Tuesday, June 7, 2016

स्ट्रिप-क्लबात निळोबा

शार्लटला राहायला येऊन आठवडा-दोन आठवडेच झाले असतील. इथल्या लोकांच्या ओळखीपाळखीही अजून नीट झाल्या नव्हत्या. आठवड्यातले सहा दिवस रोज बारा-तेरा तास काम करून वैताग आला होता. अशात आलेली सोशलायझिंगची पहिली संधी मी तत्काळ स्वीकारली. नवीन मित्रमंडळींपैकी एकाचं लग्न ठरलं होतं, त्यानिमित्त पार्टी. ब्याचलर पार्टी.
अमेरिकेत येणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारचे लोक हाटेलात वगैरे गेल्यावर दमडी-दमडी वाचवण्याकरता न चुकता 'वॉटर विथ नो आईस' मागवणारे, आणि दुसरे म्हणजे अमेरिकेत आल्यावर महिन्याभराच्या आत स्ट्रिप-क्लबाला भेट देणारे. आम्ही अर्थातच पहिल्या प्रकारचे. म्हणूनच ब्याचलर पार्टीचं आमंत्रण स्वीकारलं, तेव्हा आमची ट्यूब पेटली नाही यात आश्चर्य ते काय! (याअगोदरची अामची ब्याचलर पार्टीची पराकाष्ठा म्हणजे आम्ही नवरदेवाला घेऊन बोलिंगला गेलो होतो!) ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पार्टीकरता सजूनधजून आलेली मंडळी पाहताच मात्र माझी ट्यूब लख्ख पेटली. कोणाच्याही दीड फूटापेक्षा जवळ जाण्याची शक्यता नसल्याने मी त्यानुसार हवी तेवढीच स्वच्छता बाळगून आलेलो होतो. तुम्ही एखाद्याच्या किती जवळ जाणार आहात त्यानुसार किमान हायजीन तुम्ही पाळलाच पाहिजे, अशा मताचा मी आहे. अमेरिकेत आल्यापासून तर सगळी इंद्रियं ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये गेलेली असल्याने ही मर्यादा सततच जाणवत असते. (एके काळी माझ्या बसक्या नाकाच्या फुगलेल्या नाकपुड्या अजिबातच न झाकता मी उघड्या गटारांच्या बाजूने चालू शकत होतो, यावर आता माझाच विश्वास बसत नाही.) कोलगेटच्या जाहिरातीत दाखवतात, तसं मी तोंडाचा वास वगैरे येतोय का हे तपासलं. (मला अाजवर एकदाही वास अालेला नाही.) जेवायलाच जायचं आहे असं वाटल्याने मी च्युइंगमही चघळत नव्हतो. (च्युइंगम चघळायची सवय वाईट अाहे असं म्हणणार्‍या लोकांची नाकं फिनाईलनी स्वच्छ करून त्यांना इतरांच्या तोंडाचा वास घ्यायला लावलं पाहिजे.). त्यातल्या मेंथॉलने जिभेची पार चवच जाते. ही समस्या कशी सोडवावी याचा विचार मी करत होतो, तेवढ्यात कोणीतरी कॅशचा विषय काढला. स्ट्रिप-क्लबात जायचं म्हणजे कॅश लागणार! माझ्या पाकिटात मोजून सव्वातीन डॉलर्स होते! (उगाच कोणीतरी रस्त्यात लुटलं, तर बांबू बसायला नको!) इतर लोकांकडेही पुरेसे पैसे नसावेत म्हणून एटीएमला जायचं बहुमतानं ठरलं. आता स्ट्रिप-क्लबात जायला पुरेसे पैसे म्हणजे किती? (एरवी कुठेही जायचं म्हणजे माझा रिसर्च झालेला असतो. कुठे कशाला किती पैसे द्यायचे ह्याचा अंदाज असलेला बरा! त्या बाबतीत मी अगदी 'व्हैव्हारी' मनुष्य आहे.) आजूबाजूचे लोक किती काढताहेत याचा अंदाज घेऊन, दोनशे डॉलर्स पुरावेत असा विचार मी केला. (पहिल्याच वेळी हात जरा आखडता ठेवलेलाच बरा!) पण खरं सांगायचं तर पुढे काय मांडलेलं आहे त्यासाठी मी अजिबातच तयार नव्हतो! पण आल्या परिस्थितीला जमेल तसं तोंड द्यायचं हा आपला बाणाच आहे. शेवटी तुकारामाने म्हटलेलंच आहे, आलिया भोगासी असावे सादर!
कोणीतरी कोणालातरी सुचवलेल्या एका स्ट्रिप-क्लबापाशी आम्ही पोहोचलो. बाहेर क्लबाच्या नावाची एकच पाटी. सोनेरी अक्षरांना लाल-निळ्या ट्यूबलाईट्सची पातळ बॉर्डर. त्याशिवाय आजूबाजूला फक्त अंधार. अमेरिकेतल्या पोलीस मालिकांमध्ये ड्रग्ज वगैरे गुन्हे करणार्‍या लोकांचा अड्डा असतो तशी ही जागा बाहेरून वाटत होती. आत जाताना विमानतळावर होते त्यापेक्षा कडक तपासणी झाली. क्लबमध्ये कोणतंतरी कर्णकर्कश संगीत चालू होतं. उजवीकडे एक मोठं रिकामं स्टेज होतं. त्याच्या मधोमध एक चकचकीत खांब होता. स्टेजच्या आजूबाजूला खुर्च्या-सोफे वगैरे ठेवलेले होते. खोलीच्या एका बाजूला बार होता. दोन कोपर्‍यांत दोन छोटी स्टेजं होती. त्यावर प्रत्येकी एक खांब होता. मुख्य स्टेज सोडलं, तर इतर ठिकाणी प्रकाश तसा अंधुकच होता. उरलेल्या जागेत जमेल तशी, जमेल तिथे सोफे, टेबलं ठेवण्यात आलेली होती. संपूर्ण खोलीत दोन-चार लोकं सोडली, तर एकंदरीत सामसूमच होती. बारवर चौकशी केल्यावर कळलं, की आम्ही जरा लवकरच आलो होतो. माणसानं नेहमी वेळेआधी पोहचावं याला हाच एकमेव अपवाद असावा.
ड्रिंक्स घेऊन वेळ काढण्याकरता आम्ही बारपाशी स्थिरावलो. काही वेळातच एकेक करून स्ट्रिपर्स त्यांच्या सुटकेसेससह क्लबमध्ये येऊ लागल्या. (एवढ्या मोठ्या सुटकेसेसमध्ये काय आणत असतील ब्वॉ, असा एक वायफळ विचार माझ्या मनात येऊन गेला!) हळूहळू स्ट्रिपर्स तयार होऊन बाहेर येऊ लागल्या. थोड्या वेळातच मला जाणवलं, सगळ्याच स्ट्रिपर्स माझ्यापेक्षा काही शेड्स जास्त गडद होत्या. नवीन ठिकाणी आपल्या आजूबाजूचे चार लोक जसं वागतात, तसं वागावं हे मला चांगलं माहीत होतं. पण इथे आजूबाजूचे चार लोक काय करताहेत हे पाहायचं म्हणजे जरा प्रॉब्लेमच होता. हळूहळू स्ट्रिपर्स बाहेर येऊन वॉर्मअप करू लागल्या. एकीने खांब पकडून सराव सुरू केला. एक स्टेजवर जिम्नॅस्टिक्स का काहीतरी करायला लागली. बाकीच्या अंधारात गिर्‍हाइकांचा माग घेऊ लागल्या. आख्ख्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये फक्त दोन गोरे लोक होते. एका गोर्‍या आजोबांना पहिलंच ड्रिंक चढलं असावं, स्ट्रिपर पाहताच त्यांनी भलतेच किळसवाणे प्रकार करायला सुरुवात केलेली होती. तीन लॅपडान्सेस झाल्यानंतर कोपर्‍यात बसलेल्या गोर्‍या काकांचं चौथ्यासाठी अतिशय ओंगळवाण्या चेहर्‍यानं शोधकार्य सुरू होतं. (त्या क्षणाला माझ्या कातडीचा रंग गोरा नाही, म्हणून मला फार्फार बरं वाटलं.) स्ट्रिपर्सना मात्र या प्रकाराची सवय असावी असं त्यांच्या रिअ‍ॅक्शनवरून वाटत होतं. कितीही क्रीपी अंकल असला, तरी त्या त्याच्याशी हसून बोलत होत्या. पोटेन्शिअल गिर्‍हाइकाशी फ्लर्टिंग करत होत्या, गप्पागोष्टी करत होत्या. हा जॉब जणू काही त्यांची 'फेव्हरिट हॉबी'च आहे असं त्यांचं वर्तन होतं!
जे अगदीच निर्लज्ज नव्हते, ते आवडेल त्या स्ट्रिपरकडे पाहून स्मितहास्य वगैरे करत होते. मग ती जवळ येऊन लाडेलाडे बोलत होती, लगट करत होती आणि मग तिथून पुढे 'व्यैव्हार', एवढं निरीक्षण मी एव्हाना केलं होतं. (शेरलॉक होम्सची पारायणं केल्याचा इतका तरी फायदा झालाय असं म्हणायला हरकत नाही.) पण अजूनतरी कोणाकडेही पाहून चिंगाट बुंगाट झिंगाट वगैरे काहीही मला वाटत नव्हतं. माझी नजर सतत फिरवत ठेवून चुकूनही चुकीचा सिग्नल चुकीच्या व्यक्तीला जाणार नाही याची काळजी मी घेत घेतो. पण मुळात स्ट्रिपर्स जास्त अन्‌ गिर्‍हाइकं कमी असल्याने सुटका नाही हे स्पष्टच होतं. 'हाईली सीक्ड' या गटात आमची गणना होण्याचा हा आयुष्यातला पहिलाच प्रसंग! कोणीतरी जवळ येऊन लगट करायला लागल्यावर मात्र भलतंच अवघडायला होत होतं. (लहानपणी आजीने 'मेल्या, नाही म्हणायला शीक आयुष्यात!'चा भडीमार का केला ते आता कळलं!) 'नाही' म्हणलो नाही, तरी नको तिथे 'हो' म्हणायचं नाही; हे मनातल्या मनात घोकलं. पण मी एकटाच नव्हतो, माझ्या बरोबरच्या इतरांनाही माहौल झिंगाट वगैरे वाटत नव्हता. 'दुसर्‍या क्लबात जाऊ या'ची टूम निघाली अन्‌ आम्ही तिथून बाहेर पडलो.
योग्य स्ट्रिप-क्लब शोधण्याचं काम काही उत्साही (की उतावीळ?) लोकांनी आपल्या हातात घेतलं. स्ट्रिप-क्लबांनाही 'येल्प'वरती रेटिंग्ज अन्‌ रिव्ह्यूज् वगैरे आहेत हे नवीन ज्ञान मला झालं. (अन्‌ ते देणार्‍या लोकांविषयी मनातल्या मनात अतीव आदर दाटून आला!) ३.५/५‍पेक्षा जास्ट रेटिंग एकाही क्लबला नव्हतं. (अपेक्षाभंगच लोकांना रेटिंग देण्यास उद्युक्त करत असणार!) चार-पाच लोकांनी (एकाच फोनवर) रिव्ह्यूज् वाचून जवळचाच एक क्लब ठरवला. बाहेर क्लबच्या नावाची फक्त पाटी होती, दिव्यांच्या झगमगाट वगैरे काहीही नव्हतं. त्याकडे पाहून हा स्ट्रिप-क्लब आहे अशी कोणाला शंका सुद्धा आली नसती. क्लबाची एंट्री मागच्या बाजूने होती. क्लबात जायला वय सोडल्यास कुठलीही तपासणी झाली नाही. एंट्री फी मात्र २५ डॉलर्स! (मी मनातल्या मनात उरलेल्या पैशांचा हिशेब केला. सवय.) दारात दोन-तीन ललना मिंट वगैरे तबकात घेऊन उभ्या होत्या. (याला म्हणतात कस्टमर बेस नॉलेज!) हा क्लब मात्र इतका गच्च भरलेला होता, की आम्हां सगळ्यांना बसायला एकत्र जागा मिळेल याबाबत शंकाच वाटत होती. (टेबल रिकामं व्हायला किती वेळ लागेल असं आमच्यातल्या एकाने निरागसपणे विचारून होस्टेसला बुचकळ्यात टाकलं.) थोड्या वेळातच इकडून तिकडून खुर्च्या आणून आम्हांला जागा करून देण्यात आली. आम्हांला इतक्या दाटीवाटीने बसावं लागलं; की एखाद्याला वाटावं, आम्हीच एकमेकांना लॅपडान्स देतोय की काय!
हॉलच्या मधोमध एक स्टेज होतं. त्याला छानसा पडदा वगैरे होता. दोन बाजूला दोन रोमन की कोरिंथियन प्रकारचे खांब बसवलेले होते. स्टेजभोवती हॅलोजनचे भरपूर दिवे लावलेले होते. त्यावरचा एक खांब सोडला, तर पुण्यात एकांकिका बसवणार्‍या थेट्राचं स्टेज म्हणून अगदी सहज खपून गेलं असतं ते स्टेज! उजवीकडे आणि डावीकडे कोर्टातल्या साक्षीदाराच्या पिंजर्‍यासारखे पिंजरे होते. दोन्ही पिंजर्‍यात प्रत्येकी एक स्ट्रिपर परफॉर्म करत होती. हॉलच्या मधोमध वरच्या मजल्यावर जाणारा जिना होता. वरचा रेट स्पेशल. वरती एक छोटसं स्टेजही होतं. त्याच्या बाजूला खालच्या मुख्य स्टेजकडे पाहणार्‍या तीन गॅलर्‍या. प्रत्येक गॅलरीत एक स्ट्रिपर परफॉर्म करत होती. पाहावं तिथं स्ट्रिपर! त्याशिवाय जागोजागी मोठाले टीव्ही लावलेले होते, त्यावर एनबीए वगैरे सामने चालू होते. (हे बहुतेक फक्त स्ट्रिपर लोकांकरता असावेत. त्यांच्याशिवाय इथे येऊन टीव्ही कोण बघणार!) दर पंधरा-वीस मिनिटांनतर लाऊडस्पीकरवरून एका स्ट्रिपरच नाव घेतलं जात होतं. मग ती पडदा उघडून मुख्य स्टेजवर येऊन परफॉर्म वगैरे करत होती. दुसर्‍या स्ट्रिपरचं नाव अनाउन्स झालं, की पहिली स्टेजवरून उतरून बाजूच्या एका पिंजर्‍यात जात होती. पिंजर्‍यातली जिन्यावरून वर. कंटिन्यूअस रोटेशन चालू होतं. आख्ख्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये एखाद-दुसरी एशियन सोडली, तर बाकी सगळ्या स्ट्रिपर्स गोर्‍या होत्या. मुख्य स्टेजवरच्या स्ट्रिपरच्या चेहर्‍यावरचा उत्साह, ती पिंजर्‍यात आली, की निम्मा होत होता. अन्‌ पिंजर्‍यातून उतरून जाताना तर चेहर्‍यावरचे सगळे भावच नाहीसे होत होते. इथे स्ट्रिपर्स फ्लर्टिंग करत नव्हत्या, की कोणाशी लगट करत नव्हत्या. लोक थेट जिच्याकडून लॅप डान्स हवा, तिला चाळीस डॉलर्स देत होते अन्‌ लॅपडान्स विकत घेत होते. जस्ट प्युअर बिझनेस. या स्ट्रिपर्सना जर कोणी जॉब सॅटिस्फॅक्शनबद्दल विचारलं, तर 'इट्स ऑलराईट. पेज् माय बिल्स, यु नो...' असं उत्तर येईल.
लाऊडस्पीकरवरून मेलनी का काहीतरी नाव अनाउन्स झालं. साधारण २२-२३ वर्षांची एक सुंदर स्ट्रिपर पडदा उघडून बाहेर आली. तिच्याकडे पाहून मला स्मिस्थोनियनमधल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या अ‍ॅफ्रोडायटीच्या पुतळ्याची आठवण झाली. तिची ती शुभ्र संगमरवरी नितळ त्वचा, रेखीव स्तनांची खेळकर जोडी, त्यावरची नाजूक गुलाबी स्तनाग्रं! मी तिला आपादमस्तक न्याहाळण्यात मग्न होतो अन्‌ तेवढ्यात माझ्या पाठीवर थाप पडली. माझा शेजारी बसलेला मित्र समोर उभ्या असलेल्या स्ट्रिपरकडे बोट दाखवून म्हणाला, "गो, पॉप युअर चेरी"! स्ट्रिप-क्लबमध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे, हे एव्हाना बोलता बोलता मी त्याला सांगून टाकलं होतं. माझी पहिलीच वेळ म्हणून या सदात्म्याने मला लॅपडान्स भेट म्हणून दिला होता अन्‌ ती भेट 'चला लवकर, मीटर सुरूए'च्या आविर्भावात माझ्याकडे पाहत होती. एरवी मी इतरांनी सुचवलेलं सँडविचसुद्धा खात नाही. पण हे आता याला कोण समजावणार? नया है वह. इथली रिटर्न पॉलिसीही या क्षणाला विचारण्यात तर काहीच शहाणपण नव्हतं! आता काय, पदरी पडलं अन्‌ पवित्र झालं!
मला काही कळायच्या आतच त्या स्ट्रिपरने माझ्या हाताला धरून पुढे चालायला सुरवात केली. हॉलच्या एका बाजूला रंगीबेरंगी अंधारात काही ऐसपैस सोफे ठेवलेले होते. एक सोडून सगळ्या जागा भरलेल्या होत्या. त्या रिकाम्या जागेवर मला बसवून ती समोरच्या खुर्चीवर बसली. मी हळूच आजूबाजूला काय चाललंय हे पाहून घेतलं. (द हीरो ऑलवेज पिक्स.) "वुई वील स्टार्ट अ‍ॅट द नेक्स्ट साँग." (स्ट्रिप-क्लबांमध्ये गाणं हे लॅपडान्सची लांबी मोजण्याचं एकक आहे. भारतातल्या एखाद्या स्ट्रिप-क्लबामध्ये बडजात्याच्या गाण्यांचं एकक असेल की काय हा विचार मनाला चाटून गेला.) मी मानेनंच ओके केलं. करणार काय, आलिया भोगासी...
"सो, व्हॉट डू यू डू?"
मी जमेल तितका स्वतुच्छतादर्शक भाव आवाजात आणून म्हणालो, "आय एम जस्ट अन्‌ इंजिनिअर." आणि सवयीने तोंडात आलेला 'हाऊ अबाउट यू?' हा प्रश्न बाहेर यायच्या आत हातातल्या व्हिस्कीसोबत गिळला.
"दॅट्स सो कूल! हाव डू यू लाईक युअर जॉब?"
"इट्स ऑलराईट, यु नो... पेज माय बिल्स!" च्यायला, स्मॉल टॉक विथ स्ट्रिपर्स इज नो जोक!
नशिबानं ते गाणं अन्‌ स्मॉल टॉक दोन्ही संपलं. ती एकदम उभं राहून म्हणाली, "ओके. नो टचिंग"! त्या संक्षिप्त नियमाने माझ्या मनात हजार प्रश्न उपस्थित झाले. नो टचिंग म्हणजे फक्त मी टच नाही करायचं का कोणीच नाही करायचं? आणि टचिंग म्हणजे हाताचंच टचिंग का कोणतंही टचिंग? यांना नियम स्पष्ट सांगायला काय होतं ब्वॉ! (मी एखादा बाउन्सर जवळपास दिसतोय का ते पाहायचा प्रयत्न केला. चुकून भंग झालाच, तर प्लान बी असलेला बरा!) इतक्यात ती जवळ येऊन माझ्या दोन पायांच्या मध्ये पाठमोरी उभी राहिली. अचानक आलेल्या परफ्यूमच्या भपक्याने माझा श्वासच गुदमरला! शुद्ध हरपून काही टचिंग-बिचिंग होऊ नये म्हणून डाव्या हाताने सोफ्याचा कठडा घट्ट आवळून धरला आणि उजव्या हातातल्या व्हिस्कीच्या ग्लासाभोवतीची पकड अजून घट्ट केली. एव्हाना तिने काहीतरी अंगविक्षेप करणं सुरू केलं होतं. नाचातलं मला काहीच कळत नसल्याने, हाच तो लॅपडान्स असावा असं मला वाटलं. तिचे हेलकावणारे नितंब दोन हेलकाव्यांच्यामध्ये माझ्या मांड्यांना हलकेच स्पर्श करून जाऊ लागले. जसा जसा गाण्याचा टेम्पो वाढत होता, तशी तशी ती वर-वर सरकत होती. नाहीश्या होणार्‍या गॅपची लांबी पाहत असतानाच माझं लक्ष पँटच्या खिशातल्या किल्ल्यांच्या जुडग्याकडे गेलं. मी चित्त्याच्या चपळाईने तो जुडगा खिशातल्या खिशातच बाजूला सारला. उगाच टोचलं-बिचलं तर काय घ्या! (त्या बाबतीतले नियमही स्पष्ट नव्हते!) गॅप जवळजवळ संपलीच होती. आता झिंगाट होणार…!
पण इतक्यात ती उलटी फिरली. डावा गुडघा सोफ्याला टेकवलेला, उजवा पाय सोफ्यावर, डावा हात माझ्या खांद्यावर अन्‌ उजवा हात वर हवेत अशी कुठलीशी मादक पोझ घेण्याचा तिनं प्रयत्न केला. मला तर ती पोझ पाहून महिषासुरमर्दिनीचाच फोटो आठवला! आपल्या पौराणिक कथांमध्ये होतं, तसं मी केलेल्या कोणत्यातरी पापाची शिक्षा म्हणून ही आता अचानक रूप बदलून माझा नि:पात वगैरे करते की काय, अशीही एक भीतिदायक शंका मनाला चाटून गेली! पण समोरच्या दृश्यापुढे माझी भीती एकदमच फिकी पडली असणार. समोर मंद हेलकावे खाणारे तिचे वक्ष होते. तिच्या नाचातून ती त्या हेलकाव्यांना एक संथ लय देण्याचा प्रयत्न करत होती. एका अत्यंत नाजूक आणि तोकड्या वस्त्रात बांधलेले ते वक्ष जणू काही बाहेर पडायला उतावीळच झालेले आहेत असं त्या लयीमुळे वाटत होतं. त्या संथ लयीत नाचतानाच तिची छाती हळूहळू माझ्या जवळ येत होती. माझ्या उच्छ्वासातील उष्णता तिच्या वक्षांना जाणवेल, इतकी ती जवळ आली. माझ्या कोरड्या पडलेल्या घशातला आवंढा गिळायला मी गेलो आणि एकदम विचित्र आवाज झाला! इतका वेळ टचिंग वगैरेच्या चिंतेत असल्याने आवळून धरलेल्या पोटाने काढलेला तो निषेधाचा सूर होता. 
"स्टमक!" मी तिला आवाज पोटातूनच आलेला आहे याची एकच शब्द वापरून खात्री करून दिली. 
नाच न थांबवताच तिने लवचीकपणे दोन्ही हात पाठीमागे नेले. पुढे काय होणार आहे याचा मला अंदाज आला. (टचिंगचे नियम स्पष्ट नसल्याची बोच पुन्हा एकदा टोचून गेली!) तिच्या हातांच्या हालचालीवरून माझ्या शंकेचं खात्रीत रूपांतर झालं . (तीच हालचाल त्याच अँगलमधून मी अनेकदा अयशस्वीपणे केलेली असल्याने ती माझ्या चांगलीच ओळखीची होती.) तिने अलगद हात बाजूला काढले. तिच्या दोन हातात त्या अत्यंत नाजूक, तोकड्या कपड्याची दोन टोकं होती. टोकं तशीच धरून तिने वक्ष माझ्या ओठांच्या अजून जवळ आणले. इंचापेक्षाही कमी अंतर उरलं होतं. नियमातली संदिग्धता संपली होती. तिनं खट्याळपणे ती टोकं अजूनही धरून ठेवली होती. टोक धरलेल्या तिच्या डाव्या चिमटीकडे मी चातकासारखा पाहत होतो. 
हा विलंब अनावर होऊन मी तिच्याकडे व्याकूळ नजरेनं पाहिलं आणि एकदम अनिष्ट शांतता पसरली.
गाणं संपलं होतं.
***
तळटिपा:
 अ‍मेरिकेत कोणत्याही हाटेलात गेलं, की सगळ्यात आधी 'ड्रिंक काय घेणार?' असं विचारलं जातं आणि बहुतेक अमेरिकन (अन्‌ अमेरिकन होण्यास उतावीळ असलेले भारतीयही) 'पाणी' असं उत्तर कधीच देत नाहीत. अमेरिकेत पाणी दारूपेक्षाही महाग आहे असा जो गैरसमज पसरलेला (किंवा अमेरिकेतल्या भारतीय लोकांच्या आईबापांनी पसरवलेला) आहे, त्याचं मूळ इथेच असावं.
 त्या हीरोकडून साभार.