पत्रपंडित आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकरांचा
‘…नवल वर्तले गे’ हा ११ नोव्हेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये
प्रकाशित झालेला लेख वाचून डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अगदी स्वाभाविक आणि
सुस्पष्ट होता आणि वर्तमानपत्रं इत्यादी हे उघड सत्य पाहू शकले नाहीत, असा
गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. तळवलकरांनी लेखात अनेक मतं कोणत्याही
पुराव्याशिवाय किंवा दाखल्याशिवाय मांडलेली आहेत, वैयक्तिक निरीक्षणांवरून
निष्कर्ष काढलेले आहेत आणि काही आरोपही निष्काळजीपणे केलेले आहेत.
तळवलकर म्हणतात ट्रम्प यांना निवडणुकीत घसघशीत यश मिळालं. वास्तविक ही निवडणूक अटीतटीची झाली. हिलरी क्लिंटन जिंकणार असे अंदाज जवळजवळ सगळ्यांनीच मांडले होते. त्यात व्हिस्कॉन्सिन, मिशीगन, पेन्सिल्व्हेनिया आणि न्यू हॅम्पशायर, ही राज्यं त्यांच्याकरता निर्णायक आहेत असं सांगितलं जात होतं. ढासळत्या औद्योगिक अर्थव्यवस्थेमुळे या राज्यांना ‘रस्ट बेल्ट’ असं म्हणतात. यातील केवळ न्यू हॅम्पशायरमध्ये क्लिंटन यांना आघाडी मिळाली. व्हिस्कॉन्सिनमध्ये सुमारे २७ हजार मतांनी क्लिंटन यांचा पराभव झाला (एकूण मतं सुमारे २८ लाख). पेन्सिल्व्हेनियामध्ये त्या सुमारे ६८ हजार मतांनी हरल्या (एकूण मतं सुमारे ५८ लाख. ओबामा २०१२ ला इथं सुमारे ३ लाख मतांनी जिंकले होते) आणि मिशिगनमध्ये त्या सुमारे ११ हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या (एकूण मतं सुमारे ४६ लाख). त्याशिवाय, फ्लोरिडा राज्यातील अटीतटीच्या निवडणुकीत क्लिंटन यांचा सुमारे १.२ लाख मतांनी पराभव झाला (एकूण मतं सुमारे ९१ लाख). या आकड्यांकडे पाहिल्यावर निवडणूक एकतर्फी झाली नाही हे सहजपणे दिसून येतं.
अमेरिकेतील निवडणुकीबाबत अनेकांना ही माहिती नसावी. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत दर आठवड्याला हजारो लोकांना फोन करून, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांचा कल घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशा जनमत चाचण्या अनेक संस्था घेतात आणि खुद्द निवडणुकीत असणारे स्वतःही अशा जनमत चाचण्या घेतात. त्यावरून आपला प्रचार कोणत्या राज्यात, कोणत्या मुद्द्यांवर करायचा हे ठरवलं जातं. हे इतकं काटेकोरपणे केलं जातं की, अनेकदा एखादा शब्द, एखादं वाक्य जप केल्याप्रमाणे प्रचारात बोललं जातं. ट्रम्प यांच्या बाजूनं घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्येसुद्धा अशा निकालाची पूर्वसूचना त्यांना मिळालेली नव्हती. थोडक्यात, जनमत चाचण्या घेणारे पक्षपाती होते, असं जे चित्र तळवलकरांनी रंगवलेलं आहे, त्यात फारसं तथ्य नाही.
तळवलकरांनी आपल्या लेखात ट्रम्प यांच्या कॅरॅक्टरवर विशेष प्रकाश न टाकता क्लिंटन यांच्याबद्दल बरंचसं लिहिलं आहे. ट्रम्प यांनी गेल्या १७-१८ महिन्यांत वाट्टेल तशी विधानं केली. व्हिएतनाम युद्धात कैदेत सापडलेल्या जॉन मकेन यांना ‘पकडले गेले म्हणून नामर्द’ असं संबोधलं. प्रतिस्पर्ध्यांशी शाळकरी मुलांना लाजवेल अशी भाषा ट्रम्पनी वापरली. एका प्रतिस्पर्धी महिलेविषयी ‘अशा दिसणाऱ्या स्त्रीला कोण निवडून देणार’ असे अनुदगार तिच्या दिसण्याबद्दल काढले. ट्रम्प यांचा आक्रस्ताळेपणा इतका वाढला की, त्यांच्याच पक्षाने त्यांच्याशी संबंध तोडले. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी ट्रम्प यांची निंदा केली. त्यांचा प्रचार इतका लाजिरवाणा होता की, ते जिंकण्याची शक्यता कोणालाच वाटली नाही, यात फार आश्चर्य का नाही हे तो प्रचार सातत्यानं पाहिलेल्याला सहज समजण्यासारखं आहे.
ट्रम्प यांची स्वतःची अशी कोणतीही ठाम राजकीय मतं नाहीत. गेल्या दीड
वर्षांत त्यांनी जवळजवळ सर्वच बाबतीत कोलांट्याउड्या मारलेल्या आहेत.
परराष्ट्र धोरण, संरक्षण खातं वगैरे तज्ज्ञांना खुशाल मूर्ख म्हणून
आपल्यालाच सगळं कळतं असा घोष ट्रम्प यांनी सतत लावलेला होता. “मी जरी भर
रस्त्यात कोणाला बंदुकीची गोळी मारली तरी माझे मतदार मलाच मत देतील” अशी
आपल्या मतदारांची तारीफ त्यांनी स्वतःच केलेली आहे. हे सगळं होत असताना
ट्रम्प यांच्या गोटातील लोकांची मात्र फार पंचाईत होत होती. त्यांचे
उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार माईक पेन्स यांच्यावर कित्येकदा ट्रम्प
यांनी जे म्हटलं आहे, ते त्यांनी कसं म्हटलंच नाही असं स्पष्टीकरण देण्याची
वेळ आली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, ट्रम्प यांच्या सल्लागारांनी
त्यांचा फोन काढून घेतला, कारण ते मध्यरात्री वाटेल तशा 'ट्वीट्स' करून रोज
नवा गोंधळ निर्माण करत होते. या सगळ्याचा परिणाम होऊन ट्रम्प यांची वागणूक
राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पात्रतेची नाही, असं अनेकांचं मत झालं आणि ते
आजही तसंच आहे.
अमेरिकेत या वर्षी २३ कोटी १० लाख मतदारांपैकी सुमारे ५७ टक्के लोकांनी मतदान केलं. (२०१२ साली ५८.६ टक्के तर २००८ साली ६१ टक्के लोकांनी मतदान केलं होतं.) क्लिंटन यांनी देशभरातील जवळजवळ सर्वच मोठ्या शहरांमध्ये मताधिक्य मिळवलं आहे. तळवलकरांनी आफ्रिकन-अमेरिकेन लोकांची मतं ट्रम्पला गेल्याचं वरवर म्हटलेलं आहे. सुमारे ८८ टक्के आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या लोकांनी क्लिंटन यांना मत दिलं आहे असं दिसतं. ट्रंप यांनी, विशेषतः वर उल्लेखलेल्या तीन महत्त्वाच्या राज्यांत, खेडोपाडी विजय मिळवला. तेथील बहुसंख्य गोऱ्या वंशाच्या, अशिक्षित आणि तुलनेनं कमी शिक्षित मतदारांनी ट्रम्प यांना क्लिंटन यांच्यापेक्षा जास्त मतं दिली.
अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या ठराविक 'वोट बॅंक्स' आहेत. ५० राज्यांपैकी १२-१५ राज्यं सोडली तर इतर राज्यं कोणाला निवडून देणार, हे निवडक अपवाद सोडल्यास साधारणपणे ठरलेलं असतं. वांशिक, भाषिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी विविधतेनं नटलेल्या बहुसंख्य जागी डेमोक्रॅटिक पक्ष निवडून येतो, तर गोरे, इव्हँजेलिकल ख्रिस्ती लोक सहसा रिपब्लिकन पक्षाला मतं देतात. वर उल्लेखलेल्या रस्टबेल्टमध्ये अशा गोऱ्या, इव्हँजेलिकल ख्रिस्ती लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था, बंद पडलेल्या कोळसा, खनिजं इत्यादींच्या खाणी, जागतिकीकरणाच्या प्रवाहात परदेशी गेलेल्या चारचाकी आणि इतर उत्पादन कंपन्यांच्या नोकऱ्या, यामुळे या वर्गाची हेळसांड झालेली आहे. (यातील बऱ्याच नोकऱ्या भारत आणि चीन या देशांमध्ये गेल्या आहेत.) त्याच वेळेला शैक्षणिक पातळीमुळे 'हायटेक' अर्थव्यवस्थेत जम बसवणं या वर्गास खडतर आहे. या वर्गाला ट्रम्प यांनी या नोकऱ्या परत आणण्याचं आश्वासन देऊन भूल पाडली.
ट्रम्प यांचा शिवराळपणा, आक्रस्ताळेपणा, इतरांविषयी काढलेले अनुदगार
यांमुळे त्यांच्या समर्थकांनी जनमत चाचण्या घेणाऱ्यांना आपण ट्रम्प यांना
मत देऊ असं सांगितलं नसण्याची शक्यता आहे. वरील तिन्ही राज्यांमध्ये
रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये गतवेळेपेक्षा वाढ झाली आहे. त्याच
वेळेला क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या बालेकिल्ल्यांत मिळालेली मतं
साधारण गतवेळेप्रमाणेच आहेत. ट्रम्प यांना या राज्यांत मिळालेले
गतवेळेपेक्षा अधिकची मतं ही खेड्याराड्यातील आहेत. मतांचं हे गणित अर्थातच
यापेक्षा बरंच गुंतागुंतीचं आहे आणि ते सोडवण्याचं काम दोन्ही पक्षांना
करावं लागणार आहे.
अमेरिकेसह जगभरात या निकालाबद्दल आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे. ट्रम्प यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तळवलकरांचा मूळ लेख पुढील दुव्यावर वाचता येईल –
https://goo.gl/KrnWJs
सदर लेख प्रथम अक्षरनामावर प्रकाशित झाला. तो या दुव्यावर पाहता येईल.http://www.aksharnama.com/client/article_detail/192