाकत वेळ झकास गेला. अशावेळी आपोआप गाणी वगैरे सुचतात (एरवी मी जाहीर कबुली देत नाही अशा गोष्टींची). 'पहाटे पहाटे मला जाग आली' वगैरे डोक्यात सुरु झालं. (पण रेशमाची मिठी वगैरे तशी दुर्मिळ असल्याने ह्या गाण्याची पुढची ओळ "अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली" अशी डोक्यात आपोआप पक्की झालेली आहे!)

सगळं कसं सुरळीत सुरु झालं होतं. पण असं सगळं सुरळीत चालू झालं की डोक्यात किडा येतोच. च्यायला काहीतरी भानगड आहे! असा विचार यायला आणि पहिला अपशकुन व्हायला! मध्यंतरी मी एक अंडरवेअरचा सेट विकत घेतला होता. तर मी म्हणजे तसा 'थर्ड वर्ल्ड कंट्रीचा' मनुष्य असेल तशा अंगकाठीचा मनुष्य. आताशा थोडा सुटलोय, पण तरी फारतर पुण्याच्या एखाद्या गरीब सबर्बातला, म्हणजे वारजेमाळवाडी वगैरे, म्हणून खपेन. तर या सेटमध्ये शेवटची अंडरवेर (बाकीच्या सगळ्या धुवायला पडलेल्या) ही चक्क डब्बल एक्सएल साईझची निघाली! डब्बल एक्सएल!! स्वतःला डब्बल एक्सेल मध्ये इमॅजिन करणं म्हण्जे उभ्यापेक्षा आडवा जास्त प्रकार!! 'Signs of the universe', 'universe conspires' वगैरे म्हणत पावलो कोहलो उगाचच डोळ्यांसमोर नाचू लागला! (या कोहलोनं तरुणाईतला महत्त्वाचा काळ वाया घालवला. लोकांना छळावं म्हणून त्याकाळी आम्ही कोहलोची पुस्तकं भेट द्यायचो!) च्यायला, या शुक्रवारची सुरूवात भलतीच झाली!

माझ्यासारख्या बॅचलरचे अंडरवेअरचे हिशेब तसे फार किचकट असतात. खास शुक्रवारसाठी राखून ठेवलेली अंडरवेअर डब्बल एक्सएल निघाल्याने मोठी पंचाईतच झाली. (ह्या अंडरवेअरच्या जाहिराती बाकी फार फसव्या असतात. फलाना कंपनीची अंडरवेअर घातलेल्याला लै भारी ललना मिठ्या मारते वगैरे. मला एक कळत नाही, अंडरवेअर दिसेपर्यंत एकदा मजल गेल्यावर अंडरवेअर आवडली नाही म्हणून बेत फिसकला असे कोणाचे कधी झाले आहे काय? कोणास ठावूक, पण च्यायला आपण रिस्क कशाला घ्या?) पंधरा-वीस मिनिटे शोधाशोध केल्यानंतर एक धुतलेली वर्ष-दोन वर्ष जुनी अंडरवेअर सापडली आणि आमचा जीव भांड्यात पडला! (इथे फार उपमेत घुसू नका!) थोडीशी घट्ट झाली, पण डब्बल एक्सएल किंवा घामटलेल्या पेक्षा बरी! (आता आम्ही राहतो वाळवंटात, घाम येणार नाहीतर काय रोझवॉटर झिरपणार?)


 या सगळ्या गोंधळात हाफिसला जायला पाच-दहा मिनिटं उशीरच झाला. स्ट्रारबक्सच्या चहाचे बरेच कस्टमाईझेशन करून मला आवडेल असा चहा मी ऑफिसच्या शेजारच्या स्टारबक्समधून घेत असतो. अगदी तसेच कस्टमायझेशन करणारी आमची एक चहा-मैत्रिण आहे. (आम्ही दोघे अगदी तस्साच चहा मागवतो म्हणून खरंतर आमची भेट इथल्या स्टारबक्सवालीनेच एका शुक्रवारी घालून दिली होती.) आज उशीर झाल्याने नेमकी तिची भेट चुकणार! अशा संधी गेल्या की फार चरफड होते! शिंचा कोहलो!!

 इमेल वगैरे चेक करून, नेहमीची कामं संपवून आज काय करावं याचा विचारच करत होतो की जीमेलावर एका मैत्रिणीनं 'हल्लो' केलं. (ही आमची मैत्रिण म्हणजे फक्त मैत्रिणच, बरं का!) इकडच्या तिकडच्या गप्पा आटोपल्यावर आज काय बेत वगैरे सुरू झालं. (कालेजात असल्याने यांच्या अजून सुट्या सुरू होत्या.) सिनेमा वगैरे पाहिन म्हणल्यावर ती म्हणाली "मला पण आवडेल बघायला"! (कोहलो आठवला! जपून पावलं टाकणं आवश्यक होतं. जरी नुस्तीच मैत्री असली तरी शेवटी 'उम्मीद पर दुनिया कायम' वगैरे!) कधी पहायचा? मी तिला म्हणलं लवकरात लवकर पाहू, "if you like the first, we can watch one more after". (आम्ही आपलं थोडंसं फ्लर्टिंग केलं. आमच्या इतर फ्लर्टिंगप्रमाणे हेही तिच्या डोक्यावरून गेलं.) खरंतर मला मॅटिनीच्या शोला जायला आवडतं. एकतर तिकीट कमी असतं, चाळीस-चाळीस टक्के सुट मिळते कधी कधी! (मध्यमवर्गीयाला किती चैन परवडणार हो शेवटी?) दुसरं म्हणजे, फारसं पब्लिक नसल्यानं आपल्याला हवी तशी जागा निवडून बसता येतं. (ही कमीतकमी पैशात चांगल्यात चांगला अनुभव मिळवण्याची सवय मला पुण्याला असताना लागली.) दुपारच्या शोची आयड्या तिलाही आवडली. (तिलाही कुणालातरी भेटायचं होतं रात्री. चालायचंच!) कोणता सिनेमा? हा यक्षप्रश्न. (पुर्वी केलेल्या चुकांमुळे आता मी जरा काळजीपूर्वक वागतो. 12 Years A Slave वगैरे आड्यंसला रडवण्याचे सिनेमे नकोत! Saving Mr. Banks सारखे गोग्गोड नकोच नकोत वगैरे चाळण्या लावून झाल्या!) मला खरंतर Wolf of Wall Street पहायचा होता, पण मी तिला Her सुचवला. (स्कारलेट जोहान्सनचा आवाजच काय सेक्सी आहे! शिवाय एकट्या पुरुषाची गोष्ट वगैरे असल्याने झालाच तर काही फायदा होईल असा आपला विचार! उम्मीद हो!) पण त्यांना कप्रियोला पहायचं होतं. Wolf सारखा सिनेमा उम्मीदवाल्या मैत्रिणीबरोबर पहाणं म्हणजे भलतीच रिस्क! (फोकलीचा कोहलो!) बरं ह्यांचं फ-कारावर आमच्याही पेक्षा जास्त प्रेम (म्हणजे आमचे फ-कारावर आहे त्यापेक्षा. समासप्रेमी लोक कधी काय अर्थ लावतील काय सांगता येत नाही.) असल्याने ते कारण देऊन उपयोग नव्हता. झालं, Wolf पहायचं ठरलं. बाराचा सिनेमा, म्हणलं थोडावेळ आधी भेटून कॉफी वगैरे घेऊन सिनेमाला जावं. सव्वा अकराला तुला पिक-अप करतो म्हणून चॅट संपवलं.

अकराला हाफिसातून निघून ठरल्याप्रमाणे पिक-अप केलं आणि सवयीप्रमाणे मॅडमनी बेत बदलला, "कॉफी आधी लंच करूयात का?". मला खरं तर लंच करायचा नव्हता. एकतर अंडरवेअर घट्ट! दुसरं म्हणजे सुटणार्‍या पोटाला आवरायचं म्हणून विकेंडाला लंच करायचा नाही असं एक व्रत मी नुकतंच सुरू केलं होतं. (शिवाय खाल्ल्यावर पोट अजून पुढे येतं. त्यात आज शुक्रवार, म्हणजे कॅज्युअल फ्रायडे, असल्याने जरासा घट्टच टी शर्ट घातला होता!) हाफिसात खाल्ल्याचं निमित्त करून "तु खा मी काहीतरी लाईट घेतो" म्हणून मी वेळ मारून नेली. मॅड्मचा लंच होईपर्यंत पावणे बारा झाले! स्टारबक्सातून कॉफि पिक-अप करून थेटरात गेलो. (कॉफिबरोबर जरा गप्पा मारता येतील म्हणून खरंतर कॉफिचा बेत आखला होता. आता अनवेळी मी नको कसं म्हणणार? आलिया भोगासी!) थेटरात बाहेरचे खाणे-पिणे नेऊ देत नाहीत. आमच्या मैत्रिणीने स्वतःच्या पर्समध्ये कॉफिचा कप लपवला! माझा उष्टा कप तिच्या पर्समध्ये ठेवणं भलतंच ऑकवर्डं वाटलं (मध्यमवर्गीय काय मरत नाही!) म्हणून मोठाले घोट घेऊन कॉफी संपवण्याच्या प्रयत्नांत जीभ भाजून घेतली. मरू दे म्हणलं, अर्धी अधिक कॉफि कचर्‍यांत!

माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच लोक सिनेमा पहायला आले होते, प्रत्येक रांगेत कोणीना कोणी होतंच. त्यातल्या त्यात चांगली जागा निवडून आम्ही बसलो. सिनेमा सुरू झाला आणि काही वेळातच एक विचित्र वास यायला लागला. थोड्या वेळातच वासाची तीव्रता वाढली. माझ्या उजवीकडे दोन सिटं सोडून एक दांपत्य बसलेलं होतं. ते काहीतरी खात होते, अंधारात नीट दिसलं नाही. थोड्यावेळाने अजून विचित्र वास आला, मगाच्याच सारखा पण थोडा वेगळा. मी पुन्हा उजवीकडे पाहिलं. यावेळी मी नीट दिसेपर्यंत पाहत राह्यलो. आता वासाकडे मेंदूचं नीट लक्ष गेलं असणार कारण हा वास थाई खाण्याचा आहे असं मला वाटायला लागलं. पण थेटरात थाई फूड? मला थाई फूड तसंही आवडत नाही, आणि पोटात कावळे कोकलत असताना त्या वासाने अजूनच वैतागायला झालं! तेव्हढ्यात मला त्यांच्या हातातली ताटं आणि त्यामध्ये ठेवलेले काचेचे बोल्स (म्हणजे आपले मराठीत चिनीमातीचे बाऊल्स) दिसले! या महान लोकांनी आख्खं थाई जेवण, ते ही सूपासकट, पार्सल करून थेटरात आणलं होतं! आता मला त्या पाणचट थाई सूपाचा अन खोबरं घातलेल्या कोणत्यातरी करीचा वास अगदी सुस्पष्ट येऊ लागला. (आणि त्याच प्रमाणात या लोकांविषयीचा तिरस्कार माझ्या मनात ठळक होऊ लागला!)

इकडे सिनेमाची एक वेगळीच तर्‍हा. स्कोर्सेसीचे सिनेमे काही मला नविन नाहीत, उलट कसिनो तर माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमांपैकी आहे. पण हा प्रकार भलताच किळसवाणा होता. नग्नता, अश्लीलता आणि किळसवाण्या घटनांचा अजब मिलाप दिग्दर्शकाने घडवून आणला होता. त्यात गुंफलेल्या काही विनोदी सीन्समुळे तर मला शिसारी येणंच बाकी होतं. ('घाण' पेक्षाही रसहीन म्हणून.) आमची मैत्रिण मात्र एकंदरीत सिनेमा एंजॉय करताना दिसत होती. तो पर्यंत आमच्या थाई काकूंचं खाऊन झालं असणार. कारण, आता त्यांचं सिनेमाला निवेदन देणं सुरू झालं होतं. मधून अधून एखाद्या विकृत दॄश्याला (जिथे थेटरात सगळे eww करतात) यांचं एकट्याचं विचित्र हसू ऐकू येऊ लागल. या लोकांचा मला फार वैताग येतो! एक दोनदा मी काकूंकडे कटाक्ष टाकून पाह्यला, पण काकू सिनेमात दंग होत्या. (आणि काका बहूतेक माझ्यासारखंच लाजून गपगूमान सूप पित असावेत.) सिनेमात नायक आणि त्याचे वडील (हे एक अत्यंत आऊट ऑफ प्लेस कॅरॅक्टर सिनेमात उगाचच घेतलेलं आहे) आजकालच्या स्त्रियांच्या 'हेअरस्टाईल्स' बद्दल बोलतात असा एक सीन आहे. कप्रियो आजकाल 'तिथे' सगळं कसं एकदम 'स्वच्छ' असतं आणि ते मला आवडतं वगैरे सांगतो. सीनच्या शेवटी त्याच्या वडीलांच्या तोंडी "मला मात्र 'बुश' आवडतं" असा संवाद आहे. त्यावर आमच्या शेजारच्या काकू जोरात "डॅम राईट" म्हणल्या! (आमच्या मैत्रिणीनेही त्यांच्याकडे मान वळवून पाह्यल्याने फक्त मलाच तसे ऐकू आले नाही या बद्दल माझी खात्री झाली. नेमका काकांचा चेहरा मात्र दिसला नाही!)

 मला कधी या संकटातून सुटतोय असं झालं होतं. त्यात हा सिनेमा तीन तासांचा, संपता संपेना. एव्हना बहुतेक सगळ्यांनाच सिनेमा कंटाळवाणा झाला असावा, कारण हशा वगैरे आता सौम्य झालेला होता. कथानायकाची उतरंड सुरू झालेली होती. कप्रियो कुठल्यातरी जोरदार ड्र्ग्ज घेतल्याने जमिनीवर कोसळतो असा सीन सुरू होता. त्याला हातपाय हलवता येत नाहीएत वगैरे (पण तरीसुद्धा मेल्याला नीट विचार करण्याची बुद्धी आहे, असं दाखवलंय). सरपटत सरपटत तो हॉटेलच्या लॉबीतून बाहेर गाडीकडे चालल्लाय. रटाळ लांब सीन. माझ्या मैत्रिणीलाही कंटाळा आला असणार, तिने माझ्याकडे पाह्यलं. म्हणून मी तिच्याकडे पाहिलं. ती काहितरी विचित्रच बघत होती आणि एकदम माझी टूब पेटली. डझ शी वाँट मी टू किस हर?! नो वे! शीट! शी डझ!! माझ्या पोटात गोळाच आला (टाईट अंडरवेअर मुळे जरा जास्तच दुखलं). मी थोडासा तिच्याकडे जातच होतो आणि एकदम "OH MY GOD" अशी किंकाळी सुटली. काकू!! कप्रिओ हॉटेलातल्या चार पायर्‍यांवरून गडगडल्यामुळे या ओरडल्या होत्या. (वास्तविक कप्रिओ त्या पायर्‍यांवर चांगला दोन मिनीटभर गडगडू का नको म्हणून विचार करताना दाखवलेला आहे. तो कोसळणार होताच! त्यात एव्हढं मेलं किंचाळायचं काय होतं कोणास ठावूक!) झालं, आमची मैत्रिण पुन्हा सिनेमांत घुसली. आता मात्र मी काकूंवर (अन कोहलोवर) सॉलीड चरफडलो, पण करतो काय! हट साला! कित्येक दिवसांची आराधना आज फळाला आली होती!

 सिनेमा एकदाचा संपला. माझ्या चेहर्‍यावर वैताग स्पष्ट दिसत असणार, मैत्रिणीने सिनेमाचा विषय काढला नाही. तिला घरी सोडलं. गाडीतच मी तिला जरा जास्तच थंडपणे बाय केलं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "we should do this again"!

No comments: